मित्रा...रागावलास? (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

प्रि य मित्र उधोजीसाहेब यांसी शतप्रतिशत प्रणाम. फारच रागावलात का? हल्ली फारा दिवसांत आपली गाठभेट नाही. मध्यंतरी अनेक वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण नुसती रिंग जात होती. शेवटी काल रात्री आपल्या घरीदेखील गपचूप जाऊन आलो. एरवी दारावर आपले नॉर्वेकर उभे असतात. पण त्यांची बदली झाली असल्याचे कोणीतरी सांगितले. (आणि मला दारातूनच फुटवले!) आपण कोणीही घरी नव्हता. आपण सारे बाहेरगावी गेल्याचे कळले. चौकशी केली असता आपण ब्यागा आणि नवाकोरा क्‍यामेरा घेऊन केरळात गेल्याचे कळले. केरळात कशाला गेलात? देवभूमी म्हणत असले तरी तिथे आपली डाळ शिजत नाही!! (त्यांचेच सांभार शिजते!!) मुंबईच्या माणसाने केरळातील ब्याकवॉटरच्या नादाने वाहावत जाणे बरे वाटत नाही. एवढा मोठा समुद्र आपल्याकडे असताना तिकडे कशाला जायचे? शिवाय केरळात वाघ नाहीत!! फोटो कोणाचे काढणार? पण ते राहू दे.

आपल्या दोस्तीत आता राम उरला नाही, म्हणून तुम्ही आमची साथ सोडणार असल्याचे ऐकतो आहे. तुमचेच श्री. मा. संजयाजी राऊत मोठमोठ्यांदा ‘स्वबळ, स्वबळ’ असे ओरडत असल्याने विश्‍वास ठेवला नव्हता. पण हल्ली तुमचे दर्शनही दुर्लभ झाले आहे. म्हणून काळजी वाटली, इतकेच.

पत्र लिहिण्यास कारण की आपले पक्ष सहकारी आणि बस कंपनीचे मंत्री दिवाकरजी रावते काल क्‍याबिनेटच्या वेळी मला खूप बोलले!! ‘आधीच्या सरकारने नको ते खाल्लं, मग गेली तीन वर्ष आपण काय खातो आहोत?’ असा भयंकर सवाल त्यांनी केला. तेव्हा नेमका मी कांदेपोहे खात होतो!! त्यांना जरा आवरावे ही विनंती!! रावतेजींच्या सुरात सूर मिसळून सुभाषजी देसाई आणि रामदासभाई कदम ह्यांनीही त्यांना पाठिंबा दिला. रामदासभाईंमध्ये सुधारणा होणे अशक्‍य आहे हे मलाही कळते, पण ऑफ ऑल दि अदर्स...सुभाषजी? माझ्या मनाला फार लागले आहे. ह्या तिघांनाही वेळीच समज द्यावी आणि मी कांदेपोहेच खात होतो, ह्याची खात्री कृपया पटवून द्यावी.
कळावे. आपला एकमेव मित्र नानासाहेब फडणवीस.
ता. क. : १. नागपूरहून संत्र्याची पेटी आणि ‘पतंजली’ची काही उत्पादने आणली होती. शेजाऱ्यांकडे ठेवून आलो आहे. परत आल्यावर आठवणीने घ्यावी.
२. केरळातून येताना (आमच्यासाठी) थोड्या टापिओकाच्या चिप्स आणाव्यात. बऱ्या लागतात!!
* * *
नाना-
जय महाराष्ट्र! तुमचे पत्र मिळाले, तेव्हा मी नुकताच होडीतून ब्याकवॉटरमध्ये चक्‍कर मारून आलो होतो. मला बोट लागते!! (मधाचे नव्हे, खरीखुरी बोट!!) शिवस्मारकाच्या भूमिपूजनालाही मी तेवढ्यासाठीच येणार नव्हतो. भर समुद्रात होडीने जायचे, ह्या कल्पनेनेच मला ढवळून येते. पण तेव्हा तुमच्या शब्दाखातर आलो!! इथे ब्याकवॉटरमध्ये फेरी मारली नाही, तर त्याला टूरिस्ट मानत नाहीत!! म्हणून गेलो होतो... असो. महाराष्ट्रातील राजकारणाचा कंटाळा आल्याने हवाबदलासाठी इथे आलो आहे. इथे बरे वाटते!! पण किनाऱ्यावर आल्या आल्या तुमचे तातडीचे पत्र मिळाल्याने पुन्हा ढवळून आले!!
मी रागावलो नसलो तरी स्वभावाने कडक आहे, हे तुम्हाला माहीत आहेच. काही गोष्टी आपल्याला पटत नाहीत. नाही पटल्या की मी कॅमेरा उचलून सरळ फोटो काढायला निघून जातो. रावतेजी आणि संजयाजींचे फार मनावर घेऊ नका. मीच त्यांना तसे बोलायला सांगितले होते. ‘तुम्ही लोक बाहेर विरोध करता आणि क्‍याबिनेट मीटिंगमध्ये खेळीमेळीने गप्पा मारता’ अशी टीका मध्यंतरी आमच्यावर होत होती. तुम्ही काहीही खा!! बाकी सारे ठीक.
कळावे.
उधोजी.
ता. क. : संत्र्याची पेटी आलेली नाही. (मी फोनवरून चौकशी केली!!) सबब टापिओका वेफर्स आणणार नाही. उ. ठा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com