अर्थ काय बजेटचा? (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

गेलाबाजार डझनावारी अर्थतज्ञ पैदा झाले असून, त्यांस डझनावारी टीव्ही च्यानलांवरून अर्थसंकल्पाचे सखोल विश्‍लेषण करताना पाहून आम्ही हतबुध्द झालो आहो, क्षुब्धबुध्द झालो आहो, विषण्णबुध्द झालो आहो!! (हल्ली कोणी असले शब्द वापरते काय? आम्ही थोरच आहो, ह्याचा हा पहिला पुरावा!!) इतक्‍या प्रचंड लोकसंख्येला अर्थसंकल्पाचे संपूर्ण आकलन होते, ही बाब आमच्यासाठी तरी आश्‍चर्यकारक, विस्मयकारक आणि चकितकारक आहे. (हा दुसरा पुरावा!) आमचे दिल्लीतील परमस्नेही आणि अर्थमंत्री अरुणजी जेटलीजी ऊर्फ वकीलसाहेब ह्यांनी अर्थसंकल्पाचा पेटारा, बॉक्‍स आणि खोका उघडला, आणि भारतातील लाखो अर्थतज्ञांनी आपापल्या प्रबुध्द प्रतिक्रियांचा प्रपाऊस पाडला (तिसरा!) ह्या साऱ्या चर्चाविमर्श, परिसंवाद, माध्यमांतील तज्ञांचे लेख-प्रतिक्रिया ह्यांचे सम्यक आलोडन करून आम्ही अखेर आमचे मत वाचकांपुढे ठेवीत आहोत. ‘की राजहंसाचे चालणें। जगीं जालिया शहाणे। म्हणोनि काय कवणें। चालोचि नये?।।’ ह्या ओवीनुसार आम्हीही येथे व्यक्‍त होत आहो. इन शॉर्ट, आम्हीही काही कमी नाही!! (च..च...चौथ्था!!)  

सा मां पातु सरस्वती भगवती...एका अर्थसंकल्पाचे सुयोग्य विश्‍लेषण करण्यासाठी आम्ही उभे आहो!! (ॲक्‍चुअली बस्सऽऽलेलेलेल्लो आहो!!) वास्तविक सदर अर्थसंकल्प ऐतिहासिक आणि नवभारताच्या पुनर्निर्माणास हातभार लावणारा असल्याचे मत आमचे नागपूरचे अर्थतज्ञ डॉ. फडणवीस ह्यांनी व्यक्‍त केल्यानंतर आम्ही निश्‍चिंत झालो होतो. आमचेही मत काहीसे तसेच पडले. तथापि, अजून एकच वर्ष सहन करायचे आहे, अशी तिखट प्रतिक्रिया दिल्लीचे अर्थतज्ञ डॉ. राहुलकुमार ह्यांनी ताबडतोब दिल्याने आम्हाला त्यांचेही पटले. विकासाचा रथ पुढे नेणारा अर्थसंकल्प असे यथार्थ वर्णन कुणी केले, तर कुणी ‘श्रीमंताच्या डोक्‍यावर तुरा, गरिबांच्या हाती धत्तुरा’ अशी संभावना केली. आम्ही दोन्हीही मते थोड्या थोड्या वेळाने दिली.
गुदस्ता पाऊस बरा झाला नाही, तसेच तो वाईट झाला असेही म्हणता येणार नाही. शेतीचे विक्रमी उत्पन्न झाले असले तरी हंगाम हाती आला नाही, असेच म्हणावे लागेल. हवामानाचा एकंदर विचार करता सदर अर्थसंकल्प हा गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि आम जनतेसाठी अत्यंत चांगला आहे, असेच म्हणणे सयुक्‍तिक होईल. अर्थात हे आमचे काल सायंकाळपर्यंतचे मत होते. मध्ये रात्र गेली! सकाळी आमच्या मते सदर अर्थसंकल्प हा फक्‍त श्रीमंतांसाठी, निवडक उद्योगी लोकांसाठी आणि सूटबूटवाल्यांसाठी उरला! वित्तीय तूट कमी राखण्यासाठी अर्थमंत्र्यांनी तारेवरची कसरत केली, असे आमचे मत काल (सायंकाळपर्यंत) होते. पण पुन्हा मध्ये रात्र गेली! परिणामी, वित्तीय तूट हा निव्वळ आकड्यांचा खेळ आहे असे आमचे मत सक्‍काळच्या पारी झाले!!

सारांश, काल सायंकाळपर्यंत शेतकऱ्यांना प्राधान्य देणारा अर्थसंकल्प हा सकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या डोळ्यांत धूळफेक करणारा झाला. ऑल इन ऑल, अर्थसंकल्प एका दिवसापुरता चांगला होता वा आहे, आणि आज रोजी सकाळपासून वाईटही होता व आहे!!

थोडक्‍यात, औंदाचा अर्थसंकल्प हा सरकारने आदल्या दिवशी प्रसिद्ध केल्या पाहणी अहवालासारखाच होता. ह्या अहवालाचे गुलाबी रंगाचे कव्हर पाहून आमचा चांगलाच गैरसमज झाला व अहवालाची ती प्रत आम्ही छपवून घरी आणली. रात्री निजानीज झाल्यावर आम्ही अहवालाचे गुलाबी पुस्तक उघडले. पण हाय! उघड्या-वाघड्या आर्थिक आकडेमोडीपलिकडे आतील पानात काहीही नव्हते!! (हा पाचवा आणि लाष्ट!) असो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com