फोन कोणी केला? (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

आ. मा. ना. नानासाहेब फडणवीस
यांसी, वारंवार मुजरा. आपले पंचवीस वर्षांचे मित्र जे की मा. उधोजीसाहेब ह्यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा इरादा जाहीर केल्यापासून त्यांच्या गोटावर नजर ठेवण्याची कामगिरी आम्ही हिमतीने बजावत आहोत. नवी खबर अत्यंत वाईट असून, गनीम सोकावत चालला आहे, अशी माहिती मिळते आहे. आपले मित्रपक्ष शत्रूशी संधान बांधण्याच्या बेतात आहेत. खबर अशी आहे की आंध्रातले कोणी चंद्राबाबू म्हणून आहेत, त्यांनी गेल्या चार दिवसात उधोजीसाहेबांना चार वेळा फोन केले व आपण एकत्र राहून ’कमळ’वाल्यांचा बॅंड वाजवू असे सांगितल्याचे खात्रीलायक गोटातून समजते. त्याआधी बंगालच्या कोणी ममतदीदी म्हणून आहेत, त्यांनीही उधोजीसाहेबांना फोन करून ‘ॲकला ना च्यालबो’ असे म्हटले. मित्र असूनही उधोजीसाहेब आणि त्यांचे सरदार आपल्याच गोटावर सतत गनिमीकाव्याने हल्ले करत आहेत. शत्रूपक्षातले लोक त्यांना ढिल देत असून, त्यांच्या गळाला एक ना एक दिवस हा मोठा मासा लागणार, असे दिसते.

एकंदरित उधोजीसाहेबांचे स्वबळावर लढणे सत्कारणी लागणार, अशी चिन्हे आहेत. तातडीने काही कारवाई झाली नाही तर येते इलेक्‍शन हातातून गेलेच आहे, असे समजावे लागेल. हा संदेश मी आधी आपले चंदूकाका कोल्हापूरकर ह्यांना कळवला होता व तो थेट दिल्लीत आलमगीर अमितशहा ह्यांच्या दरबारातच द्यावा, असेही सांगितले होते. पण त्यांनी ‘आपल्याला काय फरक पडतो..? महाराष्ट्राच्या रस्त्यांवर खड्‌डे किती उरलेत ते फक्‍त सांगा’, असे ते म्हणाले. शेवटी डायरेक्‍ट तुम्हाला पत्र लिहीत आहे. पत्र वाचताक्षणी फाडून टाकावे ही विनंती. कारण ते गोपनीय आहे.
कळावे. आपला आज्ञाधारक.
ता. क. : गुप्तहेरगिरीच्या कामाचे बिल पाठवत आहे. कृपया मंजूर करावे ही विनंती. ब. ना.
* * *
प्रिय,
आमचे मित्र उधोजीसाहेब ह्यांच्या गोटावर नजर ठेवण्यासाठी तुला सांगितले होते, त्याचे कारण एवढेच की बऱ्याच दिवसात त्यांनी कोळंबीचे तिखले आणि भरलेली पापलेटे असा बेत केलेला नाही. तो होताच आपण त्यांच्या घरी ऐनवेळी जाऊन धडकायचे, असा आमचा बेत होता!! ती खबर तुला काढता आलेली नाही. तू नापास गुप्तहेर आहेस.

उधोजीसाहेब स्वबळावर लढणार, ह्या बातमीत काहीच दम नाही. त्यांचेच दादरला राहणारे चुलतबंधू ह्यांच्या नोंदीनुसार ही घोषणा त्यांनी १९२ वेळा केलेली आहे. आपले सरकार ही टर्म कंप्लीट करेलच, शिवाय पुढचे इलेक्‍शनही आरामात जिंकेल, हे मी आत्ताच सांगतो. शत्रू पक्षाचे लोक गळ टाकून बसलेले असले तरी त्यांच्या गळाला आमिष काहीच नसल्याने त्यात फक्‍त कचराच अडकून येणार, हे तू लिहून ठेव!!

आंध्रातील चंद्राबाबूंनी त्यांना चार फोन केले आणि ममतादीदींनी दहा वेळा केले, हे तर मलासुद्धा माहीत आहे. किंबहुना, फक्‍त मलाच माहीत आहे!! चंद्राबाबूंनी फोन केल्याची बातमी टीव्हीवर मीसुद्धा ऐकली होती. खूप हस हस हसलो होतो. कारण हे सगळे फोन मीच आवाज बदलून केले होते!! पाचव्या फोनच्या वेळी नेमका मी शिंकलो आणि मा. उधोजीसाहेबांना मी चंद्राबाबू नसून नानाबाबू असल्याचे कळले. तेव्हा फालतू खबरांच्या मागे लागून त्या टीव्ही च्यानलवाल्यांसारखा वागू नको. त्यांना टीआरपी हवा असतो... आणि तुला प्रवास भत्ता!! मिळणार नाही, आधीच सांगून ठेवतो.
 कळावे. नानासाहेब फ.
ता. क. : गुप्तहेरगिरीचे बिल पाठवलेस....२८ टक्‍के जीएसटी? ट्याक्‍स कसला लावतोस? बघून घेईन!!’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com