आघाडी : एक प्रॉब्लेम! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

(एक गोपनीय पत्रव्यवहार)

प्रति,
परम आदरणीय श्रीमान पं. राहुलकुमारजी,
११, औरंगजेब रोड, नवी दिल्ली.
प्रत रवाना : आदरणीय पीडी. पत्ता : वरीलप्रमाणे.

विषय : महाराष्ट्रातील संभाव्य आघाडीबाबत तातडीचे, महत्त्वाचे आणि गोपनीय.

आदरणीय पं. राहुलकुमारजी, शतशत प्रणाम. माझे नाव बाबाजी चव्हाण असे असून, मी कराडचा आहे व जीवनभर कांग्रेस पक्षाची निरलस सेवा केली आहे. दिल्लीमध्ये काही काळ मी होतो. (आपल्याला आठवते का?) मध्यंतरी काही काळ मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणूनदेखील काम पाहिले. (नुसते पाहिलेच... केले नाही!!) मध्यंतरी बऱ्याचदा दिल्लीत येऊन गेलो; पण भेट होऊ शकली नाही. अखेर आदरणीय पीडी ह्यांच्याशी चर्चा करून परत आलो. ‘आपण एक सविस्तर पत्र लिहावे’ असे पीडी ह्यांनी सांगितले, म्हणून हा लेखन प्रपंच करीत आहे.
आत्ता तातडीने हे पत्र लिहिण्यास कारण, की काल रोजी मंगळवारी राष्ट्रवादीवाल्याबरोबर आमची बैठक झाली व पुढील इलेक्‍शनमध्ये मतांची विभागणी होऊ नये, म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याचे ठरले आहे. (आज इथे पेपरात भरपूर बातम्या आहेत...) आघाडी होईलही, तिकीटवाटपही समाधानकारक होईल, पण प्रॉब्लेम वेगळाच आहे. तोच सांगण्यासाठी पत्र लिहावे लागत आहे.

प्रारंभी बैठकीबद्दल थोडेसे : सदर बैठक आपल्याच विखे अंकलच्या मुंबईतल्या घरी झाली. राष्ट्रवादीचे बरेचसे नेते (मोठे साहेब सोडून) हजर होते व कॉफी आणि भजी असा बेत होता. आम्ही सर्वांनी चहा केव्हाच सोडला आहे. चहा पिताना दरवेळी चहावाल्याची आठवण होते आणि ॲसिडिटी वाढते. त्यापेक्षा कॉफी बरी!! ‘ह्या वेळेला आपल्याला चांगला चान्स आहे, सबब वेगवेगळी निवडणूक लढवून मतांची विभागणी होऊ न देता एकदिलाने निवडणुकांना सामोरे जाण्यातच दोन्ही पक्षांचे हित आहे’ अशी बैठकीची सुरवात झाली. सगळ्यांनी माना डोलावल्या. एवढे झाल्यावर ‘कॉफी आणा’ असे फर्मान राष्ट्रवादीचे नेते दादासाहेब बारामतीकर ऊर्फ धाकले धनी ह्यांनी सोडले. विखे अंकलनी सैपाकघराकडे तोंड करून ‘कॉफीऽऽ’ असा पुकारा केला. पण कॉफी लगेच आली नाही. मग ‘ह्या बैठकीतले तपशील बाहेर जाता उपयोगाचे नाही’, असे मी मुद्दामच म्हणालो. कारण प्रत्येक जण आपापल्या मोबाईल फोनशी खेळत होता. त्यावर कुणी काही बोलले नाही, पण पुन्हा एकदा कॉफीचा पुकारा झाला. ह्या वेळेला मी ‘एकत्र लढायला हरकत नाही... पण कोणाचे किती उमेदवार हे नंतर ठरवू’ एवढी एकच पुस्ती जोडली. त्यावर पुन्हा ‘कॉफी येणार आहे की नाही?’ असा गदारोळ झाला. अखेर हाती आलेली संधी वाया दवडण्यात अर्थ नाही. गेली चार-पाच वर्षे सत्तेबाहेर राहिल्यामुळे आंघोळ न केल्यासारखे भयंकर पारोसे वाटत आहे, अशा भावना सर्वांनी व्यक्‍त केल्या. ‘खरंच पारोसं वाटतंय राव?’ असे मला शेजारी बसलेले राष्ट्रवादीचे एक मोठे नेते म्हणाले. मी ‘बरं’ म्हणून सरळ जागा बदलली!! मी आंघोळ करून आलो होतो. असो. यंदा आपण खरोखर एकदिलाने लढणार, असे बैठकीत वाटू लागले. तेव्हाच तो वादग्रस्त मुद्दा निघाला!!

‘‘तुम्ही क्‍यांपेनला स्टार म्हणून कोणाला आणणार?’’ धाकल्या धन्यांनी विचारले.
‘‘कुणाला म्हंजे? आमचे एकमेव स्टार नेते पं. राहुलकुमारजींना!!,’’ मी आक्रमकपणे म्हणालो. त्यावर ते नेहमीप्रमाणे खवळले. म्हणाले -
‘‘म्हंजे झाऽऽलं!! एकमत, जागावाटप सगळं बैजवार झाल्यावर आम्ही हे भोगायचं का?’’
... ह्या एका मुद्द्यावर प्रॉब्लेम होण्याची शक्‍यता आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
 आपला आज्ञाधारक. बाबाजी.
ता. क. : बैठकीत कॉफी एकदा झाली. भजी आलीच नाहीत!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com