पकोडा टॉक! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

(अर्थात सदू आणि दादू...)

(अर्थात सदू आणि दादू...)

सदू : (फोनची चहाटळ सुरवात) म्यांव म्यांव..!
दादू : (संयम राखून) बोला! फोन आमच्या मावशीला देऊ का?
सदू : (नेहमीच्या चिडचिड्या खर्जात) कोण मावशी?
दादू : (ठामपणे) आमची मावशी! तुम्ही म्यांव म्यांव केलंत, मला वाटलं आमच्या मनीमावशीचा कॉल असणार!..आमची मावशी अशीच म्यांव म्यांव करते!! आम्ही वाघ आहोत ना!!
सदू : (छद्मीपणानं) वाघ!! फू:!!
दादू : (शांतपणे) सद्या, सद्या कधी रे जाणार तुझा येळकोट? लहानपणापासून पाहातोय, तुझा चहाटळपणा काही कमी होत नाही!! (समजूत घालत) लहान भाऊ आहेस, म्हणून सांगतो...जरा करिअरकडे लक्ष दे!! नाहीतर उगीच भजी तळत बसावं लागेल, आयुष्यभर!! त्या राष्ट्रवादीवाल्या धनाजीराव मुंडेंसारखं!! औरंगाबादेत त्या गृहस्थानं भज्यांचा स्टॉल लावलान!! आहात कुठे, सदूराया!!
सदू : (नाक मुरडत) ते मुंडे उद्या जिलेबी घालत बसले तरी मला आश्‍चर्य वाटणार नाही!! भज्यांवरून आठवलं, मध्यंतरी मी दादरमध्ये मस्त मिसळ महोत्सव भरवला होता, धमाल आली!! तू का आला नाहीस?
दादू : (मिशीवर बोट फिरवत) वाघ मिसळ खात नसतो!!
सदू : (तावातावाने) मग भजी खातो? कमॉन! मिसळ हा महाराष्ट्राचा राजपदार्थ आहे!! मिसळ ही महाराष्ट्राची ओळख आहे! मिसळ ही महाराष्ट्राची अस्मिता आहे!!
दादू : (करारी आवाजात) नाय नो नेव्हर!! हा मान आम्ही केव्हाच वडापाव नावाच्या पक्‍वान्नाला दिला आहे!!
सदू : (तुच्छतेने) वडापाव!!...फू:!!
दादू : (मुद्दा रेटत) मिसळ पोटाला बाधते!! मागल्या खेपेला मी ठाण्याला एकदा...
सदू : (घाईघाईने विषय बदलत)...वडापाव मुंबईचा, मिसळ महाराष्ट्राची!
दादू : (सुस्कारा सोडत) बाबा रे...ज्यांना नकोत पकोडे, त्यांनी खावेत जोडे!!
सदू : (मखलाशीनं) सध्या तुमची चंगळ आहे!! पांचो उँगलिया घी में, सर कडाई में!! खा, खा, भजी खा!!
दादू : (स्वाभिमान जागा होत...) वाघ भजीदेखील खात नसतो!! ती तुमच्यासारख्या बेरोजगारांनी तळावीत आणि खावीत!! आम्ही आमच्या स्वबळावर स्वकमाईचं खातो!! कळलं?
सदू : (माहिती काढून घेत) येत्या इलेक्‍शनमध्ये कमळाबाई म्हणे तुमच्यासाठी १४० जागा सोडणार आहे... खरंय का? एकशेचाळीस जागा म्हंजे चंगळ आहे बुवा एका माणसाची!!
दादू : (दात ओठ खात) सद्या, तोंड सांभाळून बोल!! आमच्यासाठी जागा सोडणारे हे उपरे कोण? उलट आम्हीच त्यांच्यासाठी सोडू!! (जीभ चावतात) म्हंजे माझ्या म्हणण्याचा अर्थ-
सदू : (समजून उमजून हसत) अब आ गया उंट पहाड के नीचे...मनातलं जिभेवर आलं!! महाराष्ट्राच्या जनतेनं तुमची ही राजकारणं फार जवळून बघितली आहेत! तुमची स्वबळाची भाषा किती दिवस टिकते, हेच बघायचंय आम्हाला!!
दादू : (खिजवत) आधी तुमच्या नवनिर्माणाचं बघा!! तुमचे लोक शेवटी आमच्याकडेच येतात!! आता तर ‘डायरेक्‍ट तुमच्या बंधुराजांनाच घेऊन टाका, आणि विषय संपवा,’ असं सांगायला लागले आहेत लोक!!
सदू : (संतापून) मी कशाला येऊ? अडलंय माझं खेटर! तुमचा वडापाव आणि पकोडे तुम्हालाच लखलाभ असोत!! आम्ही मिसळवादी माणसं आहोत!! मिसळीत ‘मी’ आहे!!
दादू : (विषण्ण होऊन) काय हे दिवस आले, सदूराया! एकेकाळी नेत्यांवरून पार्ट्या ओळखल्या जायच्या...आता पदार्थांवरून ओळखल्या जातात! आमचा वडापाव, त्यांचे पकोडे, तुमची मिसळ... त्या अमक्‍यांचे पोहे, तमक्‍यांची तंदुरी, ढमक्‍यांचा ढोकळा, अलाण्यांचा अनारसा, फलाण्यांचा फालुदा... छे, कठीण आलाय काळ!!
सदू : (गंभीरपणे) त्याला उपाय एकच!..तुम्ही वडापाव सोडा!! मी मिसळ सोडतो!!
दादू : (कपाळाला हात मारत) आणि खा काय?...पकोडे?

Web Title: editorial dhing tang british nandi article