जाणीव देते मृत्यूला अर्थ

दीप्ती गंगावणे
शुक्रवार, 16 मार्च 2018

आपले जीवन म्हणजे जन्मापासून मरणापर्यंत घडणाऱ्या घटनांची एक साखळी असते. थोडी समज यायला लागल्यापासूनच जीवनक्रमातील घटना मर्जीप्रमाणे घडवून आणण्याची आपली धडपड चालू असते. पण गंमत अशी की आपल्या जीवनाचा आरंभ आणि अंत या दोन घटनांवर मात्र आपले काहीच नियंत्रण नसते. जन्माला येणे वा ना येणे आपल्या हातात नसते. हे तर समजण्यासारखे आहे; पण आपला मृत्यू कधी, कसा, कुठे होईल हेही बहुतेक वेळा आपल्या हातात नसते. खरे तर जन्माला आल्या क्षणापासूनच, क्षणाक्षणाने आपली पावले मृत्यूच्या दिशेने पडत असतात. अनिश्‍चिततेने भरलेल्या आपल्या जीवनात मृत्यू ही एकच घटना पूर्णपणे निश्‍चित असते.

आपले जीवन म्हणजे जन्मापासून मरणापर्यंत घडणाऱ्या घटनांची एक साखळी असते. थोडी समज यायला लागल्यापासूनच जीवनक्रमातील घटना मर्जीप्रमाणे घडवून आणण्याची आपली धडपड चालू असते. पण गंमत अशी की आपल्या जीवनाचा आरंभ आणि अंत या दोन घटनांवर मात्र आपले काहीच नियंत्रण नसते. जन्माला येणे वा ना येणे आपल्या हातात नसते. हे तर समजण्यासारखे आहे; पण आपला मृत्यू कधी, कसा, कुठे होईल हेही बहुतेक वेळा आपल्या हातात नसते. खरे तर जन्माला आल्या क्षणापासूनच, क्षणाक्षणाने आपली पावले मृत्यूच्या दिशेने पडत असतात. अनिश्‍चिततेने भरलेल्या आपल्या जीवनात मृत्यू ही एकच घटना पूर्णपणे निश्‍चित असते. जर्मन तत्त्वज्ञ मार्टिन हायडेगर यांनी माणसाचे वर्णन करताना माणूस हा एक मृत्युगामी जीव आहे, असे म्हटले आहे. यात विशेष ते काय असे वाटू शकेल. सजीवच नव्हे तर निर्माण झालेली प्रत्येक वस्तू, मग ती निसर्गनिर्मित असो की मनुष्यनिर्मित, कधी ना कधी नष्ट होणार असतेच. हेच जगाबाबतचे सत्य आहे. मात्र बुद्धीच्या पातळीवर हे समजून घेणे, या सत्याला वैचारिक, भावनिक पातळीवर प्रतिसाद देणे, हे फक्त माणसालाच शक्‍य असते. या अटळ आणि प्रखर सत्याला दिलेला प्रतिसाद निरनिराळा असतो. आपल्या नात्यातल्या, परिचयातल्या पाहिलेल्या, ऐकलेल्या, वाचलेल्या व्यक्तींचे मृत्यू आपण अनुभवतो; पण तो अनुभव ‘मृत्यूचा’, ‘मरण पावण्याचा’ असत नाही, असूच शकत नाही. ज्या क्षणी आपण मरतो, त्या क्षणापर्यंतचा अनुभव जगण्याचा, जिवंतपणाचा असतो आणि मरणाचा क्षण हा आपले अस्तित्व मिटवण्याचा असतो. तो क्षण अनुभवणारा किंवा अनुभवू शकणारा ‘मी’ त्या क्षणातच संपलेला असतो. म्हणजे जे मरण येणार येणार, असे आठवत किंवा विसरायचा प्रयत्न करत क्वचित खरच विसरत आपण जगत राहतो, ते मरण आपण कदाचित खऱ्या अर्थाने अनुभवतच नाही. आपले जगणे मात्र एका तऱ्हेने मृत्यूच्या पडछायेतच चालू असते; कारण वस्तू सोडाच, पण इतर सजीवांनाही मृत्यूच्या जाणिवेतच जीवन जगण्याची कला साध्य झालेली नसते. वस्तू नष्ट होतात, इतर सजीवांचे अस्तित्व संपून जाते. फक्त माणूसच ‘मरण पावतो’. माणसाचा मृत्यू ही फक्त निसर्गनियमांनुसार घडून येणारी एखादी यांत्रिक घटना नसते. माणसाची जाणीव मृत्यूलाही अर्थ, मूल्य प्रदान करू शकते आणि मृत्यूच्या जाणिवेतूनच जीवनही अर्थपूर्ण बनवू शकते.

Web Title: editorial dipti gangawne write article in pahatpawal