कोडे- विश्‍वाच्या स्वरूपाचे

दीप्ती गंगावणे
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

तत्त्वज्ञानाच्या आरंभीच्या काळात, विचारवंतांना पडणारे प्रश्‍न मुख्यतः विश्‍वाचे अस्तित्त्व आणि त्याचे स्वरूप यांविषयीचे होते. या प्रश्‍नांना उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नात त्यांच्या असे लक्षात आले, की अस्तित्त्वात असलेली प्रत्येक वस्तू स्वयंभूपणे, स्वतंत्रपणे अस्तित्त्वात नसते, तर कशामधून तरी निर्माण झालेली असते. ज्या कशामधून ती निर्माण होते, त्या द्रव्यानुसार वस्तूचे स्वरूप असते, गुणधर्म असतात. उदाहरणार्थ, काचेपासून अनेक तऱ्हेच्या वस्तू बनवता येतात. आकार, रंग उपयुक्तता याबाबत त्यांमध्ये बरेच फरक असले, तरी त्यांचे मूलभूत गुणधर्म काचेचेच असतात.

तत्त्वज्ञानाच्या आरंभीच्या काळात, विचारवंतांना पडणारे प्रश्‍न मुख्यतः विश्‍वाचे अस्तित्त्व आणि त्याचे स्वरूप यांविषयीचे होते. या प्रश्‍नांना उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नात त्यांच्या असे लक्षात आले, की अस्तित्त्वात असलेली प्रत्येक वस्तू स्वयंभूपणे, स्वतंत्रपणे अस्तित्त्वात नसते, तर कशामधून तरी निर्माण झालेली असते. ज्या कशामधून ती निर्माण होते, त्या द्रव्यानुसार वस्तूचे स्वरूप असते, गुणधर्म असतात. उदाहरणार्थ, काचेपासून अनेक तऱ्हेच्या वस्तू बनवता येतात. आकार, रंग उपयुक्तता याबाबत त्यांमध्ये बरेच फरक असले, तरी त्यांचे मूलभूत गुणधर्म काचेचेच असतात. मग प्रश्‍न निर्माण होतो, की काच कशापासून निर्माण होते? त्या द्रव्याचे गुणधर्म कोणते? प्रश्‍नोत्तरांची ही साखळी कुठेतरी संपायला हवी असेल, तर अनंत वैविध्यपूर्ण वस्तूंनी भरलेल्या या जगाच्या मुळाशी काही स्वयंभू तत्त्वे आहेत, असे मानावे लागते. (इथे स्वयंभू या शब्दाचा अर्थ इतर कशाहीपासून निर्माण न झालेला, स्वतंत्रपणे अस्तित्वात असलेला असा आहे.) चिंतन प्रवासाच्या या टप्प्यावर असे प्रश्‍न निर्माण झाले, की या स्वयंभू, मूलतत्त्वांची संख्या किती आहे? एक, दोन की अनेक? तसेच या मूलतत्त्वांचे स्वरूप काय आहे? या मुळात मर्यादित संख्येने अस्तित्वात असलेल्या मूलतत्त्वांमधून हे अगणित वस्तूंचे विविधतेने भरलेले जग कसे निर्माण झाले? तत्त्वज्ञांच्या हे लक्षात आले, की या अनेक वस्तूंचे विभाजन दोन अगदी मूलभूत प्रकारात करता येते. एक म्हणजे अचेतन (निर्जीव) आणि दुसरा म्हणजे सचेतन (सजीव). अचेतनाची निर्मिती जड भौतिक द्रव्यापासून होते, तर सचेतनाची निर्मिती चैतन्यगुणाने युक्त तत्त्वापासून होते. आता प्रश्‍न हा निर्माण झाला, की या दोन्हींचे एकमेकांशी काय नाते आहे? जडातून चैतन्य निर्माण होते, की चैतन्यातून जड? दोन्ही स्वतंत्रपणे अस्तित्वात असतात, की दोन्हींची निर्मिती तिसऱ्याच स्वयंभू शक्तीकडून केली गेली आहे? ईश्‍वराला जगाचा निर्माता मानणाऱ्या तत्त्वचिंतकानी चौथा पर्याय निवडला; जो धार्मिक विचारसरणींच्या जवळ जाणारा आहे. या उलट काही तत्त्वज्ञ या मताचे होते, की पृथ्वी, जल, अग्नी, वायू ही चार भौतिक द्रव्ये विशिष्ट प्रमाणात एकत्र येण्यातूनच चैतन्याची निर्मिती होते. प्राचीन काळातील तत्त्वचिंतनात या प्रकारचा जडवाद भारतीय परंपरेत चावीक दर्शनाने, तर पाश्‍चात्य परंपरेत डेमॉक्रिटसच्या अणुवादाने मांडला. जगाचे मूलतत्त्व जड नसून, चेतन आहे असे मानणाऱ्यांपैकी हेगेलसारख्या काही विचारवंतांच्या मते चेतन तत्त्वाच्या विकासाच्या प्रक्रियेत जडाची निर्मिती होते. तर बर्कलेसारखे काही, जड द्रव्याचे अस्तित्वच नाकारतात. "ब्रह्म सत्य, जगत्‌ मिथ्या' असे मानणारे आदी शंकराचार्यप्रणीत अद्वैत वेदांताचे तत्त्वज्ञानही फक्त सत्‌, चित्‌ आणि आनंदरूपी ब्रह्मालाच अंतिम सत्य मानते.

विश्‍वाच्या मूल स्वरूपाविषयी तत्त्वज्ञानाला पडलेले कोडे सोडविताना विज्ञान जडवादाच्या दिशेने जात असले, तरी हे कोडे पूर्णपणे सुटलेले नाही, हे खरेच!

Web Title: editorial dipti gangawne write article in pahatpawal