कोडे विश्‍वाच्या रचनेचे

दीप्ती गंगावणे
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

नुकतीच मकर संक्रांत पार पडली. ऋतुबदलाची चाहूल लागली आहे. अव्याहत चालू असणारे हे ऋतुचक्र आपल्याला याची जाणीव करून देते, की कुठलाच ऋतू कायम टिकत नाही. बदलणे हा ऋतूंचाच नव्हे, तर सृष्टीतील प्रत्येक वस्तूचा नियम आहे. छोटी असो, की मोठी; अणुगर्भातले सूक्ष्म कण असोत, की आकाशस्थ ग्रहगोल, प्रत्येक वस्तू गतिशील असते. त्या गतीमधूनच बदल घडतात. सृष्टीच्या आरंभाच्या काळात या गतिशीलमुळेच भौतिक जगाच्या मूलभूत घटकांमध्ये बदल व्हायला सुरवात झाली. आणि क्रमा-क्रमाने सर्व सृष्टीत बदल घडून येत तिने आजचे रूप धारण केले.

नुकतीच मकर संक्रांत पार पडली. ऋतुबदलाची चाहूल लागली आहे. अव्याहत चालू असणारे हे ऋतुचक्र आपल्याला याची जाणीव करून देते, की कुठलाच ऋतू कायम टिकत नाही. बदलणे हा ऋतूंचाच नव्हे, तर सृष्टीतील प्रत्येक वस्तूचा नियम आहे. छोटी असो, की मोठी; अणुगर्भातले सूक्ष्म कण असोत, की आकाशस्थ ग्रहगोल, प्रत्येक वस्तू गतिशील असते. त्या गतीमधूनच बदल घडतात. सृष्टीच्या आरंभाच्या काळात या गतिशीलमुळेच भौतिक जगाच्या मूलभूत घटकांमध्ये बदल व्हायला सुरवात झाली. आणि क्रमा-क्रमाने सर्व सृष्टीत बदल घडून येत तिने आजचे रूप धारण केले. सृष्टीच्या स्वरूपाबद्दल चिंतन करताना तिचा हा गुणधर्म विचारवंतांच्या ध्यानात अगदी सुरवातीलाच आला. या बदलाच्या प्रक्रियेचा अनेक बाजूंनी अभ्यास करताना हे लक्षात आले, की हे बदल काही निश्‍चित अशा नियमांनुसार घडत असतात. या विश्‍वात अनेक वेगवेगळ्या वस्तू असल्या, तरी त्या या नियमांनी एकमेकींशी विशिष्ट रीतीने बांधल्या गेल्या आहेत. किंबहुना, संपूर्ण विश्‍वही एक अतिशय सुबद्ध, सनियंत्रित अशी एक व्यवस्था किंवा रचना आहे. आकाशातील ग्रह-ताऱ्यांच्या नियमबद्ध भ्रमणामुळे पृथ्वीवर ऋतुचक्र निर्माण होते. ऋतुबदलानुसार सृष्टी नित्य-नूतन रूप धारण करते. ऋतूंनुसार सजीवांच्या शरीरातही बदल होतात आणि माणूस नावाचा बुद्धिमान सजीव हे बदल समजून घेऊन आपल्या आहार-विहारात बदल घडवून आणतो. प्रचंड परिश्रम घेऊन सृष्टीतील बदलाचे नियंत्रण करणारे नियम शोधणारी आणि त्या नियमांच्या आधारे आपल्या जीवनात बदल घडवून आणू शकणारी माणसाची बुद्धिमत्ता हाच एक मोठा चमत्कार आहे ! जगातील घडामोडींचा; वस्तू, त्यांचे गुणधर्म आणि त्यांचे परस्परसंबंध यांचा निरीक्षण आणि प्रयोग याद्वारे अभ्यास करून ते नियम शोधण्याचा वसा विज्ञानाने घेतला. त्या नियमांचा उपयोग करून तंत्रज्ञानाची निर्मिती केली. चिंतन आणि तर्क पद्धती वापरणाऱ्या तत्त्वज्ञानाने असा प्रश्‍न उपस्थित केला, की विश्‍वाला हे नियमबद्ध स्वरूप कसे मिळाले? विश्‍वाच्या जडघडणीच्या प्रक्रियेत आपाततःच ही नियमबद्धता आली, की कुणा अतिंद्रिय, बुद्धिमान दैवी शक्तीने या गुंतागुंतीच्या पण सुंदर सृष्टीची रचना केली? जगातील काही प्रमुख धर्मांनी ईश्‍वराला विश्‍वाचा निर्माता मानला. वेगवेगळ्या तत्त्वप्रणालींनी या प्रश्‍नांना वेगवेगळी उत्तरे दिली आहे. ईश्‍वर न मानणारी भारतीय दर्शने अर्थातच विश्‍व ईश्‍वराने निर्माण केले आहे, असे मानत नाहीत. एवढेच नव्हे तर ईश्‍वराचे अस्तित्व मान्य असणारी सर्व दर्शनेही ईश्‍वराने विश्‍वाची निर्मिती शून्यातून केली असे मानत नाहीत. मुळात विश्‍व कुठल्या एका काळात निर्माण झाले, की ते कायमच अस्तित्त्वात होते, हाच एक कूट प्रश्‍न आहे, जो आज तरी अनुत्तरितच आहे.

Web Title: editorial dipti gangawne write article in pahatpawal