देव दानवा नरे निर्मिले?

editorial dipti gangawne write article in pahatpawal
editorial dipti gangawne write article in pahatpawal

मानवी इतिहासात संस्कृतीच्या विकासाच्या एका टप्प्यावर माणसाच्या विचारविश्‍वात ईश्‍वर या संकल्पनेचा उदय झाला. इतिहासपूर्व काळात माणसाच्या जीवनावर पूर्णपणे अधिसत्ता गाजवणाऱ्या नैसर्गिक शक्तींनी माणसाला भयचकित केले होते. अग्नी, वायू, पर्जन्य अशा शक्ती तेव्हा माणसाच्या कह्यात अजिबातच आल्या नव्हत्या. आपल्यापेक्षा जे सामर्थ्यशाली आहे, त्याच्यासमोर शरणागती पत्करण्याच्या प्रवृत्तीमधून या शक्तींचे माणसाने दैवतीकरण केले. त्यांना खूष करण्यासाठी किंवा त्यांना शांत ठेवण्यासाठी त्यांना काही ना काही अर्पण करून त्यांची या ना त्या प्रकारे पूजा करण्याच्या प्रथा वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये निर्माण झाल्या. आपल्या ज्ञानेंद्रियांना प्रत्यक्षात न दिसणाऱ्या या शक्तींशी एक प्रकारचे नाते निर्माण करण्यासाठी त्यांना कल्पनेनेच मानवी रूप दिले गेले एवढेच नव्हे, तर क्रोध, अभिलाषा, लोभ, मोह अशा मानवी भावनाही त्यांना बहाल केल्या गेल्या. त्यामुळेच सर्व संस्कृतींच्या पुराणकथांमध्ये अशा दैवतांनी या भावनांना बळी पडून माणसाशी किंवा एकमेकांशीही केलेले संघर्ष चित्रित केले गेले आहेत.

या काळातील ही दैवते त्यांच्या अतिमानवी शक्तीमुळे माणसांपेक्षा वरच्या स्तरावरची वाटली, तरी ती नैतिकदृष्ट्या असल्याचे दिसत नाही. स्त्रीसौंदर्याने मोहित होऊन त्या स्त्रीला वश करण्यासाठी फसवणुकीचे मार्ग उपयोगात आणण्याच्या देवांच्या कथांमधून हे स्पष्ट होते. असे देव खरोखरच ज्यांच्यावर श्रद्धा ठेवावी, ज्यांची भक्ती करून त्यांना शरण जावे असे होते, असे मानता येत नाही; पण विश्‍वात आपल्यापेक्षा श्रेष्ठ जीव असू शकतात, ही गोष्ट मात्र या कथांमधून माणसाच्या मनावर बिंबवली गेली. माणूस म्हणून आपल्यामध्ये असलेल्या त्रुटी, आपल्या मर्यादा आणि अपुरेपणा यांचे स्पष्ट भान आल्यानंतर, सर्व दृष्टींनी परिपूर्ण, कुठल्याही प्रकारचे दोष, कमतरता, उणिवा, मर्यादा नसलेल्या अस्तित्वाचा शोध सुरू झाला. माणूस सान्त असला, तरी तो अनंताशी नाते जोडू शकतो, त्याला जाणून घेऊन शकतो, असा विश्‍वास काही माणसांच्या मनात निर्माण झाला. यामधूनच ‘ईश्‍वर’ ही संकल्पना विकसित होऊ लागली. या विकासक्रमात ईश्‍वर एक आहे की अनेक? ईश्‍वराचे आणि जगाचे नाते नक्की काय स्वरूपाचे आहे? ईश्‍वराचे माणसाच्या जीवनात नक्की काय स्थान आहे आणि ते काय असावे या आणि अशा प्रकारच्या इतर प्रश्‍नांचा खूप ऊहापोह केला गेला आहे. या प्रश्‍नांना दिली गेलेली उत्तरे अभ्यासणे रंजक तर आहेच; पण ईश्‍वराबद्दलच्या आपल्या कल्पना, मते, विचार तपासून बघण्यासाठी गरजेचेही आहे.
 ईश्‍वर हा अनेकांच्या श्रद्धेचा विषय असला, तरी आपल्या श्रद्धांची बुद्धीच्या माध्यमातून चिकित्सा होऊच शकत नाही, असे मानणे धोकादायक आहे. सगळ्याच श्रद्धा ‘अंध’ नसतात, काही श्रद्धा डोळस असू शकतात, असे आपण मानत असू, तर विवेकाची कास धरण्याखेरीज गत्यंतर नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com