dr keshav sathye
dr keshav sathye

डिजिटल महामार्गावरील धोक्‍याची वळणे

संपर्क माध्यमे गगनभरारी घेत असताना, तंत्रज्ञानाच्या खांद्यावर उभ्या असलेल्या समाजमाध्यमातील काही दुष्ट आणि विकृत चाळ्यांमुळे सारे समाजजीवन ढवळून निघत आहे. त्यामुळे आधुनिक माध्यमाच्या या आव्हानाला पेलायचे कसे, असा प्रश्न समाजधुरिणांसमोर उभा आहे.

रिलायन्स उद्योग समूहाने नुकतीच स्थिरजोडणी ब्रॉड बॅंडच्या योजनेची घोषणा केली आणि भल्याभल्या स्पर्धक कंपन्यांची झोप उडाली. ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान वापरून पहिल्या टप्प्यामध्ये देशातील ११०० शहरांमध्ये वेगवान इंटरनेट सुविधा यातून देण्याची ही योजना आहे. एका अत्याधुनिक आभासी जगाची निर्मिती करण्याचा हा मानस आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवी ओळख करून देईल असा विश्वास व्यक्त होत आहे. हे अगदी खरे आहे की जगाच्या स्थिरजोडणी इंटरनेट नकाशावर आपण खूप मागे आहोत. आपण आहोत १३४ व्या स्थानावर. या दुबळ्या पायाभूत सुविधांमुळे ‘डिजिटल इंडिया’ हे उद्दिष्ट डळमळीत होत असताना या योजनेसाठी आतापर्यंत अडीच लाख कोटी रुपये खर्च करून‘रिलायन्स’ने ही आशा पुन्हा पल्लवित केली आहे. इकडे नोएडामध्ये ‘सॅमसंग’चा जगातला सर्वात मोठा विस्तारित स्मार्ट फोन प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. आता तेथे दरमहा एक कोटी वीस लाख मोबाईल फोनची निर्मिती होणार आहे. कारण भारत ही जगातली सर्वात मोठी मोबाईलची बाजारपेठ असून जगातल्या एकूण विक्रीपैकी दहा टक्के फोन एकट्या भारतात विकले जातात. २०१७ मध्ये हा आकडा २९.९ कोटी इतका होता. संपर्क माध्यमाची ही गगनभरारी आपल्याला नेमके कुठे घेऊन जाणार आहे हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे. कारण केवळ भौतिक सुख-साधनांमध्ये वाढ एवढ्या मर्यादित अर्थाने विकास या संकल्पनेकडे पाहता येत नाही, तर यात मानवी आचार-विचार, नीतीमूल्ये आणि सौहार्दता अपेक्षित असते. कायदा- सुव्यवस्थेचे पालन आणि एकूण निरोगी सामाजिक सांस्कृतिक वातावरण असेल तरच विकासाची फळे सर्वांना मिळतात. विकासाचे नगारे वाजत असताना तंत्रज्ञानाच्या खांद्यावर उभ्या असलेल्या समाजमाध्यमातील काही दुष्ट आणि विकृत चाळ्यांमुळे सारे समाजजीवन ढवळून निघते. तेव्हा या आधुनिक माध्यमाच्या या आव्हानाला पेलायचे कसे हा प्रश्न सर्वच समाजधुरिणांसमोर उभा आहे.

‘फेसबुक’, ‘ट्विटर’, ‘यूट्यूब’, ‘व्हॉट्‌सॲप’ ही अतिशय वेगवान माध्यमे आता सर्वव्यापी झाली आहेत. केवळ वैयक्तिक स्तरावरच नाही, तर संस्थात्मक पातळीवरही यांच्या मदतीने माहितीची देवाणघेवाण सुलभपणे होताना आपण पाहतो. मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांनीही याचे महत्त्व लक्षात घेऊन आभासी जगात त्यांच्या हातात हात घालून प्रवेश करून त्यांच्या सामाजिक मान्यतेवर एक प्रकारे शिक्कामोर्तब केले आहे. बहुतेक वृत्तपत्रांचे आणि वाहिन्यांचे ‘फेसबुक पेज’ आणि ‘ट्विटर हॅण्डल’ असल्यामुळे ही माध्यमे हळूहळू मुख्य प्रवाहात सामील होताना दिसत आहेत. पण संवादाची म्हणून ओळखली जाणारी ही माध्यमे गेल्या काही वर्षांत विसंवादाची माध्यमे म्हणून समोर येऊ लागली आहेत. मुले पळवणारी टोळी ही एक अफवा आपल्या देशातील नऊ राज्यांत तीस जणांचा बळी घेते हे कशाचे लक्षण आहे ? भयभीत आणि काहीतरी अघटित घडेल अशा आजारी मनोवस्थेला पोचलेला हा समाज आज हातात मोबाईल घेऊन फिरताना विलक्षण करुण दिसत आहे. झुंडीच्या झुंडीने जाऊन एखाद्या माणसाचे संशयाने तुकडे तुकडे केले, ही आता भीषण बातमी न राहता ती एक नित्याची बाब बनणे हे आपण मनाने दगड होत चालल्याचे लक्षण आहे. असे निर्विकार आणि असंवेदनशील बनणे हेही एक प्रकारचे क्रौर्यच आहे हे विसरून चालणार नाही. अफवा, खोट्या बातम्या पसरवल्या जातात यात केवळ ते करणारी संबंधित व्यक्ती किंवा गट केवळ जबाबदार नसतो, तर त्याला ते पसरवायला मदत करणारी अनुकूल यंत्रणा आणि राजकीय, सामाजिक परिस्थितीही तेवढीच जबाबदार असते.

अमेरिकेत, युरोपमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आपल्यापेक्षा बऱ्यापैकी आधी आले आहे, पण तिथे हे असले क्रूर आणि मद्दड तांडव सहसा पाहायला मिळत नाही. जागतिक पटलावर महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहात असताना समाज म्हणून आपली ‘इयत्ता’ किती खाली जात चालली आहे याचा हिशेब कोण ठेवणार ? अर्थात समाजमाध्यमाचा दुरुपयोग टाळण्यासाठी सरकार बरेच उपाय करत आहे.‘फेसबुक’, ‘व्हॉट्‌सॲप’ यांना तंबी देऊन झाली, त्यांनीही काही नव्या यंत्रणा कार्यान्वित करून अशा बातम्यांना प्रतिबंध कसा करता येईल यासाठी सहकार्य देण्यास सुरवात केली आहे. ‘सर्व काही आत्ता आणि इथेच’ ही सवय या नव्या प्रणालीने आपल्याला लावली आहे वाट पाहण्याचा रोमान्स या तंत्रज्ञानाने आपल्याकडून केव्हाच हिरावून घेतला आहे. मास्तरांनी चापट मारली कर आत्महत्या, बाबांनी ‘मोबाईल नंतर घेऊ’ असे म्हटले, तर दे जीव, मैत्रीण दुसऱ्याबरोबर बोलली भोसक त्याला, मार्क कमी पडले घे फास... डेटा पॅकपेक्षाही स्वस्त झालेल्या आपल्या जगण्याला या आधुनिक संपर्क माध्यमाचे नेमके काय करायचे हे कळणार नसेल आणि अधिकाधिक संकुचित होऊन आपण मार्गक्रमण करणार असू तर ‘ब्रॉड’बॅंड निरर्थक आहे. पण हे असे असले, तरी अधिक वेगवान इंटरनेट येत राहणारच आहे. समाज दूषित होतोय, हिंसक होतोय म्हणून आधुनिक यंत्रणा नाकारणे हे साप सोडून भुई धोपटल्यासारखे आणि वाईट बातमी आणली म्हणून पोस्टमनला दोष दिल्यासारखे होईल. यासाठी सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, प्रसारमाध्यमे, शिक्षण संस्था यांनी आपत्ती निवारण कार्यक्रमासारखा हा विषय प्राधान्याने हाताळायला हवा. सरकार काही करेल या आशेवर न राहता यातून उद्भवणाऱ्या शारीरिक, मानसिक संकटांची जाणीव करून देणाऱ्या साहित्याची प्रादेशिक भाषेत निर्मिती मोठ्या प्रमाणात हाती घ्यायला हवी.
शाळा, महाविद्यालयांमध्ये या संबंधीच्या धोक्‍याच्या सूचना वारंवार शिक्षकांनी वर्गात द्यायला हव्यात. या माध्यमातून सकारात्मक काय काय चांगले मिळते याची उजळणी व्हायला हवी. हा एक गिगा बाईट, दोन गिगा बाईट वेग घेऊन आपण कोणत्या खाईत चाललो आहोत याचीही आपल्याला कल्पना नाही. या माध्यमाच्या विळख्यात अजून न गुरफटलेली नवी पिढी आपल्याला वाचवायची आहे. तिचे उद्‌बोधन हे मोठे आव्हान आपल्याला स्वीकारावे लागणार आहे. अजूनही आपली कुटुंबव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली नाही. त्यामुळे पालकांना यात खूप काही करता येण्यासारखे आहे. मुलांच्या दैनंदिनीवर/मोबाईल वापरावर थोडे लक्ष ठेवले, तरी अनेक संभाव्य अपघात आपण टाळू शकू. वेगाने आदळणारे तंत्रज्ञान आणि सुख-सुविधांची रेलचेल आपल्या कुटुंबाला आणि समाजाला विस्कळित तर करणार नाही ना याची काळजी प्रत्येकाने घेतली तर हा विकासाचा ‘मेगा हायवे’ आपला जीवनप्रवास नक्की सुखाचा करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com