अवकाश स्थानकाचे कोसळणे...

dr prakash tupe
dr prakash tupe

गेली सात वर्षे पृथ्वीभोवती फिरणारे एक चिनी अवकाश स्थानक लवकरच पृथ्वीवर कोसळणार आहे. ते नक्की कोठे व कधी कोसळणार आहे, याचा अंदाज नसल्याने त्याविषयी उत्सुकता नि चिंताही आहे.

अं तराळात फिरणारी एक भलीथोरली मानवनिर्मित वस्तू येत्या तीन-चार दिवसांत पृथ्वीवर कोसळणार आहे. ही वस्तू म्हणजे ‘टीयॉनगाँग-१’ हे चिनी बनावटीचे अवकाश स्थानक असून, ते गेली सात वर्षे पृथ्वीभोवती फिरत आहे. ते एखाद्या बसएवढे असून, त्याचे वजन साडेआठ टन आहे. गेल्या दहा वर्षांत प्रथमच एवढ्या मोठ्या वजनाची वस्तू पृथ्वीवर कोसळत आहे. हे अवकाश स्थानक नक्की कधी व कोठे कोसळेल याचा अंदाज चिनी शास्त्रज्ञांना नाही, कारण त्यांचा या स्थानकाशी संपर्क तुटला आहे. हे स्थानक समुद्रातच कोसळेल व त्याचा बराचसा भाग अंतराळातच जळून नाहीसा होईल, असे ‘चायनीज नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनने जाहीर केले आहे. मात्र स्थानकाचे काही जड भाग न जळता पृथ्वीवर कोसळण्याची शक्‍यता असल्याने जगभरातील शास्त्रज्ञ या स्थानकाच्या अखेरच्या पृथ्वीप्रदक्षिणांवर लक्ष ठेवून स्थानक कधी व कोठे कोसळेल याचा अंदाज घेत आहेत.

सध्या अंतराळात अमेरिका, रशिया यांच्यासह १४ देशांनी मिळून बांधलेले ‘आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक’ फिरत आहे. चीनलाही स्वतःचे स्थानक २०२३ पर्यंत अंतराळात सोडावयाचे असल्याने त्यांनी स्थानकाची छोटी आवृत्ती ‘टीयॉनगाँग’ नावाने २०११ मध्ये अंतराळात प्रक्षेपित केली. हे स्थानक दंडगोलाकार असून १०.४ मीटर लांबीचे व ३.४ मीटर व्यासाचे आहे. स्थानकाचे दोन खोल्यासारखे भाग असून एका भागात सौरपंखे, दिशादर्शक व वेग नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेसारखे भाग आहेत, तर दुसऱ्या भागात प्रयोग करण्याची व दोन अंतराळवीरांना राहण्याची जागा आहे. या स्थानकाचा मुख्य उद्देश होता, की दुसरी याने स्थानकाला जोडण्याचा सराव करणे व मोठ्या स्थानकाच्या बांधकामासाठीचा अनुभव मिळविणे. या उद्देशाने प्रथम ‘शेंझू-८’ अंतराळयान या स्थानकास जोडण्याचा यशस्वी प्रयत्न नोव्हेंबर २०११ मध्ये करण्यात आला. त्यानंतर ९ व १० ‘शेंझू’ याने स्थानकाशी जोडण्यात आली. तीन मानवी अवकाश मोहिमानंतर २०१६ मध्ये स्थानकास ‘स्लीप’ मोडमध्ये नेऊन तात्पुरती विश्रांती देण्यात आली. स्थानक २०१७ मध्ये पृथ्वीकडे परत आणून त्यास जलसमाधी देण्याची योजना चिनी शास्त्रज्ञांनी आखली होती; मात्र स्थानकातील बॅटरी चार्जरच्या घोटाळ्यामुळे स्थानकाचा पृथ्वीशी संपर्क तुटला. चीनने ही गोष्ट काही काळ जगापासून लपवून ठेवली होती; मात्र एका हौशी आकाशनिरीक्षकाने स्थानकाची कक्षा तपासून जाहीर केले, की चिनी शास्त्रज्ञांचा स्थानकाशी संपर्क तुटला आहे. शेवटी चिनी शास्त्रज्ञांना जाहीर करावे लागले, की संपर्काअभावी त्यांचे स्थानक हवे तेव्हा व हवे तेथे उतरू शकत नाही व ते लवकरच पृथ्वीवर कोसळेल.  

अंतराळयान पृथ्वीवर कोसळण्याची ही काही पहिलीच घटना नाही. अमेरिकेची ८५ टन वजनाची ‘स्कायलॅब’ १९७९ मध्ये पृथ्वीवर कोसळली होती. अमेरिकी शास्त्रज्ञांनी ‘स्कायलॅब’ समुद्रात कोसळविण्याचा प्रयत्न केला; मात्र या लॅबचे काही वजनदार भाग न जळता ऑस्ट्रेलियामधील पर्थजवळ पडले. त्या वेळी ‘स्कायलॅब’ कोसळून मोठी जीवित व वित्तहानी होईल, अशी जगभर घबराट पसरली होती. सुदैवाने ‘स्कायलॅब’चे बरेचसे भाग समुद्रात कोसळले व उरलेले ऑस्ट्रेलियाच्या निर्जन भागात पडले. अमेरिकेच्या स्थानकाप्रमाणेच रशियाने ‘मीर’ अवकाश स्थानक मार्च २००१ मध्ये पृथ्वीवर कोसळविले होते. ‘मीर’देखील प्रचंड मोठे म्हणजे १३० टनी स्थानक होते व त्याच्या कोसळण्यानेही हानी झाली नव्हती. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला रसद पुरवणारी यानेही याचप्रमाणे नियोजनबद्धरीत्या दक्षिण पॅसिफिक समुद्रात कोसळून नष्ट केली जातात; मात्र याने निकामी झाली किंवा त्यांच्या संपर्क यंत्रणा बिघडल्या, तर मात्र या मानवनिर्मित वस्तू पृथ्वीभोवतालच्या वातावरणात गटांगळ्या खात कोठेही कोसळू शकतात. गेल्या काही वर्षांपासून पृथ्वीवर दरवर्षी २०० ते ४०० अवकाशयानांचे व रॉकेटचे निकामी भाग कोसळत आहेत. यातील बरेचसे भाग जळून नाहीसे होतात; मात्र काही जड व धातूंचे भाग पृथ्वीवर ७१ टक्के पाणी असल्याने पाण्यात पडतात. आतापर्यंत फक्त एकदाच म्हणजे १९९७ मध्ये अंतराळातून कोसळलेल्या रॉकेटच्या तुकड्यामुळे एक महिला जखमी झाली होती. याचमुळे चिनी स्थानकामुळे कोणीही जखमी होणार नाही, असे शास्त्रज्ञांना वाटते.
चिनी स्थानक २०११ मध्ये पृथ्वीपासून ३५० कि.मी. उंचीवरून फेऱ्या मारत होते. त्याची कक्षा ढासळत असल्याने सध्या ते २१० कि.मी. उंचीवरून पृथ्वीभोवती दर ९० मिनिटांना प्रदक्षिणा घालत आहे. या स्थानकावर रडार व ऑप्टिकल सेन्सरच्या मदतीने लक्ष ठेवले जात आहे. स्थानकाच्या अखेरच्या काळात त्याची कक्षा कशी असेल त्यावर ते कोठे व कसे कोसळेल याचा अंदाज बांधता येईल.
शास्त्रज्ञांच्या मते, हे स्थानक ४३ अंश उत्तर ते ४३ अंश दक्षिण अक्षांशमधील भागात कोसळेल. याचा अर्थ असा, की ते दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका, दक्षिण आशिया, न्यूझीलंड व चीन दरम्यान कोसळण्याची शक्‍यता आहे. स्थानकाचा सध्याचा वेग सेकंदाला ७ कि.मी. एवढा असून, ते आठवड्याला ६ कि.मी. वेगाने पृथ्वीकडे ढासळत आहे.

चिनी स्थानक पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या भागात म्हणजे १२० कि.मी. उंचीवर पोचेल, तेव्हा ते त्याच्या मृत्यूच्या दारात उभे असेल. या वेळी सर्वप्रथम स्थानकावरील सौरतावदाने तुटून जाऊन स्थानक अनियंत्रित पद्धतीने कोसळू लागेल. एखादा कांदा सोलला जावा, तसे स्थानकाचे एक एक भाग सुटत जाऊन जळू लागतील. साधारणपणे ८० कि.मी. मीटर उंचीवर असताना स्थानकाचे तुकडे होऊ लागतील. प्रचंड उष्णतेने हे तुकडे तापून पेटतील व धातूंचे भाग वितळून कोसळत राहतील. जवळजवळ ७० कि.मी. भागातून हे जळते तुकडे पृथ्वीकडे झेपावतील. अखेरीस १५ ते २० किलोमीटर उंचीवर असताना मोठे व जड धातूचे भाग न जळता कोसळतील. याशिवाय स्थानकाचा सर्वांत आतील भागदेखील न जळता पडू शकेल. अंदाज असा आहे, की ८.५ टनी स्थानकाचे अवघे १०० किलोचे भाग पृथ्वीवर कोसळतील. स्थानकात असलेले ‘हायड्राझीन’ हे विषारी इंधनही पृथ्वीवर कोसळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे रशियन शास्त्रज्ञांनी स्थानकाच्या तुटलेल्या तुकड्यापासून दूर राहण्याचा सल्ला लोकांना दिला आहे.

चिनी स्थानकाच्या या प्रकारच्या ‘मृत्यू’मूळे शास्त्रज्ञांपुढे अंतराळात वाढत चाललेल्या उपग्रहांच्या समस्येवर उपाय शोधून काढण्याचे मोठे आव्हान ठाकले आहे, हे निश्‍चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com