तपासणी मंगळाच्या अंतरंगाची

डॉ. प्रकाश तुपे
गुरुवार, 24 मे 2018

अमेरिकेने पाठविलेले ‘इनसाइट’ हे यान पहिल्यांदाच मंगळाच्या अंतरंगाविषयी माहिती मिळविणार आहे. ही मोहीम अनेक दृष्टीने महत्त्वाची असून, अंतरंगाच्या अभ्यासामुळे मंगळासारख्या ग्रहगोलांच्या निर्मितीवर नवा प्रकाश पडणार आहे.

अमेरिकेने पाठविलेले ‘इनसाइट’ हे यान पहिल्यांदाच मंगळाच्या अंतरंगाविषयी माहिती मिळविणार आहे. ही मोहीम अनेक दृष्टीने महत्त्वाची असून, अंतरंगाच्या अभ्यासामुळे मंगळासारख्या ग्रहगोलांच्या निर्मितीवर नवा प्रकाश पडणार आहे.

मं गळ हा सूर्यमालेतील सर्वांत चर्चेत असणारा ग्रह. अवकाशयानांचे युग सुरू झाल्यापासून सर्वांत जास्त याने मंगळाकडे पाठविली गेली. तब्बल ७० यानांनी मंगळाचे निरीक्षण केले असून, त्यांना मंगळ तांबूस, कोरडा ठणठणीत, निर्जीव व जीवसृष्टी नसलेला ग्रह दिसला. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने ‘इनसाइट’ हे अवकाशयान मंगळाकडे नुकतेच रवाना केले असून, साडेसहा महिन्यांत ते मंगळावर उतरेल. आतापर्यंतच्या यानांनी मंगळाभोवतालच्या वातावरणाचे व पृष्ठभागाचे निरीक्षण केले. एवढेच नव्हे तर चार रोव्हर्स (बग्ग्या) मंगळावर उतरल्या व त्यांनी तेथील दगडमातीचे परीक्षण केले. अमेरिकेचे यान मात्र अगदी वेगळीच निरीक्षणे घेणार आहे. एखादा डॉक्‍टर रुग्णाला तपासतो, तसे ‘इनसाइट’ मंगळाची सखोल तपासणी करील, त्याचे तापमान तपासेल, त्याच्या हृदयाचे ठोके (थरथर) देखील मोजेल. थोडक्‍याच, पहिल्यांदाच मंगळाच्या अंतरंगाविषयी माहिती मिळविण्याचा प्रयत्न ‘इनसाइट’ करणार आहे. कदाचित याचमुळे या मोहिमेविषयी सर्वत्र औत्सुक्‍य दिसते.

‘नासा’ या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने ‘डिस्कव्हरी’ कार्यक्रमांतर्गत २०१२ मध्ये ‘इनसाइट’ मोहिमेला हिरवा कंदील दाखविला. या मोहिमेसाठी ‘नासा’ ८१.४ कोटी डॉलर खर्च करीत असून, ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी यांनी या मोहिमेतील काही संयंत्रे तयार केली असून, त्यांनी १८ कोटी डॉलरच्या खर्चाचा भार उचलला आहे. या यंत्रापैकी सर्वांत महत्त्वाचे यंत्र मंगळभूमीवरच्या कंपाची (भूकंप, मार्सक्वेक) नोंद घेईल, तर दुसरे यंत्र मंगळाच्या पोटातील उष्णतेचा मागोवा घेईल. ‘नासा’ या मोहिमेत नव्या ‘नॅनोसॅटेलाइट’ची चाचणीही घेणार आहे. ‘इनसाइट’ यानाचे वजन ७२१ किलोग्रॅम असून, ते लॉकहीड मार्टिन स्पेस कंपनीने अवघ्या वर्षभरात त्याची बांधणी केली आहे. हे यान ६.१ बाय २ बाय १.४ मीटर आकाराचे असून, ते यापूर्वी मंगळाकडे पाठविलेल्या ‘फिनिक्‍स लॅंडर’सारखे आहे. या मोहिमेला मार्च २०१६ मध्ये प्रारंभ करण्याचा ‘नासा’चा प्रयत्न होता. मात्र भूकंपमापक यंत्र असलेली कुपी पूर्णपणे निर्वात नसल्याचे ध्यानात आल्याने मोहीम पुढे ढकलण्यात आली. मंगळ या वर्षी पृथ्वीजवळ येत असल्याने ‘इनसाइट’चे उड्डाण मे २०१८ मध्ये करून यान मंगळावर २६ नोव्हेंबर रोजी उतरविण्याचा घाट घातला गेला. सर्वसामान्य लोकांना या मोहिमेविषयी आकर्षण वाटावे म्हणून ‘नासा’ने लोकांना आवाहन केले, की त्यांनी त्यांची व त्यांच्या प्रियजनांची नावे पाठवावीत. ही सर्व नावे मायक्रो चीपवर कोरून, ती चीप यानावर बसविली गेली. जवळजवळ २४ लाख लोकांनी आपली नावे ‘इनसाइट’बरोबर मंगळाकडे पाठविली आहेत. ‘इनसाइट’मध्ये मंगळाच्या अंतरंगाचा अभ्यास करण्यासाठी प्रमुख अशी चार यंत्रे आहेत. यातले सर्वांत प्रमुख आहे ‘सीस’ की जे मंगळावरचे कंप (भूकंप) मोजणार आहे. यापूर्वी मंगळावरचे कंप मोजण्यासाठीचे यंत्र मंगळाकडे पाठविलेल्या ‘व्हायकिंग २’ यानावर होते. मात्र हे यंत्र जमिनीवर न ठेवता यानावर बसविलेले असल्यामुळे त्याचा हवा तसा उपयोग झाला नाही. मंगळावर फार मोठे भूकंप होण्याची शक्‍यता नसली, तरी त्यावर अधूनमधून पडणाऱ्या उल्कापाषाणामुळे व मंगळाच्या आकुंचनामुळे मंगळावर कंप नक्कीच निर्माण होत असतात. मात्र ते फारच कमी तीव्रतेचे म्हणजे ६-७ रिश्‍टर स्केलचे असतात. ‘इनसाइट’वर असलेले ‘सीस’ अतिशय संवेदनशील असून, ही यंत्रे कित्येक किलोमीटर अंतरावरची कंपने मोजू शकतील. शास्त्रज्ञांच्या मते दोन वर्षांच्या मोहिमांच्या काळात १० ते १०० कंपने ‘सीस’ मोजेल. मंगळाच्या पोटातील हालचाली मोजून केंद्र भागातील पाणी किंवा जीवसृष्टीसाठी पोषक जागेचा अंदाज शास्त्रज्ञांना बांधता येईल.
‘इनसाइट’वरचे दुसरे महत्त्वाचे यंत्र आहे उष्णता मोजण्याचा प्रोब. हा एक प्रकारचा थर्मामीटर आहे. आतापर्यंत मंगळाच्या पृष्ठभागावरचे तापमान मोजले गेले. मात्र मंगळाच्या पृष्ठभागाखाली उष्णता कशी वाहत असावी, याचा अंदाज नव्हता. ‘एचपीक्‍यूब’ नावाचे यंत्र या मोहिमेत पाठविलेले आहे. या यंत्राचा प्रोब मंगळाच्या पृष्ठभागावर पाच मीटर खोलीचे भोक पाडून आतील भागाच्या तापमानाची नोंद करील. खोली वाढत जाते, तसे तापमान कसे बदलत जाईल याची निरीक्षणे घेऊन मंगळाच्या अंतरंगातील उष्णता कशी वर येते याचा अंदाज शास्त्रज्ञांना येईल. मंगळाच्या पोटात उष्ण मॅग्मा किंवा ज्वलंत ज्वालामुखीच्या अस्तित्वाच्या खुणा आहेत काय याचा अंदाज या मोहिमेत घेतला जाईल. पृथ्वीप्रमाणे मंगळाच्या पोटात हालचाली होत नसल्याने मंगळावरचे दगडधोंड्यांचे ग्रह कसे बनले असावेत याविषयी शास्त्रज्ञांना मोलाची माहिती मिळू शकेल.

‘इनसाइट’वरचे तिसरे महत्त्वाचे यंत्र आहे ‘रीसे’ म्हणजे ‘रोटेशन अँड इंटिरियर स्ट्रक्‍चर एक्‍सपेरिमेंट’. या प्रयोगात पृथ्वी व मंगळावरील ‘इनसाइट’ यानाचे अंतर अचूकपणे रेडिओ संदेशाद्वारे काही वेळा मोजले जाईल. या अंतराचा उपयोग करून मंगळाचा अक्ष काहीसा थरथरत (वॉबल) आहे काय याचा अंदाज घेता येईल. या माहितीच्या आधारे मंगळाचा केंद्रभाग किती मोठा व कशाचा बनला असावा याची माहिती मिळू शकेल.

तंत्रज्ञानाच्या उत्तुंग झेपेचा एक अनोखा प्रयोग या मोहिमेत केला जाईल. दोन अतिशय छोटी याने ‘इनसाइट’बरोबर मंगळाकडे स्वतंत्रपणे पाठविण्यात आली आहेत. ब्रीफकेसच्या आकाराची व १० सें.मी. रुंदीची ही ‘मार्कोस’ याने मंगळाकडे जातील व ‘इनसाइट’ यान मंगळावर उतरतानाची माहिती पृथ्वीकडे पाठवतील. दळणवळणासाठी अशी छोटी याने वापरण्याचा हा पहिलाच प्रयोग ‘नासा’ करीत आहे.  

‘इनसाइट’ यान ५ मे २०१८ रोजी मंगळाकडे झेपावले. हे यान २०६ दिवसांत ४८.५ कोटी किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून २६ नोव्हेंबर रोजी मंगळाजवळ पोचेल. यानाचा वेग कमी केल्यावर ते मंगळाच्या पृष्ठभागाकडे कोसळू लागेल. या वेळी उष्णताविरोधक कवच, पॅराशूट व वेग कमी करणाऱ्या मोटार वापरुन ते मंगळावर त्याच्या विषुववृत्तांच्या उत्तरेकडच्या सपाट प्रदेशात उतरेल. त्यानंतर त्याच्या यांत्रिक हाताने मंगळावर कंपने मोजणारे भूकंपमापक व उष्णतामापक अलगदपणे ठेवेल. पुढील दोन वर्षांत ‘इनसाइट’ मंगळाच्या अंतरंगाचे निरीक्षण घेत राहील.

मंगळाची ही मोहीम अनेक दृष्टीने महत्त्वाची असून प्रथमच मंगळासारख्या ग्रहाचा केंद्रभाग जाणून घेऊन या प्रकारच्या ग्रहांचा जन्म कसा झाला व ते कालांतराने कसे बदलत गेले याचा अंदाज शास्त्रज्ञांना घेता येईल. इतर ताऱ्यांभोवती घन ग्रह आढळल्यास त्याच्या उत्क्रांतीविषयीच्या अटकळी ‘इनसाइट’च्या निरीक्षणावरून बांधता येतील. या प्रकारच्या ग्रहांभोवतालचे वातावरण कसे होते, आता ते कसे झाले व त्याचा परिणाम म्हणून जीवसृष्टी उदयाला येऊ शकते काय, याविषयीसुद्धा शास्त्रज्ञांना भाष्य करता येईल. एकंदरीतच पुढील दोन-अडीच वर्षांत ‘इनसाइट’ यान मंगळाचे अंतरंग अभ्यासून मंगळासारख्या ग्रहगोलांच्या निर्मितीवर नवा प्रकाश टाकेल हे नक्की.

Web Title: editorial dr prakash tupe usa insight satelite