देवाने दिलेली भेट

देवाने दिलेली भेट

ना गपूरमध्ये उमरेडला जाणाऱ्या रस्त्यावर ताजुद्दीनबाबाचा दर्गा म्हणून ओळखले जाणारे धार्मिक स्थळ आहे. श्रद्धाळूंची इथे कायम वर्दळ असते. सगळ्या धार्मिक स्थळांच्या परिसरात असलेले वातावरण इथेही असते. हार, फुलांची दुकाने, मिठाई, फळे, कापड, चादरी यांची दुकाने आहेत आणि भिकारीसुद्धा. एकदा सूटबुटातील एक व्यक्ती ऑडी गाडीतून उतरली. उंचपुरे रुबाबदार व्यक्तिमत्त्व. गळ्यात सोन्याची चेन, दोन्ही हातांच्या सर्व बोटांमध्ये हिरेजडित अंगठ्या, सोन्याचा पट्टा असलेले घड्याळ, अशी नवकोटनारायण दिसणारी व्यक्ती उतरल्याबरोबर भक्तगणांची नजर त्यांच्याकडे गेली. भिकाऱ्यांचीही गेली. हार-फुलांच्या दुकानात पोचेपर्यंत एक-एक करून भिकाऱ्यांची संख्या वाढत गेली. त्याने दहा-दहाच्या नोटा ठेवल्या होत्या; त्या संपल्या तरी भिकारी पिच्छा सोडेनात. तो वैतागला. चिडून फूलवाल्याला म्हणाला, ‘‘अरे, किती भिकारी येतात इथे. कुठून गोळा होतात?’’ फूलवाला हसला. बाजूला भगवी वस्त्रे घातलेली एक संन्याशीसदृश व्यक्ती होती. ती व्यक्तीसुद्धा हसली व म्हणाली, ‘‘तुम्ही खरे बोलता. खरंच इथे खूप भिकारी येतात. मी तर म्हणेन, की बहुतांश भिकारीच असतात. कुणी काय मागते एवढाच काय तो फरक. कुणाला नोकरीत बढती हवी असते. कुणाला मूल हवे असते. कुणाला मुलीनंतर मुलगा हवा असतो. कुणाला परीक्षेत यश हवे असते. कुणाची मुलगी उजवायला हवी असते. प्रत्येकाला काहीतरी हवे असते. कुणी पायी येतो. कुणी रिक्षाने, कुणी बसने येतो. कुणी दुचाकीवर, एखादा तुमच्यासारखा स्वत:ची आलिशान गाडी घेऊन येतो.’’
तो नवकोटनारायण काही बोलला नाही. खजील झाला असावा. कदाचित विचारात पडला असावा.

तो संन्यासी खरंच माझ्यासाठी नवा धडा शिकवून गेला. मी स्वत: धार्मिक नाही. परगावच्या पाहुण्यांना दर्शनाला जायचे होते म्हणून मी ‘चक्रधरा’च्या भूमिकेतून आलो होतो. माझ्या मनात विचारचक्र सुरू झाले. खरेच देवाच्या दर्शनाला जाणारे किती लोक निष्काम भावनेने जात असतील? कुठली तरी आशा-अपेक्षा, मागणी घेऊन जाणारेच जास्त असतात. क्वचित कुणी कदाचित इच्छापूर्ती झाली म्हणून आभारप्रदर्शनासाठी जात असतील.
कुणी नवस बोलतो, तेव्हा माझा मित्र म्हणतो, की ती लाच असते. आमची इच्छा पूर्ण झाली, की सव्वा किलो पेढे वाहीन. कुणी सोनसाखळी, कुणी मुकुट... एवढ्या मोठ्या जगदीश्‍वराला खरेच सव्वा किलो पेढ्याची आस असेल? सोनसाखळीसाठी तो कुणाचे काम करेल?
मध्यंतरी इंग्रजीतील एक छान वचन वाचनात आले होते. ‘आज तुम्ही जे आहात ती तुम्हाला देवाने दिलेली भेट आहे. तुम्ही पुढे जे काही भविष्य घडवाल, ती तुमच्यातर्फे देवाला दिलेली भेट असेल.’ देवासाठी साधा उपाससुद्धा करताना सोयीचा मार्ग स्वीकारणारे आहेत. माझ्या मते, उपास करणे म्हणजे संकल्प करणे व नेटाने आत्मबळ वापरून तो पूर्ण करणे. यामुळे आत्मविश्‍वास वाढायला मदत होते. ईश्‍वरभक्ती कुणी करायची की नाही, कशासाठी करायची, कशी करायची हा प्रत्येकाच्या मानसिकतेचा भाग आहे. पण त्यातून आत्मबळ खच्ची होऊ नये. आपली इच्छापूर्ती, अपेक्षापूर्ती ही बाहेरची व्यक्ती किंवा बाह्य शक्तीवर विसंबून नसावी. जे काही सांगायचे व ठरवायचे ते संपूर्ण विश्‍वासाने आपल्या मनाला सांगितले जावे. त्यामुळे तुमच्या इच्छेची दुर्दम्य इच्छा होते. मनाची शक्ती जागी झाली, की कठीण वाटणाऱ्या गोष्टी सोप्या होतात. हा स्वत:मधील विश्‍वास जागा करणे महत्त्वाचे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com