अपघात, चूक व अपराध

डॉ. श्रीकांत चोरघडे
बुधवार, 14 मार्च 2018

जुन्या काळी पालक व शिक्षक यांची शिस्त लावण्याची पद्धत वेगळी होती. आमच्या वयातील बहुतेकांना पालकांच्या व शिक्षकांच्या हातचा मार, उठाबशा काढणं, असे प्रकार नक्कीच आठवत असतील. रागावणं, मारणं हा पालकत्वाचा व शिक्षणाचा भाग होता आणि रागावून घेणं, शिक्षेला सामोरं जाणं, मार खाणं हा शिक्षणाचा, शिस्तीचा भाग, असं पाल्य व विद्यार्थी गृहीत धरत. मुळात लहानपणी मुलं चुका करतात, त्या मुद्दाम करीत नाहीत. एक तर ज्ञानाचा व अनुभवाचा अभाव असल्यानं कुठलंही काम करताना अनवधानामुळे चूक होणं अपरिहार्य असतं. ते समजून घेतलं, तर पालकांना राग येणार नाही. पण, मुद्दाम केलं, अशी धारणा झाली की रागावलं जातं.

जुन्या काळी पालक व शिक्षक यांची शिस्त लावण्याची पद्धत वेगळी होती. आमच्या वयातील बहुतेकांना पालकांच्या व शिक्षकांच्या हातचा मार, उठाबशा काढणं, असे प्रकार नक्कीच आठवत असतील. रागावणं, मारणं हा पालकत्वाचा व शिक्षणाचा भाग होता आणि रागावून घेणं, शिक्षेला सामोरं जाणं, मार खाणं हा शिक्षणाचा, शिस्तीचा भाग, असं पाल्य व विद्यार्थी गृहीत धरत. मुळात लहानपणी मुलं चुका करतात, त्या मुद्दाम करीत नाहीत. एक तर ज्ञानाचा व अनुभवाचा अभाव असल्यानं कुठलंही काम करताना अनवधानामुळे चूक होणं अपरिहार्य असतं. ते समजून घेतलं, तर पालकांना राग येणार नाही. पण, मुद्दाम केलं, अशी धारणा झाली की रागावलं जातं. प्रसंगी मारलंही जातं. याशिवाय कुठंतरी लहानपणी अशी रागावणी, बोलणी अनुभवली असली, की मनाविरुद्ध घडलं की राग येणं अंगवळणी पडतं.  

एक आई चार-पाच वर्षांच्या मुलाला घेऊन आली होती. ‘‘डॉक्‍टर, हा खूप चिडतो. कुणावरही हात उगारतो. याचे बाबा असेच रागीट आहेत. आजोबाही रागीट आहेत. आनुवंशिक असेल का हो?’’ तिला समजावून सांगावं लागलं, की हे आनुवंशिक नाही; अनुकरणानं आलेलं आहे. मनुष्य मूळचा एक प्राणी आहे. तो संस्कारांमुळे आपल्या मर्जीनुसार भावना, विचार व कृती यावर नियंत्रण करायला शिकला म्हणून माणूस म्हणायचा. नाही तर मनाविरुद्ध घडलं, की कुत्रा भुंकणार, मांजर फिसकारणार, गाय शिंगं उगारणार. पण, मानवाला राग आला तरी चेहऱ्यावर व कृतीमध्ये दिसू देणार नाही किंवा चेहऱ्यावर स्मित आणेल, हे घडू शकतं.  नव्या युगामध्ये तर याला फारच महत्त्व आलेलं आहे. जो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो, गरजेनुसार जाणीवपूर्वक कृती करू शकतो, तो भावनिकरीत्या बुद्धिमान समजला जातो. ही भावनिक बुद्धिमत्ता ज्याच्याजवळ जितकी जास्त, तितका त्याचा यशाचा आलेख जास्त, असं समीकरण झालेलं आहे.

एका बालरुग्णाच्या घरी गेलो होतो. त्यानं हट्ट धरला, ‘‘डॉक्‍टरांना मी पाणी देणार.’’ चार वर्षांचा होता तो. पाण्याचा पेला त्याच्या हातून निसटला व फुटला. त्याचे वडील शांत होते. कावऱ्याबावऱ्या झालेल्या मुलाला ते म्हणाले, ‘‘अरे बेटा, कुछ नहीं होता. आधी चप्पल घालून ये. मग त्या काचा कचऱ्याच्या डब्यात टाकून दे व काकांसाठी दुसऱ्या पेल्यात पाणी आण. कांताबाईंना जागा पुसून घ्या म्हणावं.’’
असं फार कमी घरी घडतं. पाणी सांडलं, पेला फुटला म्हणून रागावलं जातं. वास्तविक अनुभव नसल्यामुळं, स्नायूंच्या अपरिपक्वतेमुळं असं घडलं होतं. चूकही नव्हती. तो छोटा अपघात म्हणता येईल. या वयात मुलं चुकाही करतात; पण त्याला अपराध समजून रागावलं, मारलं जातं.

अभ्यासामधील चुकासुद्धा अपरिपक्वतेमुळे असतात. त्यासाठीही रागावणं, शिक्षा नको. पुन:पुन्हा समजावून देणं, हा उपाय आहे. अशा अननुभवाच्या चुका मोठ्या वयाच्या व्यक्तीकडूनसुद्धा घडतात. घरी येणारी नवी सून, नोकरीवर नुकतीच लागलेली व्यक्ती यांच्याकडून चुका घडणं अपरिहार्य असतं. त्यांना सांभाळून घेण्याची जबाबदारी वडीलधाऱ्यांची, अनुभवी व्यक्तींची असते. हिंदी भाषक प्रदेशात वाढलेले माझे काका म्हणत-
क्षमा बड़न को चाहिये
छोटों को उत्पात.

Web Title: editorial dr shrikant chorghade write article in pahatpawal