आत्मभान

editorial dr shrikant chorghade write article in pahatpawal
editorial dr shrikant chorghade write article in pahatpawal

त्या घटनेला ५० वर्षे झाली असतील. त्या काळी विविध संसर्गजन्य आजार आजच्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त होते. गोवर, कांजण्या, डांग्या खोकला, धनुर्वात, घटसर्प या आजारांनी ग्रस्त बालरुग्ण बऱ्याच संख्येने असत. राजयक्ष्मा किंवा ‘टीबी’ने ग्रस्त रुग्णही बरेच असायचे. त्यावर इलाज म्हणजे रोज इंजेक्‍शन द्यावे लागे. किमान एक महिना व रोगाचा भर जास्त असेल तर साठ. असाच तीन-चार वर्षांचा एक रुग्ण रोज इंजेक्‍शनसाठी यायचा. कधी वडील, कधी आई; तर कधी आजोबा त्याला घेऊन यायचे. रोजचे इंजेक्‍शन असल्याने त्याला लगेच आत पाठवायचे, अशा सूचना कंपाउंडरला होत्या. आई-वडील मोलमजुरी करणारे, झोपडपट्टीत राहणारे. तेव्हा पैसे नसले तरी इंजेक्‍शन चुकवायचे नाही, रविवारीसुद्धा खाडा नको, असे त्यांना सांगितले होते. इतक्‍या सक्त सूचना असूनही एकाएकी ते मूल येईनासे झाले. आधी मनात भीती वाटली, की अत्यवस्थ झाले काय? रुग्णाचा पत्ताही माहीत नव्हता. असे दोन आठवडे गेले.

पंधरा दिवसांच्या अंतराने त्या मुलाला घेऊन आजोबा आले. काळाकुट्ट रंग. चेहऱ्यावर देवी रोगाने झालेले डाग. त्यात गेलेला एक डोळा. डोक्‍यावर विरळ पांढरे केस व दाढीचे खुंट. त्यांना पाहून माझा रागाचा पारा चढला. त्यांच्यावर ओरडलो आणि ‘‘तुम्हाला नातवाची काळजी नाही. मी पैसे मागत नाही याची जाणीव नाही,’’ असे बोलून गेलो. आजोबा आधीच बारीक असलेला एक डोळा मिचमिच करीत न बोलता ऐकून घेत होते. माझे बोलणे थांबल्यावर बघितले तर आजोबांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. त्यांनी बोलायला सुरवात केली- ‘‘बापू, यक डाव तं इचाराचं व्हतं का मी इतले दिवस काउन नाई आलो म्हून. अरे, या लेकराची माय मेली. काल तेरवी झाली अन्‌ आज म्या आनलं. आमी गरीब असलो तरी हरामी न्हाई. असं म्हाताऱ्या मानसाले रागवावं नाही रे बापू!’’ आजोबांचं बोलणं ऐकून मी भानावर आलो. नकळत माझ्याही डोळ्यांत पाणी आलं. आजोबांना वाकून नमस्कार केला व म्हटलं, ‘‘आजोबा, माझं चुकलं. मी खरंच कारण विचारायला हवं होतं.’’

या प्रसंगामुळे मी भानावर आलो. माझ्यातील दोन दोष जाणवले. मी शीघ्रसंतापी होतो. प्रसंगाचे मूळ न शोधता भावनेच्या आहारी जात होतो, हा एक दोष व दुसरा म्हणजे, कुठेतरी माझा अहंगड जागृत झाला होता. आपण यांच्यावर उपकार करत आहोत, याची जाणीव यांना नाही, या विचारामुळे माझ्या रागाची तीव्रता वाढली होती.
या प्रसंगानंतर माझा शीघ्रकोपी स्वभाव कमी झाला. भावनेच्या आहारी जाऊन भडकायचे नाही व आपण कुणासाठी काही केले, हा दंभ स्वत:ला शिवू द्यायचा नाही, हा धडा शिकलो. एक शेर अर्धवट आठवतो. तो मी स्वत:च्या शब्दांनी पूर्ण करून उद्‌धृत करतो.
कहीं तो आग होगी, यूंही धुआँ नहीं निकलता
कुछ तो मजबुरियाँ होगी, यूंही कोई बेवफा नहीं होता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com