मायक्रोसॉफ्टला 'लिंक्‍ड-इन'चा सारथी

Niranjan Prakash
मंगळवार, 21 जून 2016

गुगलच्या विश्वात आपले नेमके कार्यक्षेत्र कोणते आणि भविष्यातील आर्थिक संधी किती? पदावर आल्यापासूनच मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्यासमोरचा हा कूटप्रश्‍न. ‘लिंक्‍ड-इन‘ची खरेदी करून त्यांची ही भ्रांत किंचित कमी होईल, अशी आशा आहे. 

गुगलच्या विश्वात आपले नेमके कार्यक्षेत्र कोणते आणि भविष्यातील आर्थिक संधी किती? पदावर आल्यापासूनच मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्यासमोरचा हा कूटप्रश्‍न. ‘लिंक्‍ड-इन‘ची खरेदी करून त्यांची ही भ्रांत किंचित कमी होईल, अशी आशा आहे. 

मायक्रोसॉफ्टने ‘लिंक्‍ड-इन‘सारखी नेटवर्क साइट विकत घेण्यासाठी 26 अब्ज डॉलर मोजले ते योग्य का अयोग्य या प्रश्नाचे उत्तर तेवढे सरळ नाही. फेसबुकने व्हॉट्‌सऍप विकत घेतल्याच्या कारणमीमांसेइतके ते सोपेही नाही. त्यासाठी मायक्रोसॉफ्टचा नजीकच्या भूतकाळाचा थोडा मागोवा घेणे आवश्‍यक आहे. एका सॉफ्टवेअर कंपनीला कम्युनिटी नेट्‌वर्किंगच्या दुनियेची भुरळ पडणे, म्हणजे वरकरणी एका मसाला उत्पादकाने उपाहारगृह (किंवा एखादे अथांग विस्ताराचे ‘फूड कोर्ट‘) घेण्यासारखे आहे. धंद्यात जास्तीत जास्त मूल्यवर्धन करून पुढे जावे असे वाटणाऱ्यांना हा निर्णय योग्य वाटतोय, तर ज्या क्षेत्रात आपले मुख्य कौशल्य नाही, त्या व्यवसायात केवळ आकांक्षेच्या बळावर उडी घेऊ नये, असे मानणाऱ्यांना हा निर्णय थोडा आततायीपणाचा वाटू शकतो. येणाऱ्या काळात, एखादी ‘कम्युनिटी‘ विकत घेऊन आपली ‘कन्टिन्युटी‘ अबाधित राहू शकते का, या प्रश्नाचे उत्तर मिळेलच. तोपर्यंत या घटनेमागची पार्श्वभूमी आपण समजून घेऊयात. 

विंडोजच्या डझनभर बऱ्यावाईट आवृत्त्या विकून, सोबत ऑफिस, एसक्‍युएल, एक्‍स्चेंजसारखे ‘सुटे भाग‘ विकत या कंपनीने जगभरात मक्तेदारीचा एक उत्तम पायंडा घालून दिला होता. याच चिंतामुक्त नफानिर्मितीत ते सुखावले आणि सगळा घोळ झाला. खरंतर इसवीसन 2000च्या सुरवातीलाच येऊ घातलेल्या दोन वादळांचा त्यांना एकतर कानोसा घेता आला नाही (किंवा तो येऊनही मत्त मायक्रोसॉफ्टने त्याच्याकडे काणाडोळा केला!). गुगलने 2005 पासून अँड्रॉइडचे जवळपास वर्षागणिक एक नवे व्हर्जन उतरवून ‘ऍप्स‘चे एक वेगळेच जग निर्माण केले. लोक आता ऑफिस व (मायक्रोसॉफ्टने अंमळ उशिरानेच विकत घेतलेले) हॉटमेल सोडून जीडॉक्‍स व जीमेलबद्दल उत्साही वाटू लागले. पुढे ऍपलने विकसित केलेला (पण आता त्यांनाच चीत करणारा) ‘स्मार्टफोन रिव्होल्यूशन‘चा झंझावात सर्वपरिचितच आहे. कंपनीचे त्या वेळचे मुख्य कार्यकारी अधिकारी, स्टीव्ह बाल्मर यांनी कंपनीची कमाई पूर्वपदावर आणण्यासाठी बरेचसे प्रयत्नही केले आणि कालांतराने ते ‘टू लिट्‌ल, टू लेट‘ या न्यायाने फसलेसुद्धा. 

अँड्रॉइडला टक्कर देण्यासाठी नोकियासारखी उतरणीला लागलेली कंपनी विकत घेऊन ‘विंडोज फोन‘सारखी कल्पना रुजवू पाहणे; गुगलला गुंडाळून टाकू या खोट्या आत्मविश्वासाने ‘बिंग‘ नावाचे सर्च इंजिन बांधण्याचा निर्णय घेणे, यांसारख्या निर्णयांनी काळाचा व्यय आणि मुद्रेचा नाश दोन्ही झाला. सत्या नाडेला हे मायक्रोसॉफ्टचे सीईओ झाले तेव्हा कंपनी अगदी ‘पिळून पिळून भागली आणि जुन्याच कामी लागली‘ या स्थितीत होती. विंडोजची पुण्याई हाताशी होती म्हणून विंडोज 10 व ऑफिस 365 काहीशा विलंबाने का होईना बाजाराने स्वीकारले. त्यात बिल गेट्‌सने 2008 मध्ये कार्यालयात पूर्णवेळ येणे बंद केले होते व पुढे 2014 मध्ये नाडेला येताच चेअरमनपदाचाही राजीनामा देऊन टाकला. ज्या कामासाठी आपल्याकडे रतन टाटांना पंचाहत्तरी गाठावी लागली ते काम गेट्‌स यांनी साठीच्या आतच केले. या सर्व परिस्थितीत मायक्रोसॉफ्ट आता ‘कन्झ्युमर प्रोग्राम्स‘चा अनभिषिक्त सम्राट हे सत्य ‘सत्या‘स उमगले, हे बरे झाले. हे आकलन हीच कंपनीची नवी सुरवात ठरावी. 

नाडेला यांची व्यूहरचना तशी सरळमार्गी आहे! ‘कन्झ्युमर प्रोग्राम्स‘चा मोर्चा ते ‘बिझनेस सर्व्हिसेस‘कडे वळवण्यासाठी आपले बळ पणाला लावत आहेत. सध्या क्‍लाउड कम्प्युटिंग, सॉफ्टवेअर इकोसिस्टिमसारख्या उद्योगविश्वाला पूरक व कार्यालयीन विश्वाला सुलभ अशा नवनिर्मितीवर मायक्रोसॉफ्टने आपला भर असल्याचे स्पष्टही केले आहे. त्यामुळे एकेक कॉपी न विकता त्यांची चालू उत्पादनेसुद्धा वर्गणी शुल्कावर किंवा

जाहिरात उत्पन्नावर चालवण्याचे मार्ग ते शोधत आहेत. त्यामुळे कॉर्पोरेट विश्वातील पदस्थांना एका ‘नेटवर्क‘मध्ये जोडून आपल्या सशुल्क सेवा (उत्पादने नाहीत) त्यांना पुरवण्यासारखे दुसरे शहाणपण ते कोणते? त्यादृष्टीने लिंक्‍ड-इन विकत घेऊन मायक्रोसॉफ्टने संपूर्ण बाजार घरात आणून ठेवला आहे. उदाहरणार्थ; लिंक्‍ड-इनवर संपर्कात असलेल्या तुमच्या ‘समानशीले व्यसनेषु सख्यम‘ पंगतीशी आपल्याला वर्ड, एक्‍सेल, पॉवरपॉइंट लागलीच जोडता आले आणि तुम्हाला ते एकत्र बघता आले तर? मग मेल (तोही बहुधा जीमेलवरून) पाठवा कशाला आणि फाइल जोड कशाला? 

गंमत म्हणजे ही फक्त सुरवात आहे. गुगलच्या ‘सिरी‘ या ‘व्हर्च्युअल‘ स्वीय सहायक संकल्पनेला लिंक्‍ड-इनच्या ‘कोर्टाना‘ने आव्हान उभे केलेच होते. आता लिंक्‍ड-इनच्या जॉब्स आणि लिंडासारख्या ‘टूल्स‘ने मायक्रोसॉफ्टला आर्थिक बळ मिळेल. आजमितीस तब्बल 10 कोटी ऍक्‍टिव्ह युझर्स ‘लिंक्‍ड-इन‘कडे आहेत. हा आकडा फेसबुकच्या तुलनेत एक पंचमांश जरी असला तरी नुसताच हाय-हॅलो करून पोस्ट-पोक करणारा हा समुदाय नाही. हे एक बलशाली नेटवर्क आहे जे ‘मायक्रोसॉफ्ट‘ला आपले ‘नेटवर्थ‘ वाढवण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरू शकते. थोडक्‍यात काय तर मायक्रोसॉफ्ट नामक रथाला लिंक्‍ड-इन नामक सारथी मिळाला आहे. दोघांच्या विविध सेवासाधनांचे (सर्व्हिस टूल्स) आणि व्यासपीठांचे (युझर प्लॅटफॉर्म्स) अश्व एकदा जोडले तर ग्राहक त्याच्या व्यावसायिक आयुष्यात तरी लांबचा पल्ला गाठू शकेल, असा नाडेला यांचा कयास आहे. मग त्यादृष्टीने प्रतिग्राहक 25 सेंट (पाव डॉलर) ही मोजलेली किंमत (सध्यातरी) तेवढीशी महाग वाटत नाही.

Web Title: Editorial Features Technology Microsoft LiknedIn Niranjan Prakash