झऱ्यासारखं हसू

hemkiran patki
hemkiran patki

स रकारी कामासाठी परगावी गेलो होतो. काम हातावेगळं करून पुन्हा शहरात येणं झालं. बस स्थानकावरून रिक्षानं घरी येताना, घराच्या थोडं अलीकडं काही झोपड्या आणि पालं दिसली. कडूनिंबाच्या आडोशाला या माणसांचा संसार होता. कडुनिंबाच्या दिशेनं गाण्याचे स्वर ऐकू आले. एक वृद्धा झाडाच्या बुडाला एका पायाची घडी घालून, हात हनुवटीला टेकून डोळे उघडत-मिटत गात होती. शब्द स्पष्ट ऐकू येत नव्हते, तरीही धावतं काळीज रेंगाळलं. पुढं पुढं धावणाऱ्या रिक्षातून मी त्या वृद्धेकडं पाहत राहिलो. विस्कटलेले केस, फाटका पदर, स्वतःतच बुडालेली नजर आणि त्या गाण्याचे त्या मोकळ्या जमिनीच्या तुकड्याला हिरवे पंख लावणारे स्वर... हा प्रसंग डोळ्यांत अजून उतरत नाही, तोच एका प्रेमळ आजींचा पाहुणचाराचा प्रसंग मनात तरळला.
एका बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचं काम आमच्या कार्यालयाकडं आलं. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून, कार्यालयाच्या जीपनं आम्हा साऱ्या अभियंत्यांना क्षेत्रीय स्थळी जावं लागलं.  सर्वेक्षणाचं काम दुपारी एकपर्यंत चाललं. हे काम होईतो साऱ्याच जणांच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते. सर्वेक्षणाची रेखा पेरूच्या बागेतून जात होती; आणि झाडाला पानागणिक हिरव्या नि पिवळ्या रंगांचे पेरू लगडले होते. तेही करवादून खाणं झालं होतं. आम्हाला वरती पत्रे असलेलं एक दगडी घर दिसलं. दारातच एक थकलेल्या आजी दिसल्या, म्हणाल्या, ‘कसले रे काम बाबांनो’. अधिकाऱ्यांनी त्यांना कामाचं स्वरूप सांगितलं. आजींनी आम्हाला घरात बोलावलं. घोंगडी अंथरून बसायला सांगितलं; आणि जेवूनच जाण्याचा आग्रह धरला. ऊनऊन पदर सुटलेल्या भाकरी, भरल्या वांग्याची भाजी असा स्वयंपाक त्यांनी आमच्यासाठी केला. प्रत्येकासाठी पेरू तोडून दिले. त्या रानाचा, घराचा, एकल्या आजींचा निरोप घेताना आमची मनं माणूसपणाच्या संवेदनेचा अनुभव घेऊन हिरवीगार झाली होती.

माझ्या मनात प्रश्‍न उभा राहिला ः सहेतुक कृतीला खरी कृती असं म्हणता येईल काय? एखादा हेतू किंवा आदर्श कल्पिणं व त्याच्या दिशेनं कार्य करीत राहणं, याला खरी कृती असं म्हणता येईल काय? एखादा विशिष्ट परिणाम घडवून आणण्याकरता केलं जाणारं कार्य, ही खरोखर कृती आहे काय? या प्रश्‍नार्थक पार्श्‍वभूमीवर मनात आलं, आम्हां साऱ्यांची भूक जाणून जेवायला वाढायची त्या आजींची कृती सहेतुक नव्हती. ती एक निखळ कृतीच होती. अशी कृती हीच खरी प्रभावशाली कृती असते. वस्तुतः मानव ही एक संपूर्ण व एकात्मक अशी प्रक्रिया आहे. या संपूर्ण एकात्मकतेचा परिपाक या रीतीने घडून येणारी कृती, हीच खरी कृती होय.
कधी निवांत बसलो, हातात कुठलंही पुस्तक नसलं की त्या आजींची ती निर्हेतुक कृती हृदयाला जाणवते. त्यांचं परिस्थितीनिरपेक्ष आनंद असलेलं झऱ्यासारखं हसू डोळ्यांसमोर येतं. मग मीही आतून झुळझुळायला लागतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com