केवळ वर्तमानातली उत्कटता

hemkiran patki
hemkiran patki

शहरातल्या एका शाळेसमोरून चाललो होतो. एका वाळलेल्या वडाच्या झाडाकडं लक्ष गेलं. मनात आलं, हे तर वठून गेलंय. त्या झाडाचे नुसते फांद्यांचे सांगाडे राहिले होते. थोडं जवळ जाऊन त्या झाडाकडं पाहिलं, तेव्हा ढोलीतून धुराचे लोट वरती येताना दिसले. अरे हे जळतंय! झाडाची खोडा-फांद्यावरली सालही गळून पडली होती. आता हे वडाचं झाड काही जगणार नाही, ढोलीतला जाळ कुणी विझवणार नाही, असंच वाटलं. मी त्याच्याकडं पाठ करून दुसऱ्या रस्त्यानं निघून गेलो. मधे काही दिवस निघून गेले. माझं लक्ष पुन्हा त्या झाडाकडं गेलं. पाहतो तो काय, त्याची एक फांदी लालसर-पोपटी पानांनी धुमारलेली दिसली. अखेर चिवटपणानं त्या वडाच्या झाडानं आपलं जीवनसत्त्व भूगर्भात जाऊन मिळवलं होतं; कातळातल्या पाण्याच्या धारेशी आपली मुळं नेली होती...

निसर्गातल्या प्रत्येक घटकात असण्यासाठी लागणारं शहाणपण असं दृष्टीस पडतं. आपले डोळे असतेपणाच्या हिरव्या रंगानं भरून येतात. मनात येतं, माणूस मात्र जगण्यातल्या वैचारिक-भावनिक आणीबाणीचा किती बाऊ करतो, त्याचा शब्दांतून केवढा आकांत मांडतो. पण खरंच आपल्याला अस्तित्वगत आणीबाणीचा उलगडा होतो? तिचं आरोपित नसलेलं स्वरूप समजतं? खरं तर अशा जगण्याच्या अतर्क्‍य कोंडीतून शहाणपणाची कृती घडताना का दिसू नये? आपण परिस्थितीशरण का असावं, दैववादी असावं? आपल्या ओठांवर, काळजात नियतीविषयीची तक्रार का असावी? या प्रश्‍नांच्या मुळांशी स्वाभाविकपणे जाण्याची दिशा न सापडल्यानं माणूस, प्रसंगांचं आणि आपत्तीचं पृथःकरण करताना दिसतो.

एखादा आध्यात्मिक धारणांचा संवादक प्रश्‍नांच्या साखळीतून आपल्या कोष्टकाधीन साधारण मनाला अस्तित्वगत आणीबाणीची दशा दाखवतो, तेव्हा आपण निराधार होतो. काही जण त्या संवादकामुळं प्रभावित होतात, काही शब्दज्ञानानं आपली मनं भरून टाकतात, तर काही त्यातल्या भावात्मक आवाहनाला अंधपणे अनुसरतात. पण आपली ही शोकांतिका असते की संवादकाच्या आणीबाणी निर्माण करण्यामागचा हेतू आपण जाणून घेत नाही. त्यातल्या तातडीला उमजून कृतिशील होत नाही. शाळेत असताना तहानलेल्या कावळ्याची, त्याच्या शहाणपणाची गोष्ट आपण वाचलेली असते. भांड्याच्या बुडाशी असलेलं पाणी त्याला प्यायचं असतं, तहान तीव्र असते. तो चोचीनं खडे गोळा करतो आणि त्या भांड्यात टाकतो. एवढाच यातला कथात्म भाग. काही कावळ्याचं जगण्यासाठीचं शहाणपण.

इथं महत्त्व आहे ते तहानेच्या हेतूचं. ही तहान खरी आहे की भ्रामक आहे हे आतून उमजायला हवं. तहान जेव्हा स्वाभाविक असते, तेव्हा शोध केवळ पाण्याचाच असतो. पाण्यातल्या घटकांचा आपण काथ्याकुट करीत नाही. पाण्याचे स्रोत आपण प्रदूषित करीत नाही. पाण्याविषयी गरजांपलीकडं जाऊन आपण नुसतं शब्दांतून काही बोलत नाही. तहान कळणं हे पाण्याचा संचय करण्यापेक्षा कितीतरी महत्त्वाचं असतं! म्हणूनच तहानेचा हेतू आपल्याला उमजला, की आपल्याकडून तातडीनं क्रिया घडते. तहान पूर्णपणे शमविली जाते, पाण्याचा संचय केला जात नाही.

खरी तहान शमविण्यासाठी निसर्गाच्या या अफाट चक्रात दुसरा क्षण नसतो. ‘उद्या’ नसतो. पुढ्यातल्या क्षणातच उत्कटतेचा अमाप आशय असतो. पण उत्कटता उमजणं धबडग्यातल्या, धावपळीतल्या जिवासाठी सोपं नि संस्कारित आवडी-निवडींनी संकोचलेली असते; विखुरलेली असते. ती मोकळी कुठं असते? संवेदनेच्या या गुणवत्तेमुळं उत्कटता उमजणं आणि अनावर असणं यातला फरक आपल्याला जाणवत नाही. उत्कट असणं केवळ वैचारिक वा भावनिक असत नाही. ते आपल्या संपूर्ण असतेपणाचं सहज शहाणपण असतं. ही सहजच आपल्या स्वाभाविक उत्कटतेला दिशा, गती आणि जगण्याचा सुंदर हेतू देते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com