अहोभावातील सुंदरता

हेमकिरण पत्की
मंगळवार, 30 जानेवारी 2018

ब ऱ्याच दिवसांनंतर मित्राच्या घरी जाणं झालं. चहा-बिस्किटं झाल्यावर त्यानं सांगितलं, की त्याचा एक महाविद्यालयीन काळातला मित्र पत्नीसह चार दिवसांसाठी येतोय. या मित्राची पत्नी गझलगायनाची आवड असलेली आहे आणि तिच्या गायनाचा एक अनौपचारिक कार्यक्रम तो घरीच आयोजित करतोय. या आयोजनाच्या कल्पनेनं त्याचा चेहरा फुलून आला होता. त्यानं मला अगत्यपूर्वक या कार्यक्रमास येण्यास सांगितलं. मलाही खूप आनंद झाला. वाटलं, की न ऐकलेलं, न जाणवलेलं असं काही हृदयात उतरेल आणि ते आठ पाकळ्यांसह उमलून येईल...

अगदी तसंच झालं. बाईंच्या गझलगायनाचा कार्यक्रम खूप श्रवणीय झाला. स्वरांतली मधुरता, गळ्याची फिरत, शब्दांचं भावपूर्ण उच्चारण आणि गझल गायनावरलं त्यांचं प्रेम पाहून मन हरखून गेलं. या साऱ्याच कार्यक्रमाविषयी आयोजनाचे आभार मित्रापाशी व्यक्त करत असताना त्यानं एक गोष्ट सांगितली ः बाईंना उजव्या हाताची चार बोटं नसल्याची. कृत्रिम बोटं लावून त्या गात असल्यानं त्यांच्या भावमुद्रेत, देहबोलीत ही गोष्ट दिसून आली नाही. पण मला त्यांच्या या शारीरिक उणेपणापेक्षा हृदयातल्या अहोभावाचा प्रत्यय अधिक तीव्रतेनं आला, तो त्यांच्या गझलांच्या चोखंदळ निवडीतून. त्यांनी गायलेल्या एका गझलेचे शब्द होतेः
‘रंज हो, दर्द हो, वहशत हो, जुनूँ हो, कुछ हो
आप जिस हाल से खुश हो, वही हाल अच्छा है’

उमजवत्या भावानं माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या... गाणाऱ्याचं हृदय भारल्या स्वरात सांगत होतं ः ‘किती दिलंस तू मला. एवढी माझी पात्रताही नव्हती. अपात्र होतो आणि जीवन दिलंस. काहीच तर कमावलं नव्हतं आणि तू अनंत आनंदात स्वतःला विसरण्याची गती दिलीस. जे आहे त्याच्याशी सरळपणानं जोडण्याचं भाग्य दिलंस. मला मोकळा श्‍वास घेता येईल, सूर्याच्या कोवळ्या किरणांचा स्पर्श अनुभवता येईल असं संवेदन दिलंस. माझं हृदय अपरंपार प्रेमाचा अनुभव घेतंय, रक्तातल्या साऱ्याच पेशींना हा संगीताचा साक्षात्कार होतोय तो तुझ्यामुळंच.’

बाईंची ही गझल गाण्यामागची दृष्टी मला खूप भावली. जसा भक्त आपली स्वतःची कसलीच इच्छा ठेवत नाही, परमात्म्याची इच्छा ही त्याची इच्छा होऊन जाते. तोच ‘अहोभाव’ बाईंच्या स्वरांतून प्रतीत होत होता. ना जीवनाविषयीची कुठली तक्रार, ना त्याचा निःशब्द उच्चार. हृदय असं अहोभावानं भरून येतं तेव्हाच ते प्रेममय, करुणामय होतं. आठ महिने पावसापासून दूर राहिलेली जमीन मृगाच्या पहिल्या धारांना आपल्या गंधभरल्या श्‍वासांनी धन्यवाद देते, आकाशाची ऋणी होते, तसंच हे सारं...

मनात आलं, ‘जे आहे’ ते आपण पाहत नाही. ‘जे नाही’ ते सतत आपल्याला खुणावतं. ‘जे आहे’ ते नुसतं निरखण्यानं अहोभाव आपल्या रोजच्या जगण्यात उतरतो आणि या अहोभावानं सारं सारंच उजेडात येतं; सारं फुलून येतं.

Web Title: editorial hemkiran patki write article in pahatpawal