प्रेमानुभव

hemkiran patki
hemkiran patki

उत्तररात्रीचा प्रहर सरत आला होता. पण अजून उजाडलेलं नव्हतं. आकाशातले तारे आपली प्रभा घेऊन अजूनही लुकलुकत होते. त्या मंद उजेडात हळुवार स्पर्शासहित झाडं आपल्याठायी निश्‍चल उभी होती. एकाही पाखराचा स्वर आसमंतात उमटत नव्हता. झाडांच्या फांद्या-पानांतून पाखरं अजून जागी झाली नव्हती. पानांतून वारा वाहत नव्हता. सळसळ कानांवर पडत नव्हती. सारंच कसं कमालीचं शांत होतं. या असल्या नीरव शांततेत असंख्य फुलांचा संमिश्र सुवास, हिरव्या तजेलदार पानांचा आणि ओलसर मातीचा गंध भरून राहिला होता. हवेचं असणं जणू अंगप्रत्यंगाला जाणवतच नव्हतं; आणि ही साऱ्याच वस्तुमात्रातली निःस्तब्ध शांतता चित्ताच्या गाभ्यापर्यंत पोचत होती. असं वाटत होतं, की ही पृथ्वी अतीव उत्कटतेनं व अढळ निष्ठेनं प्रकाशभेटीचीच वाट पाहत होती. तिच्याठायी असलेली अमर्याद काळाची प्रतीक्षा - शक्ती, अंतहीन धीर आणि असीमता एका असामान्य गुणवत्तेची निदर्शक होती.

मनात आलं, आपल्या हृदयातही हीच असीमता भरून आहे; ही भावस्थितीच तर प्रेम आहे. ही स्थितीच आपल्याला एखाद्या पदार्थाकडं, व्यक्तीकडं, आतल्या प्रकटीकरणाकडं पाहायला उजेड देते. याच भावस्थितीत माझी पहाटपावलं घराबाहेर पडली होती. चालता चालता गात्रांच्या चारुतेपलीकडली ‘ती’ मूर्त झाली. तिची पहिली दिठीभेट, शब्दभेट सारं सारं आठवलं... तो एक दुर्मीळ प्रेमयोगच होता. सगळं जगणंच दरवळून टाकणारा. तिला पाहताच माझ्या तहानल्या चित्ताचा दाह शांत झाला होता. तिच्याशी बोलताना, तिला ऐकताना हृदयास प्रथमच असा पाझर फुटला होता. आयुष्याचा पूर्वार्ध प्रेमाच्या तरल कल्पनेत सरला होता आणि आता उत्तरार्धात खऱ्याखुऱ्या प्रेमाचे कोवळे धुमारे मनाच्याही मनाला फुटले होते. आमची पहिली भेट शहरातल्या एका ग्रंथालयात घटकाभराची झाली काय आणि दुसऱ्या दिवशी ग्रामदैवताच्या पावन परिसरात तिनं दुमडलेलं पत्र माझ्या हाती ठेवलं काय. सारं अघटितच. माझ्या संवेदनेला पंख फुटले आणि दिठी निळीभोर झाली. पहिल्याच पत्रात तिनं लिहिलं होतं, ‘आपलं आयुष्य अनेक गोष्टींनी व्यापलेलं आहे. परंतु, हृदयाची तहान अशा भावनिक अवकाशासाठी आसुसलेली असते. तो शोष पाणी शमवू शकत नाही. त्यासाठी अशा अंतर्याम ढवळून ते नितळ करणाऱ्या आणि उजळविणाऱ्या संवादाची - त्याच्या ओलाव्याचीच गरज आहे.’

तिच्या पत्रातली ओल माझ्या हृदयात उतरली. मनात आलं, हृदयस्थ शांतीचा वारा शोधायला निघालेला मी आणि आतल्या वादळाच्या भोवऱ्यात किनारा शोधत आलेली ती आम्हा दोघांच्याही डोळ्यांत हजारों जन्मांची तहान होती आणि अव्यक्त मनात चांदण्यातली झाडावरली थेंबाची सर अज्ञातानं सांडली होती... आता वाटतं, प्रेमाच्या अनुभवासाठी घरदार सोडावं लागत नाही. केवळ आपल्या हृदयाचं दार सताड उघडं ठेवावं लागतं आणि ते उघडं आहे याचा सहज विसर पडावा लागतो. मग कधीतरी पायांत पैंजण घालून येणाऱ्या वाऱ्याची एखादी झुळूक हळुवार येईल अन्‌ हृदयाचा कोपरा न्‌ कोपरा निनादून जाईल. असा खराखुरा प्रेमानुभव म्हणजेच जीवनाचं भावसंगीत नव्हे काय!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com