...‘कार्ट’ ते ‘मार्ट’! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

भारतातील प्रचंड मोठी बाजारपेठ परदेशी कंपन्यांना खुणावते आहे. त्यामुळेच ‘वॉलमार्ट’ने भारतातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी ‘फ्लिपकार्ट’साठी १६ अब्ज डॉलर इतकी अभूतपूर्व किंमत मोजली आहे. ही ‘फ्लिपकार्ट’च्या यशाची पावतीच आहे.

भारतातील प्रचंड मोठी बाजारपेठ परदेशी कंपन्यांना खुणावते आहे. त्यामुळेच ‘वॉलमार्ट’ने भारतातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी ‘फ्लिपकार्ट’साठी १६ अब्ज डॉलर इतकी अभूतपूर्व किंमत मोजली आहे. ही ‘फ्लिपकार्ट’च्या यशाची पावतीच आहे.

अ वघ्या बारा वर्षांपूर्वी दिल्लीतील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी’मध्ये सचिन आणि बिन्नी हे बन्सल या आडनावाचे युवक एकमेकांना भेटतात काय आणि पुढच्या पाचच वर्षांत म्हणजे २००७ मध्ये ते ‘फ्लिपकार्ट’ नावाने ऑनलाइन बुकस्टोअर स्थापन करतात काय! तेव्हा अमेरिकेच्या बाजारपेठेतील ‘ॲमेझॉन’ आणि ‘वॉलमार्ट’ या दिग्गजांमधील घमासान युद्ध हे भारताच्या भूमीवर लढले जाणार आहे, याची कोणाला कल्पनाही आली नसणार. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले आणि या अटीतटीच्या संघर्षात अखेर ‘वॉलमार्ट’ने खणखणीत १६ अब्ज डॉलर मोजून ‘फ्लिपकार्ट’च्या ७७ टक्‍के हिश्‍श्‍यावर कब्जा केला आहे. अर्थात, या दोन अमेरिकी ‘मार्केट जायंट्‌स’च्या किमान वर्षभर सुरू असलेल्या या लढाईत ‘वॉलमार्ट’चा विजय झाल्याचे कागदोपत्री दिसत असले, तरी मार्केटमधील ही लढाई प्रत्यक्षात ‘फ्लिपकार्ट’नेच जिंकली आहे! हा सचिन आणि बिन्नी या बन्सल मित्रांचा जसा विजय आहे, त्याचबरोबर डॉ. मनमोहनसिंग यांनी १९९१मध्ये आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबवत जागतिकीकरण, तसेच उदारीकरणाला आपल्या देशात मोकळी वाट करून दिली, त्या धोरणांचीही ही परिणती आहे. गेल्या काही वर्षांत सरकारने डिजिटल व्यवसाय आणि व्यवहारांना मोठी चालना दिली आहे. त्यामुळे आणि भारतातील प्रचंड मोठ्या बाजारपेठेमुळे अनेक बड्या परदेशी ई-कॉमर्स कंपन्यांचा भारताकडील ओढा वाढल्याचेही हे निदर्शक आहे.

 पंचविशीतील दोन तरुणांनी एका तपापूर्वी बघितलेल्या स्वप्नांची ही एका अर्थाने झालेली पूर्ती आहे आणि त्यामुळे भारतीय बाजारपेठेवर कब्जा करण्यासाठी जगभरात सुरू असलेल्या अकटोविकट संघर्षालाही एका अर्थाने नवे परिमाण लाभले आहे. भारताने उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यापासूनच हा संघर्ष सुरू होता आणि त्या संघर्षात अमेरिकेइतक्‍याच ताकदीने चीनदेखील उतरलेला आहे. त्याचे मूळ हे अर्थातच भारतातील फार मोठ्या बाजारपेठेत, तसेच उदारीकरणाच्या धोरणामुळे खिशात भरपूर पैसे खुळखुळवणाऱ्या मध्यमवर्गाच्या उदयातही आहे. त्यामुळेच ‘ॲमेझॉन’ असो, की ‘वॉलमार्ट’ या कंपन्यांचा डोळा ‘फ्लिपकार्ट’वर होता. ते ‘डील’ आता झाले असून, उद्योगजगताकडून त्याचे स्वागत होत आहे.

बिन्नी आणि सचिन यांनी सुरू केलेल्या एका ‘स्टार्टअप’ कंपनीला मिळालेले हे यश केवळ पैशांच्या मोजमापातच नव्हे, तर सर्वार्थाने अभूतपूर्व आहे. मात्र, त्याच वेळी बडे ‘मार्केटिंग जायंट्‌स’ भारतात उतरल्यामुळे आता देशातील रिटेल व्यवसाय म्हणजेच  छोट्या व्यापाऱ्यांना त्याचा फटका बसणार नाही ना, अशा शंकाही व्यक्‍त होत आहेत. ‘वॉलमार्ट’ची रिटेल स्टोअर भारतातील काही प्रमुख शहरांत सुरू झाली, तेव्हाही अशीच भीती व्यक्‍त झाली होती. आताच्या या बड्या व्यवहारानंतर काही रिटेल कंपन्यांनी हा १६ अब्ज डॉलरचा व्यवहार म्हणजे भारतीय ई-कॉमर्स क्षेत्र उद्‌ध्वस्त करण्याचा डाव तर नाही ना, अशी शंका व्यक्‍त केली आहे. ती काही प्रमाणात रास्त आहे. गेल्या दशकभरात आपल्या देशात मोठमोठे मॉल उभे राहिले आणि त्याकडे लोकांचे लोंढेच्या वळू लागले. त्यात नव्याने उदयास आलेल्या मध्यमवर्गाचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असला, तरी हातावर पोट असलेला वर्गही कधी ना कधी या मॉलमधील पंचतारांकित वातावरणाच्या मोहात पडून, तिकडे जाण्यास हळूहळू सरावला आहे. त्याचबरोबर ऑनलाइन खरेदीचे प्रमाणही गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या प्रमाणात वाढले आहे. त्याला आताच्या या ‘फ्लिपकार्ट’ ते ‘वॉलमार्ट’ या प्रवासामुळे अधिक गती मिळेल, असे दिसू लागले आहे.

‘फ्लिपकार्ट’चा हा गेल्या एका तपातील प्रवास सहजासहजी झालेला नाही. सचिन आणि बिन्नी या बन्सलद्वयाने ई-मार्केटिंगच्या उद्योगात उडी घेण्याआधी या व्यवसायाची धुळाक्षरे किंवा खरे तर ‘संगणकाक्षरे’ ही ‘ॲमेझॉन’मध्येच काही काळ नोकरी करून गिरवली होती. तेव्हा पुढे हे असे काही होणार आहे आणि हेच दोघे थेट आपल्याला टक्‍कर देणार आहेत, याची कल्पना येणे केवळ अशक्‍य होते. मात्र, आपला व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांचा प्रवास ई-मार्केटिंगच्या बिकट वाटेनेच झाला आहे. प्रारंभी ‘ॲक्‍सेल पार्टनर्स’ यासारख्या काही विदेशी कंपन्यांनी त्यात भांडवल ओतले आणि पुढे ई-मार्केटिंगच्या व्यवहारात ‘फ्लिपकार्ट’ने क्रेडिट कार्डांऐवजी रोखीचा मामला सुरू केला. भारतीयांसाठी ही मोठीच सुविधा होती. त्यानंतर मात्र ‘फ्लिपकार्ट’ने कधीच मागे वळून बघितले नाही आणि त्यामुळेच अखेर ‘कार्ट’ ते ‘मार्ट’ हा प्रवास अखेर पूर्ण झाला आहे.

Web Title: editorial india e commerce flipkart