भारत-फ्रान्स संबंधांना ‘ऊर्जा’ (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

फ्रान्सच्या अध्यक्षांचा भारत दौरा अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण होता. उभय देशांत व्यूहात्मक भागीदारीचे नवे पर्व सुरू होण्याची शक्‍यता त्यामुळे अधोरेखित झाली आहे.

फ्रान्सच्या अध्यक्षांचा भारत दौरा अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण होता. उभय देशांत व्यूहात्मक भागीदारीचे नवे पर्व सुरू होण्याची शक्‍यता त्यामुळे अधोरेखित झाली आहे.

आं तरराष्ट्रीय राजकारणात परस्परपूरक हितसंबंध असतील, तर मैत्रीचा पाया पक्का होतो. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भारतभेट त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली. अणुऊर्जा तंत्रज्ञान आणि संरक्षण सामग्रीच्या क्षेत्रात फ्रान्सला बाजारपेठ हवी आहे; तर या दोन्ही गोष्टींची भारताला मोठी गरज आहे. मात्र हे परस्परपूरकत्व एवढ्यापुरतेच सीमित नाही. आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रातील व्यूहरचनेच्या संदर्भातही दोन्ही देशांना एकमेकांची मैत्री लाभदायक ठरणार आहे. त्यामुळेच फ्रान्सच्या अध्यक्षांच्या या दौऱ्याची दखल घ्यायला हवी. हा दौरा सुरू असतानाच जैतापूर येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पासंबंधी फ्रान्स सरकारच्या नियंत्रणाखालील ईडीएफ कंपनी आणि ‘न्यूक्‍लिअर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ यांच्यात करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. या निमित्ताने दोन्ही देशांच्या नेत्यांनीही डिसेंबरमध्ये या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पण ही घटना प्रसारमाध्यमांकडून व अन्य माध्यमांकडूनही काही प्रमाणात दुर्लक्षित झाली. आपल्याकडच्या एकूणच राजकीय-सामाजिक चर्चाविश्‍वात विकासविषयक घडामोडी, प्रक्रिया, प्रकल्प यांना एवढे कमी स्थान का, असा प्रश्‍न या संदर्भात उपस्थित होतो. याविषयी तयार झालेली नकारात्मक वृत्ती हा एक संशोधनाचाच विषय ठरेल. औद्योगिक विकास बहुतेकांना हवा आहे, जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, असेच सगळ्यांना वाटते, लोकांची क्रयशक्ती वाढली पाहिजे, याविषयी कुणाचे दुमत नाही; परंतु त्यासाठीच्या प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाल्या, की एक ना अनेक कारणांसाठी विरोध सुरू होतो. जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प हाही त्याला अपवाद नव्हता आणि नाही. या प्रकल्पाविषयीच्या जवळजवळ सर्व आक्षेपांविषयी अणुऊर्जा आयोगाने सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. जपानमधील फुकुशिमा व रशियातील चेर्नोबिल येथे झालेल्या अपघातांमुळे अणुवीज प्रकल्पाच्या उभारणीविषयी शंका घेतल्या गेल्या; परंतु त्याबाबत योजलेल्या सुरक्षात्मक उपायांची माहितीही आयोगाने दिली आहे. त्याइतकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतासारखा विकसनशील देश विकासाच्या ज्या टप्प्यावर आज आहे, त्यानुसारच त्याला आपले प्राधान्यक्रम ठरवावे लागणार आहेत. ऊर्जेची आणि पर्यायाने विजेची वाढती मागणी आणि त्या मानाने त्याचे कमी उत्पादन हे देशापुढचे एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे ऊर्जानिर्मितीची वाढीव क्षमता प्राप्त करणे ही देशाची आत्यंतिक गरज आहे. अणुऊर्जा प्रकल्पाचे काम वर्षअखेर सुरू करण्याचा संकल्प त्या दृष्टीने महत्त्वाचा म्हटला पाहिजे. अर्थात अंतिमतः एखाद्या देशानेच नव्हे, तर जगानेच अपारंपरिक मार्गाने ऊर्जा मिळविण्याच्या मार्गाने जाणे आवश्‍यक आहे, याच शंकाच नाही. फ्रान्सच्या अध्यक्षांच्या याच दौऱ्यात त्याविषयीच्या एका पुढाकारालाही मूर्त रूप देण्यात आले, हाही एक चांगला योग म्हणावा लागेल. ‘इंटरनॅशनल सोलर अलायन्स’च्या परिषदेसाठी २३ देशांचे प्रतिनिधी हजर होते. त्यांनी सौरऊर्जानिर्मितीवर भर देण्याचा निर्धार या निमित्ताने केला. यासंबंधीच्या ‘दिल्ली सोलर अजेंड्या’ला ६२ देशांनी मान्यता दिली आहे. या आंतरराष्ट्रीय मोहिमेसाठीचे मुख्यालय भारतात राहणार आहे, हे विशेष.

अमेरिकाकेंद्रित जागतिक राजकारणाचे स्वरूप कसे बदलू लागले आहे, याची झलक या दौऱ्यात दिसते. एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापक उद्दिष्टांसाठीची बांधिलकी अमेरिका कमी करीत चालली असताना काही नव्या शक्ती पुढे येऊन नव्या जबाबादाऱ्या घेताना दिसत आहेत. अर्थात द्विपक्षीय संबंधांचा विचार करतादेखील हा दौरा महत्त्वाचा ठरला. संरक्षण, सुरक्षा अणुऊर्जा, गोपनीय माहितीची सुरक्षा आदी विविध चौदा करार या भेटीत झाले असून, त्यामुळे भारत-फ्रान्स यांच्यात व्यूहात्मक भागीदारीचे नवे पर्व सुरू होईल, अशी आशा मॅक्रॉन यांनी व्यक्त केली. हिंदी महासागर क्षेत्रात स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याची चीनची महत्त्वाकांक्षा असून, त्यासाठी त्या देशाने इतरांशी प्रसंगी दोन हात करण्याची ठेवलेली तयारी हा या परिसरातील देशांसाठी आणि बड्या देशांसाठीही चिंतेचा विषय आहे. या पार्श्‍वभूमीवर भारत आणि फ्रान्स यांनी हिंदी महासागर क्षेत्रात सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. परस्परांचे नौदल तळ एकमेकांच्या युद्धनौकांसाठी खुले करण्याचा झालेला करार ही याच निर्णयाची फलश्रुती आहे. संरक्षण सामग्री उत्पादनातील सहकार्य वाढविण्याच्या करारामुळे ‘मेक इन इंडिया’अंतर्गत दोन्ही देशांच्या उद्योगांना संरक्षण सामग्रीची निर्मिती आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करता येईल. त्याचा फायदा दोन्ही देशांना होईल. एकूणच द्विपक्षीय संबंधांना नवी ‘ऊर्जा’ देणारा मॅक्रॉन यांचा हा दौरा होता.

Web Title: editorial india france relation