सलोख्याच्या प्रयत्नांची गरज (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

राज्यातील सामाजिक वातावरण दूषित होऊ नये, यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्‍यकता आहे. लोकशाहीत मतभेदांना स्थान असते; विद्वेषाला नाही, याचे भान ठेवण्याची गरज आहे.

राज्यातील सामाजिक वातावरण दूषित होऊ नये, यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्‍यकता आहे. लोकशाहीत मतभेदांना स्थान असते; विद्वेषाला नाही, याचे भान ठेवण्याची गरज आहे.

नववर्षाच्या सुरवातीलाच अवघ्या राज्यभरात निर्माण झालेले जातीय तणावाचे वातावरण चिंता निर्माण करणारे आहे. नववर्षाची सुरवातच अशा दुर्दैवी घटनेने झाल्यामुळे आता पुढचे वर्ष कसे जाईल, असाच प्रश्‍न अनेकांच्या मनात उभा ठाकला आहे. कोरेगाव भीमा येथील तुंबळ लढाईत पेशव्यांच्या सैन्याचा पराभव करणाऱ्या ब्रिटिशांच्या सैन्याकडून पराक्रम गाजविणाऱ्या "महार पलटणी'तील सैनिकांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी तेथे दलित समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहातो. महत्त्वाची बाब म्हणजे आजवर हा कार्यक्रम तेथे दरवर्षी बव्हंशी शांतपणाने पार पडत आहे. या वेळी मात्र त्याला तणावाचे, अशांततेचे गालबोट लागले. हे अचानक घडले आहे, असे कसे म्हणता येईल? जाळपोळ, दगडफेक आणि त्याआधी वढू बुद्रुक परिसरातील स्मारकाची नासधूस या घटना अत्यंत दुर्दैवी होत्या. त्याचे पडसाद राज्यभरात उमटले आणि गावोगावी तणाव, "रास्ता रोको', रेल रोको', "बंद' आणि काही ठिकाणी हाणामारीच्या घटनांना ऊत आला. हे जे काही घडले, ते अर्थातच सामाजिक स्वास्थ्यावर मोठाच घाला घालणारे ठरले आहे. त्यामुळेच हे वातावरण लवकरात लवकर पूर्ववत कसे होईल आणि सलोखा, सामंजस्य कसे प्रस्थापित होईल, हे पाहिले पाहिजे. त्यासाठी समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिक, संस्था आणि राजकीय पक्षांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. कोरेगाव भीमा येथील परिस्थिती तातडीने आटोक्‍यात आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले; तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्याची घोषणाही त्वरेने केली. हे योग्यच झाले; मात्र कोरेगाव भीमा येथील घटनेचे पडसाद राज्यभर उमटतील आणि त्याची व्याप्ती वाढेल, याचा अंदाज घेण्यात सरकारी यंत्रणा कमी पडल्या. आता त्या मुद्याचे भांडवल करून विद्वेषाच्या वणव्यास खतपाणी घालणे, हे कोणाच्याच हिताचे नाही आणि त्यातून सुरू झालेला हिंसाचार हा तर समाजातील सर्वांत शेवटच्या स्तरावर असलेल्या बांधवांसाठीच जास्त घातक ठरतो, हे लक्षात घेतले पाहिजे. लोकशाहीत मतभेदांना जरूर स्थान असते; किंबहुना ते व्यक्त झालेच पाहिजेत; परंतु लोकशाहीत विद्वेषाला अजिबात स्थान नसते. सध्याचे चित्र मात्र त्याच्या विपरीत असेच दिसते आहे. "विचारांचा मुकाबला विचारांनी' हे सुवचन अलीकडे केवळ लिहिण्या-बोलण्यापुरतेच उरले आहे की काय, असे वाटते. एखादी गोष्ट पटली नाही, की चटकन बाह्या सरसावण्याची प्रतिक्षिप्त क्रिया होते. हे वातावरण आपण कसे बदलणार आणि त्यासाठी काय प्रयत्न करणार, हा खरा प्रश्‍न आहे. छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीशी सर्वांनीच प्रामाणिक राहायला हवे, हे आज पुन्हा एकदा कळकळीने सांगण्याची वेळ आली आहे.

कोरेगाव भीमा; तसेच वढू येथील घटना आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात उमटलेल्या प्रतिक्रिया हा घटनाक्रम पाहिला तर त्यात राजकीय लाभासाठीची काहींची धडपड लपून राहात नाही; पण त्यामुळे समाजांत दरी निर्माण होते आणि अंतिमतः समाजच मागे ढकलला जातो, हे लक्षात घेण्याची गरज आहे. त्यामुळेच जागरूक लोकशक्तीच वातावरणात बदल घडवू शकते. एखाद्या ठिकाणी आग भडकली की आपल्या बेजबाबदार वक्‍तव्यांनी किंवा उथळ शेरेबाजी करून तेल ओतणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढली आहे. समाजमाध्यमांचा त्यासाठी दुरुपयोग केला जातो. काही पुढारीही यात सामील असतात. अफवा पसरविण्यांविरुद्ध कायदेकानू आहेत. राज्य सरकारनेही त्याबाबत कठोर कारवाईचा इशारा दिला आहे; परंतु नागरिकांचीही अफवांना आळा घालण्यात महत्त्वाची भूमिका असते, हे विसरता कामा नये. आपल्यापर्यंत आलेल्या माहितीची खातरजमा न करता ती पुढे पाठविणे हे बेजबाबदारपणाचे आहे, ही गोष्ट प्रत्येकाच्या मनावर बिंबवणे अत्यावश्‍यक आहे. सध्याच्या अद्ययावत संपर्कसाधनांच्या युगात तर या गोष्टीचे महत्त्व जास्तच प्रकर्षाने जाणवते.
आपल्या देशात आधीच धर्माच्या आधारावर ध्रुवीकरणाची लाट आलेली असताना आता जाती-पातींच्या जोरावर पुन्हा नव्याने ध्रुवीकरण होऊ पाहत असेल, तर त्यातून आपल्या समाजाची आजवर एकसंध राहिलेली वीण पुरती विसकटून जाऊ शकते. विद्वेषाच्या वणव्याचे कधीही मोठ्या वडवानलात रूपांतर होऊ शकते. ते कोणाच्याच हिताचे नाही. राज्यातील दंगल आणि तणावाच्या परिस्थितीतून हा धडा घ्यायला हवा.

Web Title: editorial koregaon bhima issue and maharashtra bandh