मित्रपक्षांचे दबावतंत्र (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

लोकसभा निवडणुका जवळ येतील, तसा सत्तेतील अधिकाधिक वाट्यासाठी भाजप व मित्रपक्ष यांच्यातील ‘ब्लॅकमेलिंग’चा खेळ टोकाला जाणार आहे. नितीशकुमार यांच्या पक्षाच्या मागणीमुळे त्याचीच साक्ष मिळाली आहे.

लोकसभा निवडणुका जवळ येतील, तसा सत्तेतील अधिकाधिक वाट्यासाठी भाजप व मित्रपक्ष यांच्यातील ‘ब्लॅकमेलिंग’चा खेळ टोकाला जाणार आहे. नितीशकुमार यांच्या पक्षाच्या मागणीमुळे त्याचीच साक्ष मिळाली आहे.

नरेंद्र मोदी सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय जनता पक्षाने गुरुवारी बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (रालोआ) मित्रपक्षांसमवेत आयोजित केलेल्या आनंदोत्सवात मिठाचा खडा टाकण्याचे काम बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाने (जेडीयू) केले आहे! आगामी लोकसभा निवडणुका मोदी यांचाच चेहरा पुढे करून लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला असतानाच, बिहारमध्ये मात्र ‘रालोआ’चा चेहरा नितीशकुमार हाच असेल, असे ‘जेडीयू’ने जाहीर केले आहे. ‘जेडीयू’ची मजल एवढ्यावरच थांबलेली नाही. बिहारमध्ये ‘जेडीयू’ हाच भाजपचा मोठा भाऊ असेल आणि लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात बिहारमधील ४० जागांपैकी आपल्याला २५ जागा हव्या आहेत, असेही जाहीर करून हा पक्ष मोकळा झाला आहे. अर्थात, महाराष्ट्रात शिवसेनेबरोबरच्या तथाकथित मैत्रीत उभे राहिलेले वादळ आणि तेलुगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी ‘रालोआ’तून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय, या पार्श्‍वभूमीवर नितीशकुमार यांच्या मैत्रीची भाजपला नितांत गरज आहे, हे उघडच दिसते.  हे चित्र पाहूनच आता ‘जेडीयू’नेही दंड थोपटले आहेत. अर्थात, भाजपला नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये पदरी आलेला पराभव लक्षात घेऊन आता आणखी कोणताही मित्रपक्ष गमावून चालणार नाही, ही बाब भाजपच्या धुरीणांच्याही लक्षात आलेली आहे. त्यामुळे ‘जेडीयू’चे सरचिटणीस पवन वर्मा यांनी ‘नितीश हाच चेहरा!’ ही घोषणा करताच बिहार भाजपचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी त्याला अर्धामुर्धा होकार दिला असून, नितीशकुमार व मोदी हे दोन चेहरे बिहारमध्ये असतील, असे सांगून आपण पूर्णपणे तडजोडीस तयार असल्याचेच सूचित केले आहे.

भाजप आणि नितीशकुमार यांचा पक्ष यांचे परस्परसंबंध हे गेल्या दोन दशकांत कधी मैत्रीचे, तर कधी दुराव्याचे राहिले आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या नितीशकुमारांनी मोदी यांना मात्र बिहारमध्ये फिरकूही दिले नव्हते आणि नरेंद्रभाईंना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भाजपने जाहीर केल्यावर तर त्यांनी भाजपशी संबंध तोडून बिहारमधील आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांशी दोस्ताना करून राज्यही जिंकले होते. त्या काळात नितीशकुमार हे विरोधकांच्या गळ्यातील ताईत बनले होते आणि २०१९ मध्ये नितीशकुमार यांचाच चेहरा पुढे करून, विरोधक देशभरात रान पेटवतील, अशी हवा होती. मात्र, त्यानंतर कुठे आणि कशी माशी शिंकली ते फक्‍त नितीशकुमार आणि भाजप यांनाच ठाऊक! एका अवचित क्षणी त्यांनी लालूप्रसादांशी काडीमोड घेतला आणि भाजपशी संग करून मुख्यमंत्रिपदाची खुर्ची कायम राखली. मात्र, गेल्या दोन-चार महिन्यांत भाजप आणि विशेषतः मोदी यांना वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकांत जी पिछेहाट पाहायला मिळाली आणि सरकारविषयीच्या काही प्रमाणातील नाराजीचे जे दर्शन घडले, ते बघून नितीशकुमार यांनी पुन्हा कोलांटउडी घेतली आणि ते विरोधकांची भाषा बोलू लागले आहेत! प्रथम त्यांनी निती आयोगाचे ‘सीईओ’ अमिताभ कांत यांच्या ‘देशाच्या आर्थिक मागासलेपणास बिहार, उत्तर प्रदेश, तसेच छत्तीसगड ही राज्ये कारणीभूत आहेत,’ या शेऱ्याला आक्षेप घेतला आणि गेल्याच आठवड्यात नोटाबंदीच्या विरोधात पवित्रा घेत बॅंकांच्या माथी अपयशाचा शिक्‍का मारला. आता बिहारमध्ये ‘जेडीयू हाच मोठा भाऊ!’ अशी चर्चा सुरू करून देत आतापासूनच दबावतंत्र वापरायला सुरुवात केली आहे. निवडणुका जवळ येत जातील, तसा भाजप आणि त्यांचे तथाकथित मित्र यांच्यातील हा ‘ब्लॅकमेलिंग’चा खेळ, सत्तेतील अधिकाधिक म्हणजेच चतकोर-नितकोर वाट्यासाठी कसा टोकाला जाणार आहे, त्याचीच साक्ष यामुळे मिळाली आहे. राजकारण हे अळवावरचे पाणी असते, हे नितीशकुमार यांच्यासारखा मुरब्बी राजकारणी जाणत नसता तरच नवल! त्यामुळे ‘रालोआ’च्या बिहारमधील चेहऱ्याबाबत थेट प्रश्‍न केला असता, ‘मला सगळ्याच चेहऱ्यांवर हसू हवे आहे!’ असे उत्तर धूर्तपणे त्यांनी दिले. अर्थात, या उत्तरामुळे भाजपच्या चेहऱ्यावर मात्र ‘आसू’ ओघळताना दिसू शकतात. सोबतच त्यांनी बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यासंबंधातील आपले जुने तुणतुणेही पुन्हा वाजविले आहे. या साऱ्या ‘खेळा’नंतर आता भाजप आपला अश्‍वमेधाचा तथाकथित घोडा किती पावले मागे घेतो, ते बघावयाचे! याचे कारण मित्रांशी किती जमवून घेतले जाते, त्यावर २०१९ चे चित्र बऱ्याच अंशी अवलंबून असेल.

Web Title: editorial loksabha election and politics