देखणं शिल्प

मल्हार अरणकल्ले
गुरुवार, 15 मार्च 2018

गोष्ट जुनीच आहे. एका शिल्पकाराची. बहुतेकांना ठाऊक असलेली. या शिल्पकाराला प्रश्न विचारला गेला ः इतकं देखणं शिल्प तू कसं साकार केलंस? शिल्पकाराचं स्पष्टीकरण ः मी विशेष काहीच केलं नाही; पाषाणातला नको असलेला भाग काढून टाकला. शिल्पकाराचं उत्तर अत्यंत मार्मिक होतं. एखाद्या गोष्टीला आपण ‘चांगलं’ असं लेबल लावतो. हे ‘चांगलं’ कसं आकाराला येतं? त्यातलं वाईट बाजूला केलं म्हणजे जे उरतं, ते चांगलं असतं. याच पद्धतीनं, एखादी गोष्ट सुंदर करणं म्हणजे तिच्यातली विद्रूपता काढून टाकणं. उत्साह मिळविणं म्हणजे, आळसाचा त्याग करणं. प्रत्येक गोष्टीत असं द्वैत अस्तित्वात असतं. एक भलं. एक बुरं. निवड आपल्या हाती असते.

गोष्ट जुनीच आहे. एका शिल्पकाराची. बहुतेकांना ठाऊक असलेली. या शिल्पकाराला प्रश्न विचारला गेला ः इतकं देखणं शिल्प तू कसं साकार केलंस? शिल्पकाराचं स्पष्टीकरण ः मी विशेष काहीच केलं नाही; पाषाणातला नको असलेला भाग काढून टाकला. शिल्पकाराचं उत्तर अत्यंत मार्मिक होतं. एखाद्या गोष्टीला आपण ‘चांगलं’ असं लेबल लावतो. हे ‘चांगलं’ कसं आकाराला येतं? त्यातलं वाईट बाजूला केलं म्हणजे जे उरतं, ते चांगलं असतं. याच पद्धतीनं, एखादी गोष्ट सुंदर करणं म्हणजे तिच्यातली विद्रूपता काढून टाकणं. उत्साह मिळविणं म्हणजे, आळसाचा त्याग करणं. प्रत्येक गोष्टीत असं द्वैत अस्तित्वात असतं. एक भलं. एक बुरं. निवड आपल्या हाती असते. पाषाणातलं काय नको, ते शिल्पकाराला ठाऊक होतं. या दृष्टीमुळं तो पाषाणात शिल्प पाहू शकला. साध्या डोळ्यांना जे दिसतं, त्याच्या पलीकडंही त्याचं आणखी वेगळं रूप असतं. ही जाणीव नसेल, तर दृष्टीला सौंदर्यच पारखं होतं.

लहान मूल नव्या खेळण्याचं बारकाईनं निरीक्षण करतं. उलटं-सुलटं. जवळून-दुरून. हा आकार, तो आकार. हा रंग, तो रंग. उत्सुक नजरेनं ते खेळण्याची ओळख करवून घेतं. जणू त्याच्याशी नजरेनं बोलतं. त्यातून मुलाचं खेळण्याशी एक नातं जमतं; आणि नंतर ते खेळात रंगून जातं. चांगल्याचं आकर्षण सगळ्यांनाच असतं. तो मानवी स्वभाव आहे. चांगलं होणं म्हणजे, आपल्यातल्या वाईट प्रवृत्ती वजा करीत जाणं. कचरा काढून टाकला, तरच स्वच्छता होते. काया-वाचा-मने चांगुलपणा कमावणं, म्हणजे स्वतःच स्वतःचं शुद्धीकरण करीत राहणं. त्यात सातत्य हवं. निष्ठा हवी. रेषा आणि रंग आधी चित्रकाराच्या मनात उमटतात. दृष्टीत त्यांची जुळवाजुळव होते. तिथल्या सूचनांनुसार हाताच्या हालचाली होत राहतात. सर्वसामान्यांना न दिसणारे बिंदू चित्रकाराला कोऱ्या कागदावर दिसतात. तो केवळ त्यांची जोडणी करतो. त्यामागं साधना असते. चित्रबिंदू ओळखण्याची दृष्टी असते. रेषा, रंग यांचा सराव करताना चित्रकार त्यांतल्या नको असलेल्या रेषा, नकोसे आकार बाजूला करतो. रेषेतली वक्रता काढली, की ती सरळ होते. वक्र असो की सरळ, ते दोन्ही रेषेचेच आविष्कार आहेत. प्रत्येकाच्या विचारांची, कृतींची, समजुतींची अशीच एक रेषा असते. त्यांतली वक्रता गेली, की सारं सुरळीत होतं. आपण कामातल्या उणिवा दूर करीत राहिलो, तर ते आपोआपच दर्जेदार होतं.

आपण कधी आपलं स्वतःचं, आपल्या स्वभावाचं निरीक्षण करतो? आपलं वर्तन, आपल्या प्रवृत्ती यांचं देखणं शिल्प आपणही तयार करू शकू? ‘पाषाणातलं नको असलेलं काढून टाकण्या’च्या शिल्पकाराच्या कृतीसारखं आपल्याला हे जमू शकेल? मातीच्या कणांमुळं गढूळ झालेलं पाणी कण तळाशी बसल्यावर निवळशंख होतं. पाण्याचं ते खरं रूप असतं. अम्लान. गढूळलेली, काळवंडलेली मनंही अशीच स्वच्छ-निर्मळ का नाही होऊ शकणार? पाणी संथ राहतं, तेव्हाच मातीचे कण तळाशी जातात. मनातील विचारांचे आवर्त निवळायलाही तीच शांतता, तोच संथपणा आणि संयम आवश्‍यक असतो.  आरशातल्या प्रतिमेत दिसतं, त्याच्या पलीकडं आपलं वेगळं-सुंदर रूप असतं. शिल्पकाराच्या दृष्टीप्रमाणं त्यातल्या नकोशा गोष्टी काढल्या, तर आपलं आतापर्यंत न दिसलेलं लोभस रूप आपण पाहू शकू. स्वतःचं हे देखणं शिल्प आपल्याला अद्याप अज्ञातच आहे. चला, स्वच्छता मोहिमेला मुहूर्त कशाला हवा?

Web Title: editorial malhar arankalle wirte article phahatpaul