अनुभवातलं नातं

editorial malhar arankalle wirte article phahatpaul
editorial malhar arankalle wirte article phahatpaul

खिडकीच्या चौकटीतून दिसणाऱ्या झाडावरचा चिवचिवाट दाट परिचयामुळं आता सवयीचा झाला आहे. परवा तिथं एकाएकी पाहुणा आवाज जाणवू लागला. आवाजाच्या रोखानं वेध घेतला, तर हिरव्या लुसलुशीत लोकरीचा गुंडा फांदीच्या एका बोटाशी खेळण्यात रंगून गेला होता. तो जीव उड्या घेत होता. नख्यांनी फांदी पकडून उलटे झोके घेत होता. चोचीचं टोक नाचवीत होता. कोवळे सूर आळवीत होता. त्या सुरांवर लहरत होता. आजूबाजूनं सरकणाऱ्या वाऱ्याच्या रेषांवर स्वार होत होता. काही क्षणांतच परतत होता. पुन्हा तीच फांदी. तेच खेळ. स्वतःच्या लडिवाळ गिरक्‍यांचा स्वतःच पाठलाग करावा, तसं फांदीवरून हवेत झेपावणं; आणि परतताना आधीचे खेळ उलट्या पद्धतीनं करीत येणं. रेशमी नक्षीदार गालिच्याची गुंडाळी उलगडावी; आणि ती पुन्हा पहिल्यासारखी जुळवून ठेवावी, तसं दृश्‍य समोर दिसत होतं. ही मखमली जादू तिथं किती तरी वेळ चलाखीचे खेळ करीत राहिली. ते पाहताना डोळ्यांच्या क्षितिजकडांवर नजरबंदीचे ढग दाटून येत गेले.

या चिमुरड्या नवख्या पाखरानं झाडाच्या एका कोपऱ्याशी घट्ट नातं गुंफलं होतं. निरागस सुरावटीतून ते झाडाशी संवाद करीत होतं. त्याच्या सुरांत सूर मिळवीत होतं. झाडाच्या पानांचा मेंदीरंग पंखांच्या तळव्यांवर पसरून घेत होतं. पाखरानं त्याचं स्वतःचं नवं जग झाडावर वस्तीला आणलं होतं. इतर कुणाच्या आड न येता, ते उजाडत होतं. मावळत होतं. हळूहळू झाडाचे सगळे ऋतुरंग पाखराच्या जगातही मिसळून गेले. झाडाच्या त्या फांदीवर पाखराच्या नात्याचं एक देखणं फूल उमलून आलं.

पाखराचं झाडाशी जुळलेलं आणि रोज अधिकाधिक ताजेपणानं उमलणारं नातं सतत जाणवत होतं. ते पाहताना सहजच प्रश्न पडला; आणि काही उत्तरंही मिळाली. नातं म्हणजे खरंच काय असतं? नातं म्हणजे एक ओढ असते. कायम जपावी अशी बांधीलकी असते. नातं म्हणजे भावनांची सुंदर गुंफण असते. नातं जुळवता येत नाही; तर ते आपोआपच जुळतं. ते जुळताना कळत नाही; आणि वाढताना लक्षात येत नाही. परस्परांसाठी केलेल्या हळव्या कृतींतून तिथं फुलं बहरून येतात; आणि तो पारिजातक दारी रोज टपटपत राहतो. नात्याला लौकीक अर्थानं नावाचं कुठलं तरी लेबल लावलं जातं; पण नातं त्याच्या पलीकडचं असतं. त्याला नाव जोडता येत नाही. आपलं नातं कुठलं, ते नेमक्‍या शब्दांत सांगता न येणं, ही त्या नातेसंबंधांतली पारदर्शकता असते. खरंच, शब्दांचं सुरांशी कुठलं नातं असतं? ढगांचं आभाळाशी काय नातं असतं? कोसळणाऱ्या जलधारा धरणीकडं कुठल्या ओढीनं येतात? वेढून टाकणाऱ्या प्रकाशाचं ज्योतीशी कुठलं नातं असतं? जलाशयाचं त्यावरल्या लाटांशी काय नातं असतं? रेषांचं आकारांशी कुठलं नातं असतं? पांथस्थाचं रस्त्यांशी काय नातं असतं? रंग आणि भावना यांच्यातला बंध कसा उलगडणार?
नाती ही अशीच असतात. कधी फुंकर घालणारी; तर कधी ओरखडे उमटविणारी. कधी समजून घेणारी; तर कधी दोष देणारी. कधी गुंतवून ठेवणारी; तर कधी फेकून देणारी. कधी स्वागतशील; तर कधी दरवाजे बंद करून घेणारी. कधी मनसोक्त बोलणारी; तर कधी अबोला धरणारी. कधी घास राखून ठेवणारी; तर कधी आपल्याच पोळीवर तूप ओढून घेणारी. कधी वाट पाहणारी; तर कधी वाट लावणारी. कधी सामोरी येणारी; तर कधी चेहरा वळविणारी.

नातं आचारांत नसतं, उपचारांत नसतं, उच्चारांत नसतं; आणि जयजयकारांतही नसतं. नातं आधारात असतं. नातं स्वीकारांत असतं. नातं शुभेच्छांत असतं. नातं कौतुकांत असतं. बोट धरून चालायला शिकविण्यात ते असतं. ते क्षमा करण्यात असतं; आणि क्षमा मागण्यातही असतं. नातं परस्परांना सावरण्यात असतं. नातं फडफडणाऱ्या पापण्यांत असतं. झुकलेल्या डोळ्यांत असतं. हाकेला ओ देण्यात नातं असतं; आणि हाक न देता वेळेला हजर होण्यातही ते असतं. "नच सुंदरी करू कोपा' असं समजावण्यात नातं असतं; आणि "समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे' असं गाण्यातही ते असतं. नातं जसं कुणासाठी तरी उमलण्यात असतं; तसंच ते कुणामुळं तरी कोमेजण्यातही असतं. नातं आठवणींत असतं; आणि विसरायचं असं ठरवूनही पुनःपुन्हा आठवत राहण्यात ते असतं.
नातं हा ज्याचा-त्याचा अनुभव असतो. त्याला नावाचं लेबल लावण्याचा अट्टहास कशाला?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com