आनंदाचे फुगे

आनंदाचे फुगे

पाणवठे जागे झाले, की तिथली वर्दळ वाढू लागते; आणि ठिकठिकाणी गजबजलेल्या आवाजांचे प्रवाह ओढ्याच्या पाण्याबरोबर वाहू लागतात. हे प्रवाह कधी संथ असतात; तर कधी त्यांतून लाटांचे डोंगर माना उंच करतात. एखाद्या आरोळीचा आघात झाला, की कुजबुजत्या शब्दांचे वर्तुळाकार तरंग पाठशिवणीचा खेळ सुरू करतात. हेच शब्द काठ ओलांडून तिथल्या गवताशी, वेलींवरल्या पानाफुलांशी, लव्हाळ्याच्या नाचऱ्या रेषांशी; आणि ओलीची माया कवटाळून बसलेल्या वाळूशी बोलू लागतात. एखादं खोडकर मूल डोळा चुकवून इकडं-तिकडं जावं, तसे पाण्याबरोबर वाहणारे शब्द काठावर कुठं कुठं जाऊन बसतात. शीळ घालीत वाऱ्याच्या मागोमाग फिरू लागतात. काही वेळानं उन्हाच्या हळदीचे कण या शब्दांवर चमकू लागतात; आणि जणू या शब्दांतून उगवून आल्यासारखी रंगीबेरंगी फुलपाखरं तिथं भिरभिरू लागतात. फूल दिसलं, की मूलही पाखरू होतं; आणि फुलपाखरांचं निरीक्षण करता करता, त्यांचा पाठलाग करता करता तलम पंख पसरून धावत सुटतं. फुलपाखरू झालेली मुलांची निर्मळ मनं ओढ्याच्या काठावरून वाऱ्यासारखी वाहत राहतात. फुलांचे रंग पसरलेल्या कॅनव्हासवर उतरून बसलेली फुलपाखरं तळहाताच्या गुलाबी पाकळीवर अलगद ठेवण्यासाठी मुलांची धावाधाव सुरू होते. मुलांचे हात जवळ पोचताच फुलपाखरं जागा बदलत राहतात; आणि आधीच्या नक्षीचा नूर क्षणाक्षणाला बदलत राहतो. फुलपाखरू हाती आलं नाही, तरी त्याच्याजवळ जाण्याची ओढही तेवढीच फुलपंखी असते.
साबणांच्या फुग्यांचा खेळही फुलपाखरांमागे धावत जाण्यासारखा असतो. नळीतून उडविलेले साबणाचे फुगे डोळ्यांना स्पष्ट दिसतात; पण पकडण्यासाठी जवळ जाईपर्यंत ते विरून जातात. फुग्यांच्या एका घोळक्‍यापुढं तसलाच आणखी दुसरा घोळका आकार घेत राहतो; आणि तो पकडायला आपण पुन्हा मागोमागं जाऊ लागतो. फुलपाखरांनी भिरभिरत राहावं, तसेच साबणाचे फुगेही एकसारखे लहरत राहतात. तुम्ही कधी पाहिलंय का, आपल्या भोवतीही साबणाच्या पारदर्शी फुग्यांसारखेच आनंदाचे फुगेही हिंदोळत असतात. हात उंचावून पकडण्याचा प्रयत्न केला, तर ते तिथून दुसरीकडं जातात; आणि आपल्याला जवळ बोलावतात. आपल्या चांगल्या विचारांतून, कृतींतून आनंदाचे फुगे निर्माण होतात; आणि धूपाच्या गंधवर्तुळांसारखा लहरणारा आनंद सभोवार शिंपीत राहतात. साबणाचे फुगे विरून गेले, तरी त्यांचा ओलावा मागं उरलेला असतो. आनंदाचे फुगेही विरून जातात; पण त्यांचे असंख्य ओले स्मृतिकण सगळीकडं पसरतात; आणि त्यांतून कित्येक नवे फुगे निर्माण होतात. आनंदाच्या फुग्यांशी खेळणं निखळ आनंदाच्या अनुभूतीच्या अतीत नेणारं असतं. साबणाचे फुगे आपल्याला आधी निर्माण करावे लागतात, तेव्हाच त्यांच्याशी खेळता येतं. आनंदाचे फुगेसुद्धा आपणच तयार करायचे असतात. फुलपाखरू एका फुलावरून दुसरीकडं जातं, तेव्हा त्याच्या रंगांचे काही थेंब फुलावर उतरलेले असतात; तसेच आनंदाचे फुगे विरताना तिथंही त्यांचे थेंब सांडलेले असतात; मात्र हे थेंब ओळखता यायला हवेत. निर्मळ आनंदासाठी दुसरं काय हवं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com