निखळ आनंदाची खिडकी

निखळ आनंदाची खिडकी

रस्त्याचे आयताकृती तुकडे मागं ढकलीत गाडी निघाली होती. सरकत गेलेल्या रस्त्याचे तलम कागद एकापुढं एक ठेवून दिल्यासारखा दृष्टिभ्रम पाठीकडील काच पुनःपुन्हा घडवीत होती. अंतर वाढत जाई, तसा या पांढुरक्‍या कागदांचा ढीग दिसू लागे; आणि आणखी पुढं गेल्यावर त्यांचा डोंगर होई. येताना धक्के दिलेल्या खड्ड्यांची-उंचवट्यांची नक्षी या डोंगराच्या अंगाखांद्यावर बसून वाकुल्या दाखवीत राही. रस्त्याच्या चढ-उतारांचे प्रवाह डोंगरावरून झुळझुळत असल्याचा भास सारखा पाठलाग करी. एखाद्या मोठ्या वळणानं हे दृश्‍य क्षणात पुसलं जाई; आणि पुन्हा मागं सरकलेले रस्त्याचे कागद, त्यांचे ढीग, डोंगर, त्यावरील प्रवाह अशी भाससाखळी आकाराला येऊ लागे. चराचर सृष्टी गोलाकार नसून, आयताकृतीच असली पाहिजे, हा समज गाडीच्या पाठीमागच्या काचेतून क्षणाक्षणाला पक्का होत जाई.

गाडीच्या खिडक्‍यांच्या काचांतून उलगडत राहिलेल्या विश्वदर्शनानं आधीचे सारे समज खोटे ठरविले होते. हिरव्या-काळपट चौकोनांची सरकती पट्टी नजरेतून धावताना अनेक रंगचेहरे उगवत-मावळत होते. दाट ते फिकट या चिमटीत एकेका रंगाचे विविध छटाकार साकारत होते. खिडकीच्या काचचौकटीत डोंगरांच्या टेकड्या झाल्या, झाडांची रोपं झाली; तर फुलांच्या ताटव्यांचे रंगीबेरंगी गुच्छ होऊन ते डोलत राहिले. उंच डोंगरावरून उतरून येणाऱ्या ओहळांच्या पाणरेषा बनल्या; आणि मनात शिरून बराच वेळ वाहत राहिल्या. त्यांची झुळझुळ कानांना हलके स्पर्श करीत राहिली. पात्राच्या किनाऱ्यालगतची माती पाण्याच्या स्पर्शानं ओलावत जावी, तसे मनाचे कंगोरे या दृश्‍यानं भिजून गेल्याची ओलसर जाणीव पाझरत राहिली.

पुढील बाजूच्या काचेतून दिसणारं सारंच आव्हानात्मक जाणवत होतं. दूरवर दिसणारा निमुळता रस्ता जवळ येईल तसतसा विस्तारत होता. झाडांच्या, घरांच्या आकृती मोठ्या होत होत डोळ्यांत शिरून बसत होत्या. लांब अंतरावर असलेलं सगळं आपल्या दिशेनं धावत येत असल्याचा भास होत होता. ज्या गतीनं ते येत होतं, तेवढ्याच गतीनं दृष्टीआडही जात होतं. या दृश्‍यांनी काचेची चौकट कधीच ओलांडलेली होती. चौकटीच्या आजूबाजूच्या अनेक गोष्टी डोकावून आपलं अस्तित्व दर्शवीत होत्या. पुढं दिसणारं बाजूच्या खिडकीत कधी गेलं; आणि तेच नंतर मागील खिडकीतून लांबवर कधी पोचलं, ते ध्यानात येत नव्हतं. खरं म्हणजे, ही सगळी दृश्‍यं जागेवरच स्थिर होती. ती धावत नव्हती; तर गाडी धावत होती; पण भास मात्र या दृश्‍यांच्या धावण्याचा-त्यांच्या गतीचा होत होता.

धावत्या गाडीबरोबर मागं सरकलेल्या दृश्‍यांबद्दल आपण खंत करतो; आणि पुढून जवळ येत असलेल्या दृश्‍यांचं भय बाळगतो. बाजूच्या खिडकीतून दिसणाऱ्या व काही काळ आपल्याबरोबर प्रवास करताहेत असं वाटणाऱ्या दृश्‍यांकडं पाहण्याचं भानच आपल्याला राहत नाही. आपल्या आयुष्याच्या बाजूनं असलेल्या भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांच्या खिडक्‍यांतील दृश्‍यांचंही हेच होतं. आपण भूतकाळाच्या आठवणींत रमतो, भविष्यकाळाच्या स्वागतात रंगतो; आणि वर्तमानकाळ मात्र सावरीच्या कापसासारखा बेदखल वाहत जातो. वास्तविक, निखळ आनंद तिथंच असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com