निर्व्याज दाद

मल्हार अरणकल्ले
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

काठोकाठ भरलेल्या भांड्यात आणखी पाणी ओतत राहिल्यावर जादा पाणी सांडत राहावं, तसा रस्त्यावरील कोलाहल सगळीकडं एकसारखा वाहत होता. संमिश्र आवाजांचा कॅलिडोस्कोप कानांत उलगडत होता. आपण यांतल्या कुठल्याही गावाचे नाही, अशा निर्विकार चेहऱ्यांची वाहनं आणि घाईतली माणसं रस्त्यांतून धावत होती. हेडफोन अडकविलेल्या मानवाकृती गाण्याच्या लकेरींना त्या गर्दीतही एकेकट्या दाद देत होत्या. कित्येक कानांशी मोबाईलचे स्क्रीन चिकटलेले होते. गर्दीचे ओहळ पावसाच्या पाण्यासारखे आपापल्या दिशांनी धावत होते.

काठोकाठ भरलेल्या भांड्यात आणखी पाणी ओतत राहिल्यावर जादा पाणी सांडत राहावं, तसा रस्त्यावरील कोलाहल सगळीकडं एकसारखा वाहत होता. संमिश्र आवाजांचा कॅलिडोस्कोप कानांत उलगडत होता. आपण यांतल्या कुठल्याही गावाचे नाही, अशा निर्विकार चेहऱ्यांची वाहनं आणि घाईतली माणसं रस्त्यांतून धावत होती. हेडफोन अडकविलेल्या मानवाकृती गाण्याच्या लकेरींना त्या गर्दीतही एकेकट्या दाद देत होत्या. कित्येक कानांशी मोबाईलचे स्क्रीन चिकटलेले होते. गर्दीचे ओहळ पावसाच्या पाण्यासारखे आपापल्या दिशांनी धावत होते. असल्या व्यावहारिक धांदलीत चिवचिवणाऱ्या फुलांच्या सुरांची झुळूक अचानक स्पर्श करून गेली, तेव्हा हा चमत्कारच वाटला; पण त्या सत्याची अनेक निरागस कोवळी रूपं एकामागून एक समोर येत राहिली. एका रंगात दुसरा रंग मिसळताना नव्या रंगाची तरंगनक्षी वर्तुळाकार होत हेलकावत राहावी, तसं दृश्‍यं रस्ताभर खेळू लागलं.

एकसारख्या गणवेशातल्या ताज्या-प्रसन्न पुष्पमुद्रा गर्दीत वाटा शोधून पावलं टाकीत कूच करू लागल्या. वाहतुकीची संततधार काहीशी विस्कळित झाली. कोवळ्या फुलांचा हा सतेज प्रवाह रस्त्याच्या एका टोकापासून दुसऱ्यापर्यंत निर्धोक पोचावा, यासाठी वाहतूक-नियंत्रक पोलिसांच्या शिट्यांचे लांबत जाणारे आवाज सुरू झाले. भर गर्दीच्या वेळी रस्ते काही क्षणांसाठी थबकले. फुलांचे दुथडी प्रवाह रस्त्याच्या कडांशी जोडून लहरत राहिले. वाफ्यात शिरणारं पाणी शेवटी शेवटी पातळसर होत जावं, तशी या फुलांची सफरचंदी पावलं विरळ होत गेली. पुन्हा पोलिसी शिट्यांचे इशारे झाले; आणि वाहनांच्या दिशा नव्या वेगानं धावत निघाल्या.

शालेय मित्र-मैत्रिणींच्या असल्या दैनंदिन कवायती आपण अनेकदा पाहतो आणि विसरूनही जातो. पुनःपुन्हा पाहिल्यानं त्यांच्या सुंदरतेची परिभाषा मात्र आपण हरवून बसतो. त्यांच्या नवतेचे रंग आपल्या दृष्टीतून उडून जातात. त्यांतल्या आकारांचं नावीन्य आपल्याला जाणवेनासं होतं. शाळांच्या परिसरात दिसणाऱ्या या नेहमीच्या चित्रांबाबतही आपलं तेच होतं. आपल्या आठवणींची पाखरं तिथं भिरभिरत असतात; पण आपण त्यांत कधी आपल्या आशा-आकांक्षा शोधतो? आपल्या स्वप्नांचे परागकण आपल्याला त्यांत कधी गवसतात? त्यांतली ताजेपणाची निर्मळता आपल्या मनाला कधी स्पर्शून जाते? आजूबाजूला खेळणारं-बागडणारं हे बाल्य मुलांत आहे. कळ्यांच्या मंदस्मितांत आहे. गंधभरल्या फुलांत आहे. पानांच्या हिरवेपणात आहे. गवताळ कुरणांच्या लुसलुशीत हालचालींत आहे. वाऱ्याच्या बेभान नृत्यांत आहे. पावसाच्या धारांत आहे. खळाळत्या प्रवाहांत आहे. पक्ष्यांच्या गाण्यांत आहे. त्यांच्या भरारत्या नक्षींत आहे. झाडांच्या स्वप्नांची गाणी कोवळी पालवी गात असते. रिमझिमत्या धारांत पावसाची गाणी न्हात असतात. फुलाफुलांत रंगगंधाचे लडिवाळ सूर खेळत असतात. ऊनकवडशांच्या तळव्यांवरून घटिका-पळांची पावलं चालत असतात. माउलीच्या कडेवर छोटं मूल असावं, तसं या प्रत्येक मोठ्या रूपाबरोबर त्याचं छोटं लडिवाळपण हमखास असतं. या छोट्या-कोवळ्या रूपांनी भविष्यातल्या त्यांच्याच मोठ्या स्वरूपाला दिलेली ही मनमोकळी दाद तर नसेल? पावसाचे थेंब धरणीवर उतरले, की काही क्षणांतच मृद्‌गंध चौफेर पसरतो. पाऊसथेंबांना तत्क्षणी दिलेली ती मुक्त-निर्व्याज दादच असते. प्रतिसाद, चांगल्याचं कौतुक मृद्‌गंधासारखं, त्याच क्षणी घमघमल्यासारखं असायला हवं. असे अनेक क्षण आपण नकळत वाया घालविलेले असतात. कौतुक करावं, असे कित्येक पाऊसथेंब आपल्या प्रतिसादाअभावी सुकून जातात. त्यांचा ओलेपणा जपणं आपल्याच हातांत आहे.

Web Title: editorial malhar arankalle wirte article phahatpaul