सत्यापलाप!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

विज्ञानाच्या सुविधा हव्यात; पण विज्ञानाचा "डोळा' नको, ही अनेकांची प्रवृत्ती असते. वास्तविक विज्ञान ही या विराट निसर्गाच्या रहस्यांचा वेध घेणारी अखंड शोधयात्रा आहे; परंतु सर्व काही आम्हाला पूर्वापार माहीतच होते, असा पवित्रा घेतला, की शोधच थांबतो. प्रश्‍न पडायचे बंद होते आणि उरतो तो फुकाचा अभिमान. मग आमच्या पूर्वजांकडे विमानविद्या होती, क्षेपणास्त्रे होती आणि मोबाईलही होते, असे मंडळी सांगू लागतात. त्यासाठी वेदाचे दाखले देतात. किंबहुना वेदातच सर्व ज्ञान सामावलेले आहे, ही समजूत घट्ट कवटाळून बसतात.

विज्ञानाच्या सुविधा हव्यात; पण विज्ञानाचा "डोळा' नको, ही अनेकांची प्रवृत्ती असते. वास्तविक विज्ञान ही या विराट निसर्गाच्या रहस्यांचा वेध घेणारी अखंड शोधयात्रा आहे; परंतु सर्व काही आम्हाला पूर्वापार माहीतच होते, असा पवित्रा घेतला, की शोधच थांबतो. प्रश्‍न पडायचे बंद होते आणि उरतो तो फुकाचा अभिमान. मग आमच्या पूर्वजांकडे विमानविद्या होती, क्षेपणास्त्रे होती आणि मोबाईलही होते, असे मंडळी सांगू लागतात. त्यासाठी वेदाचे दाखले देतात. किंबहुना वेदातच सर्व ज्ञान सामावलेले आहे, ही समजूत घट्ट कवटाळून बसतात. पण अशा मानसिकतेची व्यक्ती खासदारच नव्हे, तर केंद्रात राज्यमंत्री असावी आणि तीदेखील शिक्षणाशी संबंधित खात्यात, हे खरोखर धक्कादायक आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी औरंगाबादेतील "पोलिस पब्लिक स्कूल'मध्ये बोलताना थेट डार्विनच्या उत्क्रांती सिद्धान्तावरच हल्ला चढविला. "माकडापासून माणूस झाला, हे डार्विनचे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. पाठ्यपुस्तकातून उत्क्रांतीचा हा सिद्धान्तच हटविला पाहिजे' असे सांगून ते मोकळे झाले. या अफलातून निष्कर्षांसाठी सत्यपाल सिंहांनी कोणते "पुरावे' दिले आहेत? एकीकडे त्यांनी वेदांचा दाखला दिला. त्या वाड्‌मयात असे काही लिहिलेले नाही, असे ते म्हणाले. खरे म्हणजे त्यांची विचारसरणी लक्षात घेता एवढ्यावर त्यांचे भागायला हवे होते. पण मुद्दा सिद्ध करण्यासाठी परदेशी वैज्ञानिकांनी उत्क्रांती सिद्धान्त यापूर्वीच खोडून काढला आहे, असाही दावा केला. सगळाच सत्यापलाप. डार्विनचा सिद्धान्त वैज्ञानिकांनी खोडून काढलेला नाही. माकडापासून माणूस झाला, असे डार्विन सांगत नाही, तर माणूस आणि माकड यांचे पूर्वज समान होते, हे नमूद करतो. परंतु, या तपशिलात सत्यपाल सिंहांना स्वारस्य नाही, याचे कारण त्यांचे निष्कर्ष ठाम आहेत. अमेरिकेत काही ख्रिस्ती मूलतत्त्ववादी डार्विनला अभ्यासक्रमातून हटवा, अशी मागणी करीत असतात, ते त्यांच्या धार्मिक समजुतींना धक्का बसतो म्हणून. आपल्याकडच्या मूलतत्त्ववाद्यांचे आजवर डार्विनकडे लक्ष गेले नव्हते. आता सत्यपाल सिंहांनी तीदेखील "उणीव' भरून काढली आहे! परंतु, विज्ञान दृष्टिकोन रुजवू पाहणाऱ्यांचे काम त्यामुळे आणखी अवघड बनते आहे. मनुष्यबळ विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री या नात्याने प्रकाश जावडेकरांनी यात लक्ष घालून याबाबत स्पष्टीकरण करायला हवे.

Web Title: editorial marm science