पुत्रप्रेम की सत्तेची भूक? 

Editorial Marma UP politics
Editorial Marma UP politics

कोणाच्या आयुष्यात नेमक्‍या कोणत्या वेळी कोणते वळण येईल, त्याची खातरजमा करून घ्यायची असेल तर एकेकाळचे कॉंग्रेसचे उत्तर प्रदेशातील बलाढ्य नेते नारायणदत्त तिवारी यांच्या चरित्रपटावर नजर टाकायला हवी. तिवारी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री एकदा-दोनदा नव्हे तर तीन वेळा भूषविले. त्यानंतर उत्तर प्रदेशातून वेगळ्या झालेल्या उत्तराखंड या छोटेखानी राज्याचेही ते मुख्यमंत्री झाले. दरम्यान, इंदिरा गांधी यांचा अलोट विश्‍वास संपादन केलेला असल्यामुळे केंद्रातही अर्थ आणि परराष्ट्र व्यवहार अशा महत्त्वाच्या खात्यांची धुरा त्यांच्या हाती आली आणि आंध्र प्रदेशचे राज्यपालपदही त्यांच्याकडे चालत आले! मात्र, आता वयाची नव्वदी ओलांडल्यानंतर आपले पुत्र रोहित शेखर यांच्या राजकीय प्रवेशासाठी त्यांना भारतीय जनता पक्षाचे उंबरठे झिजवावे लागले. यास नियतीचा खेळ म्हणायचा की राजकीय सत्तापदांची हाव म्हणायची की पुत्रप्रेम? मात्र, तिवारी हे भाजप कार्यालयात अमित शहा यांच्या उपस्थितीत दाखल झाल्यामुळे ते स्वत:च भाजपमध्ये गेल्याच्या वावड्या उठल्या आणि अखेरीस भाजप नेत्यांनाच त्याचा इन्कार करावा लागला! 
पुन्हा तिवारी यांचे हे पुत्रप्रेम अलोटच म्हणावे लागेल; कारण अवघ्या काही वर्षांपूर्वीपर्यंत ते रोहित हा आपला मुलगा असल्याचा सातत्याने इन्कार करत होते! मात्र, रोहित याने आपला हा दावा सिद्ध करण्यासाठी थेट कोर्टाची चावडी गाठली आणि सहा वर्षांच्या लढ्यानंतर पिताश्रींना या "चिरंजीवां'चा आपले औरस पुत्र म्हणून स्वीकार करावा लागला! तिवारींच्या एका प्रेमप्रकरणातून हे बाळ जन्माला आले होते. आंध्र प्रदेशचे राज्यपाल असताना, त्यांची काही छायाचित्रे प्रसिद्ध झाली आणि अत्यंत अवमानित अवस्थेत त्यांना राज्यपालपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्या वेळी तिवारी तसेच कॉंग्रेस यांच्या वर्तनावर सडकून टीका करणारा भाजपच आता रोहित शेखर यांचे आपल्या पक्षात खुल्या दिलाने स्वागत करत आहे! उत्तर प्रदेशातील कॉंग्रेसच्या ब्राह्मण "व्होट बॅंके'बरोबरच उत्तराखंडमधील कुमॉंऊ प्रदेशातील मतदार आपल्या बाजूस काही प्रमाणात तरी आपल्या बाजूला झुकेल, अशी त्या मागची अटकळ असणे शक्‍य आहे; पण त्यामुळेच पाच राज्यांतील निवडणुका जिंकण्यासाठी "चाल, चलन और चारित्र्य' यांच्या गप्पा मारणारा भाजप कोणत्या स्तराला जात आहे, यावर लख्ख प्रकाश पडला आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com