नको व्यर्थ भार विद्येचा!

मिलिंद नाईक
मंगळवार, 6 मार्च 2018

अभ्यासक्रमात आटोपशीरपणा आणण्याचा विचार स्वागतार्ह असला, तरी हा बदल घडविताना अनेक घटकांचा विचार करावा लागेल.

अभ्यासक्रमात आटोपशीरपणा आणण्याचा विचार स्वागतार्ह असला, तरी हा बदल घडविताना अनेक घटकांचा विचार करावा लागेल.

शा लेय अभ्यासक्रम २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून निम्म्यावर आणण्याचा केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्र्यांचा मनोदय महत्त्वाचा असून यासंबंधी सर्वांगीण विचार व्हायला हवा. मंत्रिमहोदयांनी ‘एनसीईआरटी’ला या संदर्भात काही सूचनाही दिल्या असून, त्यांचे म्हणणे असे, की शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकी अभ्यासाबरोबरच खेळणे, एखादी कला शिकणे, अवांतर वाचन करणे, विविध कौशल्य मिळवणे आदी गोष्टीही करायला हव्यात. बौद्धिक कौशल्यांबरोबरच शारीरिक, मानसिक व मनोकायिक कौशल्येही व्यक्तिमत्त्व विकासासाठी गरजेच्या असतात.

  प्रारंभीच्या काळात गुरुकुल पद्धत होती. तेव्हा विद्यार्थी गुरूंच्या सान्निध्यात राहून कौशल्यांचे थेट प्रशिक्षण घेत. त्या वेळी पाठ्यपुस्तके अस्तित्वात नव्हती. ज्ञानदान गुरूकडून शिष्याकडे बरेचसे मौखिक पद्धतीने होत होते. स्मरणावर भर होता. दुसऱ्या स्थित्यंतरात पाठ्यपुस्तके आली, त्यामुळे माहितीची देवाणघेवाण छापील साहित्याद्वारे होऊ लागली. याने शाळेचे आणि अध्यापकांचे महत्त्व कमी झाले नाही; पण भूमिका बदलली. माहिती सांगण्याऐवजी अध्यापक तिचा अर्थ सांगू लागले. त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग कसा करायचा हे शिकवू लागले. स्मरणावरचा भर कमी झाला. जशी अधिक प्रगती झाली तशी माहिती देवाणघेवाणीची साधने अधिक विकसित झाली. माहितीचा स्फोट झाला. या स्थित्यंतरात शाळा-शिक्षकांची भूमिका पुन्हा बदलायला हवी. स्मरणावरचा भर आणखी कमी करायला हवा. उपलब्ध प्रचंड माहितीतून आवश्‍यक ती माहिती कशी मिळवायची व ती आपल्या कामासाठी कशी वापरायची, हे शिकवायला हवे. माहितीच्या उपयोजनाची तंत्रे शिकवायला हवीत. या दृष्टीने विचार करता सरकार पाठ्यपुस्तकी माहितीचा भार कमी करत असेल, तर ती गोष्ट काळानुरूप आहे. मात्र उरणारा वेळ कसा वापरला जातो, हे महत्त्वाचे ठरेल. अभ्यासक्रम सोपा करून तपशिलात शिकवणे, काळानुरूप नवीन कौशल्ये शिकविणे या बाबी महत्त्वाच्या ठरतील. माहिती जर मोठ्या प्रमाणावर व पुस्तकांच्या पलीकडे जाऊन दृक्‌-श्राव्य माध्यमांतून उपलब्ध असेल तर केवळ माहितीची देवाण-घेवाण हे शालेय शिक्षणाचे उद्दिष्ट राहणार नाही. शाळा विविध प्रकारची कौशल्ये शिकवणारे केंद्र बनावे. यामध्ये निरीक्षण, वाचन, गतीवाचन, लेखन अशी अभ्यास-कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवावीत. त्यात कल्पकता, निर्णयक्षमता, समस्यापरिहार इत्यादी बौद्धिक कौशल्यांचा समावेश होऊ शकतो.

शिक्षणात प्रकल्प पद्धतीचा व्यापक अंतर्भाव करायला हवा. माहिती मिळवायची कशी, तिची पुनर्मांडणी करायची कशी, त्यावर प्रक्रिया करून अनुमान कसे काढायचे व त्याचे सादरीकरण कसे करायचे, हे यातून विद्यार्थी शिकतात. सातत्याने आदळणाऱ्या प्रचंड माहितीचे करायचे काय, ती पचवायची कशी व वापरायची कशी, हे शिकवावे. सध्याच्या रचनेत ‘प्रकल्प पद्धती’चा संकुचित अर्थ घेतला जातो, तो येथे अभिप्रेत नाही. प्रकल्पांचे अनेक प्रकार आहेत, ज्यात केवळ माहितीच्या संकलनापासून ते नवीन ज्ञानाच्या निर्मितीपर्यंतच्या सर्व टप्प्यांचा समावेश होऊ शकतो. पाठ्यपुस्तकी अभ्यासक्रमावरील भार कमी झाल्याने एक धोका संभवतो. तो म्हणजे रिकाम्या होणाऱ्या वेळाचे नेमके काय करायचे, याचे मार्गदर्शन न मिळाल्यास तो वेळ वाया जाण्याची शक्‍यता आहे. सर्वच पालक व विद्यार्थी यांना यासंबंधीची दृष्टी असेलच असे नाही. त्यामुळे सर्वांगीण व्यक्तिमत्त्वविकासासाठी नेमके काय करायचे, याचे मार्गदर्शन व त्यासाठीच्या उपक्रमांची सोय शाळांमधून करावी लागेल. यासाठी शाळांना त्यांच्या रचनेत मोठे बदल करावे लागतील. ते सर्वच शिक्षणसंस्थांना लगेचच पचवता येतील, असे नाही. त्यामुळे काही आर्थिक रचनेची सोय व अध्यापक प्रशिक्षणाची सोय शिक्षण विभागाला त्वरेने करावी लागेल. अभ्यासक्रम कमी किंवा सोपा केला की आणखी एक धोका संभवतो. सर्वांनाच चांगले गुण मिळण्याची शक्‍यता निर्माण होऊन हुशार विद्यार्थी व कच्चा विद्यार्थी यातील फरक सापडण्याची शक्‍यता कमी होते. त्यामुळे अभ्यासक्रम कमी केल्याचा तोटा बुद्धिमान विद्यार्थ्यांना होतो. यासाठी निदान परीक्षेची काठिण्यपातळी तरी कमी करू नये असे वाटते. त्यासाठी आता परीक्षेत माहितीपर प्रश्न विचारण्याऐवजी उच्च क्षमतेवर आधारित प्रश्न अधिक विचारले जावेत. ज्याने हुशार विद्यार्थ्यांची निराशा होणार नाही. अभ्यासक्रम कमी केला किंवा सोपा केला तर आणखी एक धोका वर्तवला जात आहे- तो म्हणजे भारतीय विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील परीक्षांमधील यश कमी होईल हा होय. यात तथ्य आहे. त्यासाठी काही उपाय योजावे लागतील. शिवाय गाळल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमामुळे विषयाच्या एकंदरीत आकलनावरही परिणाम होऊ शकतो. म्हणून अभ्यासक्रम कमी न करताही मूल्यमापनाच्या पद्धती बदलून विद्यार्थ्यांवरील ताण कमी करता येईल. उदाहरणार्थ पुस्तकासह परीक्षा (ओपन बुक टेस्ट). अभ्यासक्रमाच्या सर्वच भागांवर लेखी परीक्षा घेतलीच पाहिजे असेही नाही. काहींचे परीक्षण कार्यपत्रके किंवा गृहपाठांच्या माध्यमातूनही करता येईल. शिक्षकांची गुणवत्ता, त्यांच्यावर लादली जाणारी शिक्षणेतर कामे, अनावश्‍यक अवाजवी सुट्ट्या, नियोजनाचा अभाव या गोष्टींमध्ये सकारात्मक बदल केल्याशिवाय अभ्यासक्रम कितीही कमी केला तरी योग्य अध्यापनाशिवाय विद्यार्थ्यांचे आकलन परिपूर्ण होऊ शकणार नाही.

अभ्यासक्रमाच्या विस्ताराइतकाच वर्गातील विद्यार्थ्यांची अधिक संख्या हा गुणवत्तेवर परिणाम करणारा अधिक महत्त्वाचा घटक आहे. त्यात बदल केल्याशिवाय गुणवत्तेत पुरेशी वाढ दिसणार नाही. याचबरोबर ५वी व ८वी साठी परीक्षा घेण्याची आवश्‍यकताही प्रकट केली गेली. खरे तर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हीच पद्धत मूल्यमापनाची योग्य पद्धत आहे; पण दुर्दैवानं आपल्या देशातल्या शिक्षणपद्धतीला ते झेपलं नाही. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन याचा अर्थ अनेकांनी विद्यार्थ्यांना नापास करायचे नाही, असा घेत स्वत:वरची जबाबदारी कमी केली. त्यामुळे विद्यार्थ्याला विशिष्ट गुणवत्तेपर्यंत पोहविण्यासाठी घ्यावयाचे कष्ट कमी पडू लागले व गुणवत्ता ढासळली. स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीही येते, हे अनेकांना लक्षात आले नाही. त्यामुळे ५वी व ८वी साठी संकलित परीक्षा घेण्याचे मंत्रिमहोदयांनी सुचविल. ते योग्य वाटते.

शिक्षकांनी अधिमित्राची (मेन्टॉरस्‌) भूमिका केली पाहिजे, असाही उल्लेख मंत्र्यांनी केला. त्याचेही स्वागत केले पाहिजे. मात्र ही योजना राबविण्यास कठीण आहे. अधिमित्राची भूमिका करण्यासाठी अध्यापकाची योग्यता मोठी लागते व विद्यार्थ्याची तशी मानसिकताही लागते. नियुक्त अधिमित्र योजना फारशा यशस्वी झालेल्या दिसत नाहीत. तरीही प्रयोग करण्याजोगा आहे. शिक्षणात जे कालोचित बदल होऊ घातले आहेत, त्याचे सकारात्मक परिणाम दिसण्यासाठी काही काळ धीर धरावा लागेल, हे मात्र नक्की.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial milind nike wirte education article