पुरस्कारांचे सुस्कारे! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणे हा कलावंतासाठी दुर्मीळ क्षण असतो. यंदा मात्र या परंपरेला फाटा देण्यात आला. खरे तर कलावंतांची अवहेलना होणार नाही, याची काळजी माहिती-प्रसारण खात्यानेच घेणे गरजेचे होते.

राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणे हा कलावंतासाठी दुर्मीळ क्षण असतो. यंदा मात्र या परंपरेला फाटा देण्यात आला. खरे तर कलावंतांची अवहेलना होणार नाही, याची काळजी माहिती-प्रसारण खात्यानेच घेणे गरजेचे होते.

चित्रपटांच्या रंगबिरंगी दुनियेत पुरस्कार सोहळ्यांची कमतरता नाही. बहारदार नेपथ्य, रंगारंग नृत्ये, आतषबाजी आणि दिलकश सूत्रसंचालनानिशी रंगणारे हे सोहळे प्राय: कुठल्यातरी खासगी संस्थेद्वारे दिले जातात. चित्रपटांच्या दुनियेतला सर्वोच्च मानला जाणारा ‘ऑस्कर’ पुरस्कारही तसा खासगी संस्थेचाच म्हणायचा. असे असले तरी राष्ट्रीय पुरस्कारांना लाभलेले पावित्र्य या पुरस्कारांना क्‍वचितच येते. कारण उघडच आहे. राष्ट्रीय पुरस्कार हा आपल्या देशाने कलावंताला केलेला एक मानाचा मुजरा असतो. कलाक्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या कलाकाराला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना कृतकृत्य वाटते ते त्यामुळेच. आपल्या मातीने आपल्या कलागुणांची बूज राखल्याची ती एक कृतज्ञतेची जाणीव असते. परंतु, यंदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मात्र मानकऱ्यांच्या हातात राष्ट्रीय पुरस्कारासोबत अवहेलनेचे ‘स्मरणचिन्ह’ मिळाले. पैसा, रक्‍त, घाम, अश्रू आणि प्रतिभा पणाला लावून चित्रकर्मी आपली कलाकृती पेश करतात. राष्ट्रीय पुरस्कारामुळे त्या साऱ्याचे चीज होते. ते चीज न झाल्याची भावना मनाशी घेऊन कलाकार रित्या मनाने घरी परतले.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार दिले जाणार, हे गृहितच होते; कारण गेल्या ६५ वर्षांची ती परंपरा आहे. दरवर्षी ठरल्या तारखेला राजधानी दिल्लीत हा सोहळा दिमाखात पार पडतो. सर्व कलावंतांना महामहीम राष्ट्रपती समारंभपूर्वक पुरस्कार प्रदान करतात. हा कलावंताच्या आयुष्यातील एक दुर्मीळ क्षण असतो. यंदा मात्र या परंपरेला फाटा देण्यात आला. ‘शिष्टाचारानुसार राष्ट्रपती फक्‍त एकच तास समारंभाला उपस्थित राहतील. बाकी सर्व पुरस्कार माहिती-प्रसारण खात्याचे मंत्रिमहोदय प्रदान करतील,’ असे रंगीत तालमीच्या वेळी, म्हणजे आदल्या दिवशी स्पष्ट करण्यात आले. या वागणुकीमुळे संतापलेल्या अनेक कलावंतांनी ‘विज्ञान भवना’कडे न फिरकणेच पसंत केले. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी कलावंतांनीही आपला संताप व्यक्‍त केला, पण एखाददुसरा कलाकार सोडून बहुतेकांनी मंत्र्यांच्या हस्ते का होईना, पण पुरस्कार स्वीकारला. कलावंत म्हणून अपमान झाला असला, तरी राष्ट्रीय पुरस्काराचा अपमान करायचा नाही, ही या कलावंतांची भूमिका परिपक्‍वच म्हणायला हवी. राष्ट्रपतींनी तासाभरात १३७ पैकी फक्‍त अकरा मोठे पुरस्कार प्रदान केले. ते सारे पुरस्कार दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी किंवा पद्मभूषण मिळालेले संगीतकार ए. आर. रेहमान आदींसारख्या प्रस्थापितांसाठीचेच होते. ज्यांना पुरस्कारामुळे खरे प्रोत्साहन आणि बळ मिळाले असते त्यांना मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारावे लागले.
शिष्टाचाराचे एवढे अवडंबर प्रसंगी का माजवले जाते, हे दिल्लीच्या राजकारणातले एक उघड गुपित आहे. राष्ट्रपतींऐवजी अन्य कुणाच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्याची वेळ आजवर तीन-चारदाच आली आहे. राष्ट्रपतींचे परदेश दौरे वा अन्य महत्त्वाच्या बाबींमुळे एखाद-दुसऱ्या वेळेला असे घडले होते. परंतु, राष्ट्रपती एका तासाच्या वर कुठल्याच कार्यक्रमाला उपस्थित राहात नाहीत, असे शिष्टाचाराचे कारण यंदा दिले गेले. असे का घडले असावे? खरे तर कलावंतांची अवहेलना होणार नाही, याची काळजी माहिती-प्रसारण खात्यानेच घेणे गरजेचे होते. एरवी याच मंडळींच्या कलाकृतींमधून सरकार भरभक्‍कम मनोरंजन कराची कमाई करत असते. याच कलावंतांच्या प्रतिभेमुळे देशाचे नावही मोठे होत असते. असे असूनही या कलावंतांच्या वाट्याला हा हिरमोड यावा, हे सांस्कृतिकदृष्ट्या चांगले लक्षण मानता येणार नाही. रोहित वेमुला किंवा अखलाक मृत्यूप्रकरणी काही कलावंतांनी राष्ट्रीय वा सरकारी पुरस्कार परत करून निषेध नोंदवला, तेव्हा याच सत्ताधाऱ्यांना ते झोंबले होते. मग तेच पुरस्कार देताना यथेच्छ हेळसांड केल्यानंतर कुणी असे झोंबणारे तिखट उत्तर दिले, तर सत्ताधाऱ्यांनी ते स्वीकारण्याची तयारीही ठेवली पाहिजे. जे घडले ते घडायला नको होते. एक अनावश्‍यक बहिष्कार नाट्य मात्र प्रेक्षकांना बघावे लागले. ज्याचा ना कुणाला आनंद होता, ना कुणाचे समाधान. प्रसादाच्या शिऱ्याच्या पहिल्या घासात खडा लागावा, तशी ही नकोशी जाणीव आहे. यापुढे तरी असले प्रकार टळतील, याची दक्षता घेणे इष्ट.

Web Title: editorial National Film Awards As President