दिवाळी भेट! (ढिंग टांग)

Dhing Tang
Dhing Tang

सर्वप्रथम सर्वांस दिवाळीच्या हार्दिक आणि अनेकानेक शुभेच्छा! (अनेकानेक द्यायला काय जाते? फुकट आहेत.) महाराष्ट्रातील आमच्या लाखो वाचकांना हे एव्हाना ठाऊक आहेच की आम्ही शतप्रतिशत याने की अगदी बालपणापासून याने की अगदी हाडाचे पत्रकार आहो. पत्रकारिता आमच्या धमन्यांतून अहर्निश सळसळत असते व बातमीचा वास आम्हांला सर्वात आधी लागतो. (खुलासा : ही धमकी नव्हे.) आम्ही हे असे आघाडीचे पत्रकार असल्याने साहजिकच आमची उठबस थोरामोठ्यांमध्ये सदैव असते, हे वेगळे सांगावयास नको.

सांप्रत दिवाळीचे दिवस असल्याने भेटवस्तूंची देवाणघेवाण होणे साहजिकच आहे. त्यात पत्रकारांस विविध प्रकारच्या वस्तू भेट देण्याची पूर्वापार चाल आहे. ह्यात देवाण काही नसली, तरी घेवाणीसाठी आम्हाला सहभागी व्हावेच लागते. वास्तविक आम्हाला भेटवस्तूचे विशेष काही वाटत नाही. "की घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमानें' हे आमचे ब्रीद होय. (खुलासा : ह्यातील बऱ्याच शब्दांचा अर्थ आम्हाला अजून लागलेला नाही.) पत्रकाराने हमेशा निःस्पृह राहून बातमीदारी केली पाहिजे. अन्याय व भ्रष्टाचारावर प्रहार केले पाहिजेत. पत्रकारिता हा बहुधा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. ह्या चौथ्या स्तंभावरून आठवले. लोकशाही नावाची इमारत दिल्लीत कुठेतरी असून सदर इमारतीच्या चौथ्या स्तंभावर "पत्रकारिता' अशी पाटी लावली असल्याची आमची समजूत होती. नंतर ती खरी असल्याचे कळले!! पुन्हा असो. 
आम्हांस दिवाळीची गिफ्ट देण्यासाठीची धडपड आम्ही समजू शकतो. पण आपल्यामुळे कोणांस का त्रास पडावा? त्यासाठी आम्ही काही पावले योजिली आहेत, ती येणेप्रमाणे : 

1. कृपया भेटवस्तू घरच्या पत्त्यावर पाठवावी. हपिसात पाठवलेल्या वस्तू लंपास होतात, असा अनुभव आहे. पत्ता खाली दिला आहे. 
2. तूर्त आम्ही दिवाळीच्या सुट्टीवर (घरीच) आहो, ह्याची कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी. भाऊबीजेनंतरही तीन-चार दिवस घरी राहाणेत येईल. प. खा. दि. आ. 
3. हपिसात पाठवण्याच्या भेटवस्तूत रांगोळ्या, पणत्या, दिवाळी अंक असले सटरफटर सामान शक्‍यतो ठेवावे. ते गमावले तरी वाईट वाटत नाही. ते सुट्टीनंतर कलेक्‍ट करणेत येईल. प. खा. दि. आ. 
4. सुट्टीनंतरही ते कधीही कलेक्‍ट करणेची सोय आहे. काळजी नसावी! 
5. ज्यांस दिवाळीचा मुहूर्त साधणे काही कारणाने शक्‍य झाले नसेल, त्यांनी नाताळाचे प्लानिंग आत्ताच करून ठेवावे. (व आम्हांस तसा दिलासाही द्यावा. थॅंक्‍यू!) 
6. काजू-बदाम, बेदाणे-पिस्ते आदी सुक्‍यामेव्याच्या पाकिटांचा वर स्पष्ट उल्लेख असावा. वर्गीकरणास सुलभ जाते. प. खा. दि. आ. 
7. गिफ्ट व्हावचरांचे स्वागत आहे!! किंबहुना, गिफ्ट व्हावचर हा अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा आदर करणारा अभिनव प्रकार आहे, असेच आमचे मत आहे. प. खा. दि. आ. 
8. आम्ही पाकीटबाज पत्रकार नाही. तेव्हा नुसती पाकिटे देऊ नयेत!! 
9. पिवळ्या रंगाचा शर्ट व प्यांट पीस (आता) देऊ नये. कां की मा. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरील भंडाऱ्यास आम्ही मंगळवारी उपस्थित होतो. तिथे एक साडी आणि शर्ट-प्यांट पीस ह्यांचा आलरेडी लाभ झालेला आहे!! तोही पिवळा शर्टपीस!! एक शंका : ह्याचा पीत पत्रकारितेशी काही संबंध असावा काय, अं? असो. 
10. गुदस्तसाली निळ्या रंगावर भर दिसून आला. तेव्हाची कापडे अजून शिल्लक आहेत. तेव्हा निळा रंगही शक्‍यतो टाळावा. पण शक्‍यतोच! त्यासाठी भेटवस्तू रद्द करू नये!! 
11. काही नेत्यांनी औंदा नुसती फराळाची पाकिटे पाठवली आहेत. हे चालणार नाही! 
12. भेटवस्तूंची होम डिलिवरी शक्‍य नसेल, तर संबंधित पार्टीने आपल्या ऍड्रेससह आगाऊ सूचित करणे अनिवार्य राहील. इन दॅट केस, आमचा माणूस (म्हंजे आम्हीच!) सोर्सकडे येऊन भेटवस्तू घेऊन जाईल. 
....उपरोक्‍त बारा कलमांचे पालन करून उभयतांची दिवाळी सुखाची व समृद्धीची करावी, ह्याच शुभेच्छा! प. खा. दि. आ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com