रण की बात! (अग्रलेख)

narendra modi
narendra modi

गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच या पुढेही भाजपची रणनीती काँग्रेसची कोंडी करणारीच असणार, हे नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणावरून स्पष्ट झाले; पण संसदेतील चर्चा या पातळीवर केली जावी का, हा प्रश्‍न या निमित्ताने समोर आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संसदेच्या दोन्ही सभागृहांतील भाषण पुढच्या निवडणुकांच्या चर्चाविश्‍वाचा रोख स्पष्ट करणारे होते. यंदाच्या वर्षात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका आणि त्यापाठोपाठ येणारी लोकसभा निवडणूक यांचा ‘अजेंडा’ निश्‍चित करण्यासाठीच थेट संसदेच्या व्यासपीठाचा त्यांनी उपयोग केला आणि पुन्हा एकदा विरोधकांना खिंडीत गाठले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला होताच; त्यानंतर या चर्चेला उत्तर देताना मोदी यांनी आपल्या जातिवंत आक्रमक स्वभावाचे दर्शन घडवत विरोधकांचे; विशेषत: काँग्रेसचे वाभाडे काढले. आता पुढचे सारे वर्ष काँग्रेसला मोदी यांनी केलेल्या विविध आरोपांना उत्तरे देत, या अजेंड्यामागून फरफटत जावे लागेल, असे दिसते. सर्वोच्च सभागृह असलेल्या संसदेच्या व्यासपीठाचा असा वापर करावा काय, हा प्रश्‍नच आहे. मात्र, मोदी यांचे अवघे लक्ष निवडणुका जिंकण्याकडेच असल्याचे यापूर्वीही दिसून आले होतेच; त्यामुळे आयती चालून आलेली ही संधी ते गमावते तरच नवल! खरे तर पुढच्या काळात राज्याराज्यांतील प्रादेशिक पक्ष हेही भाजपपुढील कडवे आव्हान असणार. मात्र मोदींची रणनीती काँग्रेसलाच लक्ष्य करण्याची आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंपासून सुरवात करून थेट राहुल गांधी यांच्यापर्यंत येताना त्यांनी काँग्रेसमधील गांधी कुटुंबीयांच्या घराणेशाहीच्या चिंधड्या उडवल्या. त्यामुळे कमालीच्या संतप्त झालेल्या काँग्रेस सदस्यांनी आपल्या निष्ठेचे प्रदर्शन दाखवण्यासाठी सभागृहात गोंधळ घालत ‘जुमलेबाजी बंद करो!’ अशा घोषणांचा गजर सुरू ठेवला. मात्र, मोदींनी त्याची जराही दखल न घेता, ‘काँग्रेसने देशाचे तुकडे केले, नेहरूंऐवजी वल्लभभाई पटेल पंतप्रधान झाले असते, तर काश्‍मीर प्रश्‍न उद्‌भवलाच नसता...’ असे अनेक आरोप केले. या साऱ्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, याची चर्चा पुढे सुरू राहील. ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांनी ‘पटेल तर काश्‍मीरच्या भारतातील सामीलीकरणाच्याच विरोधात होते,’ असे निदर्शनास आणून देत या चर्चेला तोंड फोडलेच आहे. अर्थात, भाजप आणि मोदी त्याकडे दुर्लक्ष करून याच आरोपांची जपमाळ लोकसभा निवडणुकीपर्यंत ओढणार, हे उघड आहे. काँग्रेसला आणीबाणीच्या काळातील राजवट पुन्हा आणायची आहे, तर भाजप ‘नवभारता’चे स्वप्न पाहत आहे, असे सांगत मोदी यांनी ‘काँग्रेसने लोकशाहीबद्दलची भाषणबाजी बंद करावी,’ असा थेट टोला सोनिया आणि राहुल यांच्याकडे पाहत लगावला! गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी ‘तुम्ही काँग्रेसला साठ वर्षे दिलीत, आम्हाला साठ महिने द्या!’ असे सांगत असत. मात्र, या चर्चेला उत्तर देताना मोदी यांनी गेल्या ४० महिन्यांत त्यांच्या सरकारने काय केले, याचा अभावानेच उल्लेख केला आणि केला तोही काँग्रेसला चिमटे काढण्यासाठीच!

गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले लक्षणीय यश आणि राजस्थानात लोकसभेच्या दोन पोटनिवडणुकांत भाजपचा झालेला पराभव, या पार्श्‍वभूमीवर असे करण्याची गरज त्यांना वाटली असेल. काँग्रेस पुन्हा एकवार खंबीरपणे उभे राहून आपल्याला आगामी निवडणुकांत जेरीस तर आणणार नाही, या शंकेने त्यांना घेरले आहे, यावरही त्यामुळे शिक्‍कामोर्तब झाले. त्यामुळेच गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच या पुढेही भाजपची रणनीती काँग्रेसची कोंडी करणारीच असणार, हे स्पष्ट झाले आहे. शिवाय, राहुल गांधी हे सातत्याने करत असलेल्या वादग्रस्त ‘राफेल करारा’बाबतच्या आरोपांविषयी मोदींनी मौन बाळगणेच पसंत केले आहे. राफेल करारासंबंधात राहुल यांनी केलेल्या आरोपांवर गांधी कुटुंबीयांना ‘बोफोर्स’ची आठवण करून दिल्याने पडदा पडू शकणार नाही, हे मोदी सरकारने ध्यानात घ्यायला हवे. शिवाय, तसे करायचे असेल तर मग सत्ता संपादन करताना दिलेल्या पारदर्शक कारभाराच्या आश्‍वासनाचे काय? पण मोदी यांना या असल्या प्रश्‍नोत्तरांत रस नाही, हे याआधीही दिसले आहे. घणाघाती टीका करावयाची, ती करताना सत्य-असत्याचा बेमालूम वापर करावयाचा, हीच मोदी यांची रणनीती आहे. संसदेतील त्यांच्या भाषणाचे प्रमुख सूत्रही तेच होते. त्यामुळेच काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांना खदखदा हसायला आले! त्यावर मोदी यांनी हजरजबाबी शैलीत ‘रामायण मालिकेनंतर असे हास्य प्रथमच ऐकायला मिळाले!’ असा टोला लगावला; पण त्यामुळे मूळ प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करून, लोकांचे लक्ष भावनिक विषयांकडे वळवण्याच्या त्यांच्या पुरातन शैलीचाच प्रत्यय आला. आपले हे भाषण हे घराघरांतील टीव्हीवरून ‘सव्वासो करोड’ जनता बघत आहे, याचे भान ते कधीही विसरले नाहीत. त्यामुळेच संसदीय व्यासपीठाचा वापर करून, त्यांनी भाजपचा पुढच्या वर्षभरासाठीचा ‘अजेंडा’ सेट केला! आता येते सारे वर्ष आरोप-प्रत्यारोपांच्या खणाखणीत जाणार,अशीच चिन्हे दिसताहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com