खडाखडीनंतर खणखणाट (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

या प्रचारात खरा रंग भरला आहे तो राहुल यांच्यासमवेत आणखी तीन तरुण नेत्यांनी! गुजरातेत जवळपास 18 टक्‍के असलेल्या पाटीदार म्हणजेच पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल, दलित समाजातील युवकांना आत्मभान आणून देणारे जिग्नेश मेवानी आणि "ओबीसी' युवकांच्या गळ्यातील तारणहार अल्पेश ठाकूर यांनी भाजपविरोधात सुरू केलेल्या आंदोलनाचे नेमके काय परिणाम होणार, याचे गूढ निकालानंतरच स्पष्ट होईल.

राहुल गांधी यांच्या सभांना मिळणारा मोठा प्रतिसाद पाहता भाजपला गुजरातेत सर्वशक्‍तिनिशी प्रयत्न करावे लागत आहेत. ही रणधुमाळी येत्या महिनाभरात अधिकच खणाखणी आणि खडाखडीचे दर्शन घडवणार, यात शंका नाही. 

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाल्यामुळे गेले दोन-अडीच महिने तेथे सुरू असलेला राजकीय गरबा आता खऱ्या अर्थाने रंगात आला आहे! आरोप-प्रत्यारोपांच्या टिपऱ्या जोमाने खणखणू लागल्या असून त्यातून जुन्याच वादांचे नाद निघत असले तरी नवे सूरही निनादू लागले आहेत. खरे तर हिमाचल प्रदेश विधानसभेचे मतदान होऊनही गेले; पण तेथील प्रचारमोहिमेकडे फारसे कोणाचे लक्ष गेले नाही. त्याचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांची प्रतिष्ठा तिथे पणाला लागली आहे.

राज्यातील नाराज घटकांना चुचकारत गुजरात या त्यांच्या "होमपीच'वर कॉंग्रेस, विशेषत: राहुल गांधी यांनी आव्हान उभे करण्याच प्रयत्न केला आहे. भाजपविरोधात गुजरातेत निर्माण झालेला असंतोष सोशल मीडिया व अन्य माध्यमांतून गेले काही दिवस सातत्याने व्यक्‍त होत आहे. त्यामुळेच भाजपला गुजरातेत सर्वशक्‍तिनिशी प्रयत्न करावे लागत आहेत. एकीकडे राहुल यांच्या संवादी सभांना मिळणारा प्रतिसाद आणि त्याच वेळी भाजपच्या सर्वशक्‍तिमान नेत्याचे एकपात्री प्रयोग, अशा ही रणधुमाळी येत्या महिनाभरात अधिकच खणाखणी आणि खडाखडीचे दर्शन घडवणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यातच राहुल यांनी या वेळी एकाच वेळी अत्यंत आक्रमक, तर दुसरीकडे कमालीची संयमी अशी आपली प्रतिमा या प्रचारमोहिमेच्या निमित्ताने उभी करण्याचा प्रयत्न केला आहे. "भाजप व मोदी यांच्यावर टीका जरूर करायची आहे; मात्र तसे करताना पंतप्रधानपदाचा अवमान होणार नाही, याची खबरदारीही घ्यायची आहे!' हा राहुल यांनी पक्षकार्यकर्त्यांना दिलेला सल्ला या वेळी कॉंग्रेस प्रचारात प्रतिपक्षाच्या म्हणजेच भाजपच्या कमरेखाली वार करणार नाही, याची ग्वाही आहे. विरोधी पक्षात असताना, भाजप नेते पंतप्रधानपदाचा अवमान आणि टिंगलटवाळी करत होते, हे निदर्शनास आणून देऊन राहुल यांनी आणखी एक वार भाजप व मोदी यांच्यावर केला आहे. त्यामुळे प्रचाराची धार अधिकाधिक तिखट होत जाणार, याचेच हे निदर्शक आहे. अर्थात राहुल गांधींना असा पवित्रा घ्यावा लागला, याचे कारण मोदी यांच्यावर टोकाची विखारी टीका केल्यास त्याचा उलटा लाभ ते घेऊ शकतात, याचा अनुभव यापूर्वी सोनिया गांधींनी घेतला आहे. 

या प्रचारात खरा रंग भरला आहे तो राहुल यांच्यासमवेत आणखी तीन तरुण नेत्यांनी! गुजरातेत जवळपास 18 टक्‍के असलेल्या पाटीदार म्हणजेच पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल, दलित समाजातील युवकांना आत्मभान आणून देणारे जिग्नेश मेवानी आणि "ओबीसी' युवकांच्या गळ्यातील तारणहार अल्पेश ठाकूर यांनी भाजपविरोधात सुरू केलेल्या आंदोलनाचे नेमके काय परिणाम होणार, याचे गूढ निकालानंतरच स्पष्ट होईल. मात्र, राहुलसह मैदानात असलेल्या या त्रिमूर्तीला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे भाजप गोटात धाकधूक सुरू झाल्याचे प्रत्यंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या ताज्या वक्‍तव्यामुळे आले आहे. "चार पोरे' अशी राहुल, हार्दिक, जिग्नेश आणि अल्पेश यांची संभावना करत त्यांनी "ही चार पोरे मैदानात असली, तरी गुजरातची जनता आमच्याबरोबरच आहे,' असे सांगितले. खरे तर संपूर्ण गुजरात यावेळी आपल्या शब्दाप्रमाणे मतदान करेल की नाही, ही शंका भाजप नेत्यांच्या मनात होती आणि त्यास अर्थातच कारण हे गेली 22 वर्षे तेथे असलेली भाजपची राजवट हेच होते. इतक्‍या प्रदीर्घ काळ कोणत्याही पक्षाची राजवट असली की त्याविरोधात जनमत तयार होतेच. त्यामुळेच जपानच्या पंतप्रधानांना अहमदाबादेत आणून "बुलेट ट्रेन'चे स्वप्न गुजरातला दाखवण्यात आले, तेव्हापासूनच मोदी यांच्या प्रचारास सुरवात झाली होती.

मात्र, नोटाबंदी असो की "जीएसटी' असो, याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला, "जीएसटी' परिषदेच्या ताज्या बैठकीत 27 वस्तूंवरील कर कमी करण्याचा निर्णय घेणे त्यामुळेच केंद्र सरकारला भाग पडले आहे. एका अर्थाने आचारसंहिता लागू झाल्यावरही गुजरातच्या निवडणुकीच्या निमित्ताने केलेली ही "खैरात'च आहे. हा निर्णय घेतला गेला, त्यास राहुल यांनी "जीएसटी'च्या आयत्या हाती आलेल्या कोलिताने निर्माण केलेला असंतोषच कारणीभूत होता, हे नाकारून चालणार नाही. 

गुजरातेत गेल्या काही वर्षांत शहरी भाग विरुद्ध ग्रामीण भाग अशी मोठी दरी पडली आहे. गुजरातच्या "विकास मॉडेल'चा डंका भाजपने जोमाने वाजवला आणि 2014च्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवले. प्रत्यक्षात विकास झाला आहे, तो गुजरातच्या शहरी भागाचा. त्यामुळेच राज्यातील सहा महानगरांच्या पालिकांत भाजपला यश मिळत असताना, 23 जिल्हा परिषदा मात्र कॉंग्रेसच्या हाती आल्या. राहुल यांनी कितीही जोर लावला तरी त्याचा लाभ घेणारे संघटन आणि नेतृत्वासाठी चेहरा कॉंग्रेसकडे नाही तर भाजपचे गुजरातेत भरभक्कम संघटन आहे. पाटीदारांच्या नाराजीची चर्चा मागच्या निवडणुकीतही होतीच; त्यामुळे आता किती फरक पडेल हे निकालातच समजेल. मनिलातील परिषदेनंतर परतल्यानंतर मोदी जातीने प्रचारात उतरतील. त्यांचा करिष्मा कितपत फरक पाडेल ते तेव्हा स्पष्ट होईलच. एकूणातच हा राजकीय गरबा आता अधिकाधिक रंगत जाणार आहे. 

Web Title: editorial Rahul Gandhi in Gujrat