पावसाळी विनोद! (अग्रलेख)

rain in mumbai
rain in mumbai

प्रत्येक पावसात होणारी ससेहोलपट आता मुंबईकरांना नवी नाही. आपला वाली कोणीही नाही, हे एव्हाना त्यांना कळून चुकले आहे. शाळांना सुटी देण्यासारख्या निर्णयातही पुरेशा गांभीर्याचा अभाव असणे हे या अनास्थेचेच ताजे उदाहरण.

मुंबईत पाऊस असला तरी शाळा-महाविद्यालयांनी सुटी घेण्याचे कारण नाही, अशी मास्तरकी खुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडेसरांनी मंगळवारी सकाळी केली, तेव्हाच वास्तविक मुंबईतल्या बऱ्याचशा शाळा ओस पडल्या होत्या. मुंबईत नेमेचि उगम पावणाऱ्या हिंदमाता, सायन, कुर्ला, माहीम, मिलन सबवे या पावसाळी ‘नद्यां’ना उधाण आले होते. गुडघा-गुडघा पाण्यातून चिंब भिजलेल्या मुंबईकरांना नाक्‍या-नाक्‍यांवरचे पोलिसदादा रस्त्याच्या या ‘तीरा’वरून ‘त्या’ तीरावर सुरक्षितस्थळी पोचवत होते. जागोजाग वाहतूक तुंबून मुंबई जवळजवळ ठप्प झालेली होती. मुंबईची धमनी म्हटली जाणारी उपनगरी रेल्वे लोहमार्गावर साचलेले पाणी कापत कशीबशी आपली गंतव्यस्थाने गाठत होती. पण ते तेवढेच. पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूर येथे मुक्‍कामी असलेल्या शिक्षणमंत्र्यांच्या मते मुंबईतली ही परिस्थिती आटोक्‍यातली होती आणि सुटी घेण्याचे तर काहीच कारण नव्हते. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली ‘माहिती’ जाहीर केली, तेव्हा मुंबईकरांना त्याही परिस्थितीत हसावे की रडावे हे कळेनासे झाले. ‘विरोधकांनी आम्हाला मुंबईची काळजी कशी घ्यायची हे शिकवण्याचे कारण नाही’ असा एक भिजका टोमणाही त्यांनी मारला. दुर्दैवाने मास्तरांचा निकाल हेडमास्तरांनी फिरवावा आणि पटावरल्या विद्यार्थ्यांनी फिदीफिदी हसावे, अशी वेळ तासाभरातच आली. खुद्द मुख्यमंत्र्यांनाच सभागृहात निवेदन करून, ‘मुंबईतली परिस्थिती पावसामुळे बिकट झाली असून किमान अकरा ठिकाणी पाणी तुंबल्याचे प्रकार घडले आहेत, परिस्थितीचा आढावा घेऊन शिक्षणमंत्र्यांनी तातडीने सुटी जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा,’ असा आदेश द्यावा लागला. एरवी मुंबईकर तावडेमास्तरांचे ‘स्टाफ रुम’मधले मित्र मानले जाणारे आशिष शेलारसरांनीही विद्यार्थ्यांची सुरक्षितता पाहून मगच काय तो निर्णय घ्यावा, असे सुचवले. अखेर तासाभरापूर्वी मुंबईत आलबेल असल्याचे सांगणाऱ्या शिक्षणमंत्र्यांनी स्थानिक मुख्याध्यापकांवरच सुटीचा निर्णय सोपवून हात झटकले.

विद्यमान सरकारातील विविध विभागांमधल्या समन्वयाच्या अभावाने निर्माण झालेला एक पावसाळी विनोद म्हणून एरवी हा प्रकार सोडून देता आला असता. पण परिस्थिती तशी नाही. बेजबाबदारपणाचे हे एक ठळक उदाहरण मानावे लागेल. नागपुरात विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पावसाने जी काही दैना उडाली, त्यानेदेखील नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे दाखवून दिले होते. सुदैवाने दुसऱ्या दिवसापासून सभागृहाचे कामकाज सुरू होऊ शकले; पण मुंबईतील परिस्थितीवर मात्र रोजच्या रोज लक्ष ठेवावे लागणार हे उघड होते. एकतर प्रत्येक पावसात एकदा तरी जनजीवन पूर्ण विस्कळित होतेच. हा पूर्वानुभव सरकारी यंत्रणांनी लक्षात घ्यायचा नाहीतर कोणी? गेले दोन दिवस मुंबईत तुफान वृष्टी चालू आहे आणि त्याची माध्यमांमधूनही भरपूर चर्चा चालू आहे. अतिवृष्टीमुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीखातर शिक्षणमंत्र्यांनी आदल्या दिवशी सुटी जाहीर करण्याची मेहेरबानी मुंबईकरांवर केली होती. पावसाची संततधार चालूच असल्याने परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्‍यताही नव्हती. उलट पालघर, ठाणे, नवी मुंबई आदी मुंबईलगतच्या भागातील रस्तेही पाण्याखाली गेले होते. पालघरमध्ये तर पूरपरिस्थिती निर्माण होऊन आपत्कालीन व्यवस्थेला कार्यरत करण्याची पाळी आली. ‘सुटी घेण्याचे कारण नाही’, असे शिक्षणमंत्री नागपूरमध्ये बसून सांगत असतानाच इकडे मुंबईत पूर्व आणि पश्‍चिमेचे दोन्ही महामार्ग अभूतपूर्व वाहतूक खोळंब्यामुळे बंद पडले होते. शाळा सुरू ठेवाव्यात की नाही, या संभ्रमात शाळांचे चालक गोंधळून एकमेकांना संदेशांची देवाणघेवाण करत होते. ओलीचिंब शाळकरी मुले आणि त्यांचे पालक ‘आता काय करायचे?’ या यक्षप्रश्‍नाशी झुंजत होते. मुंबईतले जनजीवन विस्कळित झालेले असतानाच, मुंबईलगतच्या परिसरात तर हाहाकाराची परिस्थिती होती. राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन दलाच्या जवानांनी आणि नौदलाने रबरी होड्या, दोर आदी साधनांनिशी पालघरकडे कूच केले होते. एकंदरीतच अशा परिस्थितीत योग्य व वेगाने निर्णय घेणे आवश्‍यक असते.

हवामान खात्याने गुरुवारपर्यंत अतिवृष्टीचा मारा मुंबईकरांना झेलावा लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. हंगामाच्या सरासरीपैकी ५४ टक्‍के पाऊस गेल्या वीस दिवसांतच बरसल्याची आकडेवारी हाती आली आहे. अशा अवस्थेत राज्य सरकार, महापालिका, महानगर प्राधिकरण या सगळ्यांचे उत्तम नियोजन आणि समन्वयच कामास येईल. ज्या गोष्टी मानवी प्रयत्नांच्याही बाहेर आहेत, त्यांचा प्रश्‍न नाही; परंतु शक्‍य असलेल्या गोष्टीही घडत नाहीत, तेव्हा प्रश्‍न निर्माण होतो. मुंबईकर सहनशील असल्याने तो यावेळचा प्रकारही एक ‘पावसाळी विनोद’ म्हणूनच पाहील आणि सोडून देईल. याचे कारण काहीही झाले तरी आपला वाली कोणीही नाही, हे एव्हाना त्याला कळून चुकले आहे. शिक्षणमंत्र्यांनी त्याच जाणीवेचा चरा आणखी खोल केला, इतकेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com