भाजपचे रामायण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

"संघर्षयात्रे'तून सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्र्यांनी "संवादयात्रे'ची टूम काढली आहे. मात्र, हा संवाद कशा प्रकारचा असेल, हा प्रश्‍नच आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भरभरून मिळालेल्या यशाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता जनता पक्षाच्या महाराष्ट्र कार्यकारिणीच्या बैठकीत फटाक्‍यांची जोरदार आतषबाजी झाली, यात नवल काहीच नव्हते! फक्‍त हे फटाके शाब्दिक होते आणि ते फोडण्यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापासून कोणीच मागे राहिले नाही. या बैठकीबाबत मोठे कुतूहल होते ते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचे आणि त्या पार्श्‍वभूमीवर नवे "गीतरामायण' लिहीत गडकरी यांनी पहिला फटाका फोडला! "भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मग तो भले वाल्या असो, त्याचा तत्काळ वाल्मीकी होतो,' असे सांगत गडकरी यांनी सध्या भाजपने उघडलेल्या "मुक्‍तद्वारा'चे समर्थनच केले. मात्र, दानवे यांनी किश्‍श्‍यांची आतषबाजी करत या "मुक्‍तद्वारा'वरच हल्ला चढवला! "आता भाजपमध्ये बाहेरून इतके लोक येऊ पाहत आहेत की आपल्यावरच रांगेत उभे राहण्याची वेळ तर येणार नाही ना?' असा प्रतिसवाल करताना दानवेंनी कार्यकर्त्यांच्या मनातील भावना व्यक्‍त केल्या. मात्र, त्यामुळे कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला असणे कठीण आहे; कारण दानवे हे प्रदेशाध्यक्ष असले तरी सध्या निर्णयप्रक्रिया फडणवीस यांच्याच हातात आहे, हे त्यांनी केलेल्या "संवाद यात्रे'च्या घोषणेमुळे स्पष्ट झाले. खरे तर पक्षाच्या बैठकीवर छाप असायला हवी ती अध्यक्षांची; पण येथे कार्यकर्त्यांना नवा कार्यक्रम देऊन फडणवीसच बाजी मारून गेले.

या बैठकीला आणखी एक पार्श्‍वभूमी होती ती शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आणि कर्जमाफीच्या मागणीची. त्याशिवाय सध्या राज्यात तूरडाळीची खिचडी विरोधकांनी जोमाने शिजायला घातली आहे आणि त्यासाठी कॉंग्रेस, "राष्ट्रवादी'ने काढलेल्या "संघर्षयात्रे'तून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यास प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्र्यांनी "संवादयात्रे'ची टूम काढली आहे. मात्र, हा संवाद कशा प्रकारचा असेल, हा प्रश्‍नच आहे; कारण गेले काही दिवस भाजपचे टीव्हीवरील प्रवक्‍ते "पूर्वीच्या आघाडी म्हणजेच कॉंग्रेस-"राष्ट्रवादी' सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केले?' असा प्रश्‍न विचारत आहेत. पूर्वीच्या सरकारने काहीच केलेले नाही, हे एक वेळ मान्य केले तर मग आजवर महाराष्ट्राची जी काही प्रगती झाली, ती कोणामुळे या प्रश्‍नाचे उत्तर त्यांना द्यावे लागणार आहे. जनतेशी सरकार संवाद साधणार, तो एकतर्फी नसेल अशी आशा आहे. केंद्रात मोदी सरकारला पुढच्या महिन्यात तीन वर्षे पूर्ण होत आहेत, तर फडणवीस सरकारचा अर्धा-अधिक कालावधी पूर्वीच्या सरकारच्या निष्क्रियतेकडे बोट दाखवण्यात खर्ची पडला आहे. या काळात भाजपने काय केले, असा प्रश्‍न या यात्रेत विचारला जाऊ शकतो आणि त्यामुळे मंत्री, खासदार-आमदार यांची पंचाईत होऊ शकते, हे फडणवीस यांच्या लक्षात आले असेलच. मात्र, या व अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे देण्याचे त्यांनी टाळले. त्यातही त्यांनी "कोडगे' आणि "निर्लज्ज' अशी भाषाही पूर्वीच्या सरकारबद्दल केली आहे. त्यामुळे या "संवादयात्रे'तून काय साधले जाणार, ते एक अयोध्येचा रामच जाणे!

अर्थात, फडणवीसांनी "आता जनता हाच रामावतार आहे', असेही या बैठकीत सांगितले आणि भाजपची भूमिका ही भरताप्रमाणे राज्य करण्याची आहे, असेही सांगून टाकले. जनता इतके दिवस भाजप "रामराज्य' आणणार अशा कल्पनेत सुशेगाद "अच्छे दिन'ची गाजरे खात होती. आता त्यांच्या वाट्याला "भरतराज्य' येऊ घातले आहे. फडणवीस यांच्या संकल्पनेतील या "भरतराज्या'चा उद्देश अगदीच वेगळा आहे. त्यांनी आपल्या भाषणात "रामचरितमानस'चा आधार घेतला आणि "भरतराज्य' हेच कसे आदर्श कारभार करत होते, ते सांगितले. भरताने 14 वर्षे राज्य केले ते "विश्‍वस्त' या नात्याने! फडणवीसही असेच विश्‍वस्त होऊन जनतेचे सेवक म्हणून राज्य करणार आहेत! अर्थात, ते "रामराज्य' आणतात की "भरतराज्य' याच्याशी जनतेला देणेघेणे नाही. जनतेपुढील दैनंदिन प्रश्‍न महत्त्वाचे आहेत. आता त्यावर किती लक्ष केंद्रित केले जाते, हे सर्वसामान्यांच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे आहे.

Web Title: editorial regarding BJP