उचलली जीभ...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

मराठी साहित्य संमेलन आणि वादंग यांचे नाते घनिष्ठ आहे. मात्र, पूर्वीचे संस्थान असलेल्या बडोद्यातील संमेलन त्याला अपवाद असेल असे वाटत असतानाच संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनीच राजसत्तेला चार खडे बोल सुनावल्याने तो अंदाज चुकला. साहित्यिक असोत वा कलाकार; त्यांना अभिव्यक्तीसाठी मोकळे वातावरण हवे. तसे ते राहात नसल्याची टीका करून लक्ष्मीकांत देशमुख यांनी स्पष्टपणे ‘राजा तू चुकतो आहेस,’ असे बजावले. भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या तत्त्वालाच हरताळ फासला जाता कामा नये, हा त्यांचा मुद्दा महत्त्वाचा होता.

मराठी साहित्य संमेलन आणि वादंग यांचे नाते घनिष्ठ आहे. मात्र, पूर्वीचे संस्थान असलेल्या बडोद्यातील संमेलन त्याला अपवाद असेल असे वाटत असतानाच संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनीच राजसत्तेला चार खडे बोल सुनावल्याने तो अंदाज चुकला. साहित्यिक असोत वा कलाकार; त्यांना अभिव्यक्तीसाठी मोकळे वातावरण हवे. तसे ते राहात नसल्याची टीका करून लक्ष्मीकांत देशमुख यांनी स्पष्टपणे ‘राजा तू चुकतो आहेस,’ असे बजावले. भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या तत्त्वालाच हरताळ फासला जाता कामा नये, हा त्यांचा मुद्दा महत्त्वाचा होता. असे काही अंगावर यायला लागले, की सरावलेले राजकारणी अशावेळी अनुल्लेख, उपेक्षा अशी ‘अस्त्रे’ उपयोगात आणतात किंवा विषयाला बगल देण्याचे खास कौशल्य तरी वापरतात; पण भारतीय जनता पक्षाच्या युवा आघाडीच्या नेत्या आणि खासदार पूनम महाजन यांना मात्र अगदी राहावले नाही, असे दिसते आणि त्यामुळेच ‘असल्या भानगडींत तुम्ही कशाला पडता?’ असा अगदी सरळसोट प्रश्‍न संमेलनाध्यक्षांना विचारून त्या मोकळ्या झाल्या. साहित्यिकांनी साहित्य लिहावे, त्याचे उत्सव साजरे करावेत, एकमेकांच्या साहित्य-काव्य गुणांची प्रशंसा करीत आनंद लुटावा; उगीच स्वतःला आणि इतरांना त्रास देण्याचे कारण काय, असा त्यांचा एकंदर युक्तिवाद असल्याचे दिसते. साहित्य आणि राजकारण या दोन्ही गोष्टींविषयी समान अज्ञान असल्याचा हा परिपाक. त्यात भर पडली ती सत्ताधारी असल्याचा अहंकाराची. वास्तविक सभोवतालाविषयी कमालीची संवेदनशीलता हाच तर साहित्यिकाचा गुणधर्म. त्यामुळे समाजावर परिणाम करणाऱ्या प्रत्येक गोष्टीविषयी त्याला आस्था असणारच. राजकारण म्हणजेदेखील केवळ पक्षीय राजकारण नव्हे. समाजजीवनाच्या सर्व अंगांना ते व्यापून उरते. आता काही राजकारणी साहित्य-संस्कृतीशी फटकून वागतात आणि त्याचे वारेही लागू नये, म्हणून प्रयत्नशील असतात, ही गोष्ट वेगळी. युवा भाजपच्या नेत्या आणि खासदार असलेल्या पूनमताई बहुधा त्यातल्या नसाव्यात; परंतु त्यांच्या वक्तव्यांमुळे तशी शंका निर्माण होते, हे नमूद करणे भाग आहे.

Web Title: editorial sahitya sammelan poonam mahajan