‘काळा’चा भाष्यकार (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

स्टीफन हॉकिंग यांचे हे वाक्‍य त्यांच्या कारकिर्दीचे सार म्हणता येईल. त्यांचे संशोधन तर महत्त्वाचे आहेच; पण एखाद्या महाकाव्याचा विषय व्हावा, अशा रीतीचे जीवन ते जगले. त्यामुळेच त्यांच्या निधनाने विज्ञानाच्या नभांगणातील एक तारा निखळल्याची भावना व्यक्त झाली. खरे तर त्यांच्या जाण्याने आपण खूप काही गमावले आहे.

स्टीफन हॉकिंग यांचे हे वाक्‍य त्यांच्या कारकिर्दीचे सार म्हणता येईल. त्यांचे संशोधन तर महत्त्वाचे आहेच; पण एखाद्या महाकाव्याचा विषय व्हावा, अशा रीतीचे जीवन ते जगले. त्यामुळेच त्यांच्या निधनाने विज्ञानाच्या नभांगणातील एक तारा निखळल्याची भावना व्यक्त झाली. खरे तर त्यांच्या जाण्याने आपण खूप काही गमावले आहे.

आधुनिक काळातील जगण्याच्या साऱ्या गुंतागुंती, विसंगती नि आव्हाने यांच्यामुळे संभ्रमात पडणाऱ्या माणसांना उभारी देण्याचे सामर्थ्य असलेला ‘स्टीफन हॉकिंग’ नावाचा प्रकाश लोपला आहे; एवढ्या-तेवढ्या कारणांनी हताशा व्यक्त करणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालू शकणारा कर्मयोगी आपण गमावला आहे आणि नवनव्या प्रश्‍नांच्या उत्तरांसाठी भूतकाळात आधार शोधू पाहणाऱ्यांना ताळ्यावर ठेवू शकणारा विज्ञानोपासक अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेला आहे. वैज्ञानिक कार्यामुळेच नव्हे, तर त्यांच्या जीवनदृष्टीमुळे हॉकिंग मानवजातीच्या भावविश्‍वाचा भाग बनून गेले. असे भाग्य फार थोड्या शास्त्रज्ञांच्या वाट्याला येते. ते गेले असले तरी ती त्यांची ही दृष्टी या पुढेही प्रकाश देत राहील, यात शंका नाही. विश्‍वरचनाशास्त्र हा हॉकिंग यांच्या अभ्यासाचा विषय. रॉजर पेनरोज यांच्या सहकार्याने त्यांनी आइनस्टाइन यांचा सापेक्षता सिद्धान्त आणि पूंजयांत्रिकी (क्वांटम मेकॅनिक्‍स) यांचा मेळ घातला. अवकाश आणि काळ यांची सुरवात महास्फोटातून झाली आणि याचा शेवट कृष्णविवरांमध्ये होईल, हा सिद्धान्त त्याआधारे त्यांनी मांडला. कृष्णविवरांमधून ऊर्जा बाहेर पडते, हेदेखील हॉकिंग यांनी दाखवून दिले. लघुकृष्णविवरांविषयीचे त्यांचे संशोधन महत्त्वाचे आहे. रूढ मतांपेक्षा एकदम वेगळा विचार करण्याची क्षमता हे त्यांचे वैशिष्ट्य कायमच दिसून आले. त्यामुळे अनेक वादही त्यांनी ओढवून घेतले. वास्तविक शाळेत असताना बुद्धिमान म्हणून ते फारसे चमकले नव्हते. मात्र काळ आणि अवकाश यांविषयी त्यांना लहानपणापासून प्रचंड कुतूहल होते. या विषयाचा अक्षरशः ध्यास त्यांनी घेतला; परंतु अवघ्या एकविसाव्या वर्षी त्यांना ‘मोटर न्यूरॉन डिसीज’ हा असाध्य विकार झाला. या व्याधीमुळे शरीराचे सर्व स्नायू दुर्बल झाले. जेमतेम दोन वर्षेच ते जगतील, असे त्या वेळी सांगितले गेले. या असाध्य विकाराचे निदान झाल्यानंतर एखादी व्यक्ती कोलमडून गेली असती; पण त्यांची जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि ज्ञानाची लालसा यांच्या जोरावर पुढे ५५ वर्षे ते अर्थपूर्ण आयुष्य जगले. विश्‍वाच्या उत्पत्तीचाच वेध घेण्याची जिद्द बाळगणारा त्यांचा मेंदू; पण त्या मेंदूची त्यांच्या शरीरावर सत्ता चालत नव्हती. अवघ्या एका बोटापुरती ती उरली होती. पण तरीही या सगळ्या उणिवांवर मात केली ती त्यांच्या मन-सामर्थ्याने आणि विज्ञान-तंत्रज्ञान नि औषधनिर्माण शास्त्र यांतील प्रगतीने. ‘मला कितीही शारीरिक अडचणी असल्या तरी माझे मन मुक्त आहे’ हा त्यांचा उद्‌गार मानवजातीसाठीचा अखंड प्रेरणास्रोतच आहे. विश्‍व उत्पत्तिशास्त्र व गुरुत्वाकर्षण या दोन्ही विषयांमध्ये प्रचंड अभ्यास करून या विषयातील संशोधनात त्यांनी भर घातली, ती जेवढी महत्त्वाची आहे, तेवढीच संशोधनातून, चिंतनातून तयार झालेली त्यांची जीवनदृष्टी. किंबहुना त्यामुळेही विज्ञान संशोधनाच्या क्षितिजावर हा तारा सतत तळपत राहिला. गेल्या दोन शतकांत विज्ञानाची जी अफाट प्रगती झाली, तिने माणसाचे आयुष्य आरपार बदलून टाकले. हा बदल पचविणे ही साधी गोष्ट नव्हती. सूर्य पृथ्वीभोवती नव्हे, तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे लखलखीत सत्य कोपर्निकसने विज्ञानाच्या साह्याने जगासमोर आणले, तेव्हा जमिनीखालचा आधारच कोणीतरी काढून घेतल्यासारखी अनेकांची अवस्था झाली. विश्‍वाच्या अनंत पसाऱ्याची कल्पना आल्याने त्याच्या कोपऱ्यात कुठे तरी ठिपक्‍यासारखे आपले स्थान आहे; आपण केंद्रस्थानी नाही, हे कळून चुकले. खगोलशास्त्राची निरंतर प्रगती होत गेली. आइन्स्टाइनने सापेक्षतेचा सिद्धान्त मांडून तर काळ आणि अवकाश याविषयीच्या आधीच्या बहुतेक सर्व कल्पना, धारणा मोडीत काढल्या. पण विश्‍वाच्या कोपऱ्यातील या इवलेसेपणाने माणसाने नाउमेद व्हायला नको, याचे कारण या विश्‍वाचा ‘ज्ञाता’ होण्याचे भाग्य आपल्याला मिळाले आहे. ‘आपण कोठून आलो’, ‘विश्‍वाची निर्मिती महास्फोटातून झाली, की अनादि-अनंत असे हे अस्तित्व आहे’, असे अनेक प्रश्‍न पडणे आणि त्यांची उत्तरे शोधणे हे माणसाचे विलोभनीय असे वैशिष्ट्य आहे, हे सत्य हॉकिंग यांनी अधोरेखित केले. त्यांनी म्हटले आहे, की विश्‍व अपरंपार असले तरी ते आपण जाणू पाहतो, ही केवढी मोठी गोष्ट आहे! केवळ संशोधनपर लिखाणावर समाधान न मानता सर्वसामान्यांना रुची वाटेल, अशा रीतीने विश्‍वोत्पत्ती शास्त्रासारख्या गहन विषयासंबंधी त्यांनी लिहिले. ‘अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम’ या पुस्तकाची एक कोटीची विक्री हा एक विक्रमच होता. इतरही अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. स्वरयंत्र निकामी झाल्याने वाचा गमावलेला हा शास्त्रज्ञ संवादकौशल्यात एवढी मोठी भरारी घेतो, याइतकी दुसरी विलक्षण गोष्ट काय असेल? अर्थात त्यांची जिद्द, प्रबळ प्रेरणा आणि सकारात्मक वृत्ती याचा अर्थ असा नव्हे, की आधुनिक जगातील अक्राळविक्राळ प्रश्‍नांची त्यांना जाणीव नव्हती. किंबहुना त्यांकडे सतत जगाचे लक्ष वेधणारे हॉकिंग हेच होते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाच्या धोक्‍यांपासून ते जागतिक तापमानवाढीसारख्या समस्यांपर्यंत अनेक धोक्‍यांची घंटा वाजवितानाही त्यामागे कधीच निराशावाद नव्हता. अशा समस्या समोर ठाकल्या की कुठल्या धर्मश्रद्धांकडे, जुन्या धारणांकडे वळण्याची प्रवृत्ती होते. पण हॉकिंग यांची दृष्टी भविष्यवेधीच राहिली. माणसाने राहण्यासाठी या विश्‍वात वेगळी जागा शोधावी, अशी उत्तुंग कल्पना ते मांडत होते. ती कितपत व्यावहारिक, वास्तववादी आहे, याची चर्चा विज्ञानाच्या वर्तुळात होत राहील; परंतु त्यातून प्रकटणारा माणसाच्या आत्मविश्‍वासाचा हुंकार कायमच प्रेरणा देत राहील.

Web Title: editorial stephen hawking