अग्रलेख : मूळ स्वभाव जाईना

अग्रलेख : मूळ स्वभाव जाईना

बालाकोटमध्ये पुन्हा दहशतवाद्यांची जमवाजमव करण्याचा प्रयत्न पाकिस्तानची खोड जिरलेली नाही, हे दाखविणारा आहे. ना तो देश काही धडा घेण्याच्या मनःस्थितीत आहे, ना अमेरिकाही त्याविषयी निःसंदिग्ध भूमिका घेण्यास तयार आहे.

भारताने अलीकडच्या काळात सातत्याने दहशतवादाच्या प्रश्‍नाकडे जागतिक समुदायाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असून, ह्युस्टन येथे रविवारी केलेल्या भाषणातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संकटाचा मुकाबला एकजुटीने करण्याच्या आवश्‍यकतेवरच भर दिला. नाव न घेता त्यांनी यासंदर्भात पाकिस्तानच्या धोरणावर घणाघाती टीका केली. पण, अशा टीकेचा आणि चर्चांचा त्या देशावर फारसा परिणाम होताना दिसत नाही. सध्या अमेरिकेत असलेले त्या देशाचे पंतप्रधान इम्रान खान भोळेपणाचा मुखवटा पांघरून  ‘कुठे काय?’ असा पवित्रा घेत आहेत. अमेरिकेत ते देत असलेल्या मुलाखती म्हणजे सारवासारव आणि रंगसफेतीचा उत्तम नमुना म्हणावा लागेल. काश्‍मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून टाकण्याचा भारताचा निर्णय हा देशांतर्गत प्रश्‍न असला, तरी त्या निर्णयाविषयी गहजब माजविण्याचा प्रयत्न पाकिस्तान करीत आहे. हा त्या देशाच्या धोरणाचाच एक भाग आहे. इम्रान खान यांनी तो प्रयत्न केलाच; शिवाय काश्‍मिरींच्या मानवी हक्कांविषयीही त्यांनी गळा काढला असून, भारतात हिंदू राष्ट्रवाद वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ज्या देशात लोकशाहीचा केवळ सांगाडा अस्तित्वात आहे; अशा देशाने भारताला मानवाधिकारांचा उपदेश करावा, याला काय म्हणायचे? त्यांचा हा आविर्भाव किती खोटा आणि बिनबुडाचा आहे, हे वेगळे सांगायला नको. भारताच्या लष्करप्रमुखांनी सोमवारी केलेले निवेदन यासंदर्भात पुरेसे स्पष्ट आहे. बालाकोट येथे पाकिस्तान चालवीत असलेला दहशतवाद्यांचा प्रशिक्षण तळ भारताने कारवाई करून उद्‌ध्वस्त केला होता. परंतु, असा दणका बसूनही पाकिस्तानने त्यापासून काही धडा घेण्याचे तर सोडाच; परंतु तेथे पुन्हा दहशतवाद्यांची जमवाजमव केली असून, पाचशे दहशतवाद्यांना काश्‍मिरात घुसविण्याच्या तयारीत तो देश आहे, असे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी चेन्नईत सांगितले. भारतापुढील सुरक्षाविषयक आणि राजनैतिक आव्हानाची कल्पना यावरून येते. 

अमेरिकेच्या ह्युस्टन महानगरात पन्नास हजारांहून अधिक जनसमुदायाच्या उपस्थितीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व मोदी यांनी परस्परांना आलिंगन देऊन काही तास उलटायच्या आतच इम्रान खान यांच्याशी बोलताना ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थीस तयार असल्याचे विधान केले आहे. जुलैत असेच विधान करून त्यांनी मोदींना अडचणीत आणले होते. ‘मोदींनीच मला मध्यस्थीची विनंती केली होती,’ असेही त्यांनी जाहीरपणे सांगून खळबळ उडवून दिली होती. भारताने तीव्र आक्षेप घेतल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने खुलासा केला होता. परंतु, आता पुन्हा तसेच विधान करून भारताला वाटणाऱ्या काळजीची आपण किती पत्रास ठेवतो, हे ट्रम्प यांनी दाखवून दिले आहे. दोन्ही देशांना आपल्या तालावर झुलवत ठेवण्याचा प्रयत्न करीत राहण्याची अमेरिकी कुटिल नीती आजची नाही. आधीचे सगळे रीतिरिवाज मोडून काढण्याचा अभिनिवेश ट्रम्प दाखवत असले, तरी तेही पूर्वापार चालत आलेल्या धोरणाची री ओढत आहेत. भाषा आणि अभिव्यक्ती निराळी आहे, एवढेच. अफगाणिस्तानातून काढता पाय घेण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची गरज भासणार असून, इम्रान खान यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत त्यामुळेच ट्रम्प यांनी आपण पाकिस्तानला कसे महत्त्व देतो, हे आवर्जून सांगितले. ‘मोदी यांनी आपल्याबरोबरच्या चर्चेत बरीच आक्रमक विधाने केली,’ याचाही उल्लेख ट्रम्प यांनी केला, तो यामुळेच. हे पाहता भारताला आपली लढाई स्वतःच लढावी लागणार आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट होते. एकीकडे सुरक्षेसाठी कमालीची सावधानता बाळगतानाच काश्‍मीरमधील परिस्थिती लवकरात लवकर सुरळीत करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे. तेथे अस्थिरता माजविण्याचा प्रयत्न पाकिस्तान करणार, हे उघड आहे. 

इम्रान खान यांनी शांतता आणि सद्‌भावाच्या कितीही गप्पा मारल्या, तरी त्यांच्या सगळ्या नाड्या लष्कराच्या ताब्यात आहेत आणि लष्कर ठरवेल तेच घडते, असा पाकिस्तानचा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे एकीकडे दहशतवादाचा खंबीरपणे मुकाबला करतानाच काश्‍मीरमधील जनजीवन पूर्ववत करणे, तेथील सर्वसामान्य नागरिकांचा विश्‍वास संपादन करणे आणि लोकशाही राजकीय प्रक्रियेसाठी मोकळे वातावरण निर्माण करून देणे, या गोष्टींना मोदी सरकारने प्राधान्य देण्याची गरज आहे. बालाकोटमधील दहशतवादी तळ भारताने उद्‌ध्वस्त केला, हे खरे. परंतु, अशा एखाद्या कारवाईने दहशतवादाला आळा बसत नसतो. मुळात हे दहशतवादी गट फिरते असतात. दुसरे म्हणजे तरुणांचे ‘ब्रेन वॉशिंग’ करून त्यांना हातात शस्त्रे घ्यायला प्रवृत्त करायचे आणि त्यासाठी धार्मिक भावना चेतवायच्या, हे प्रकार थांबलेले नसल्याने दहशतवादाचे संकट एखाद्या धडक कारवाईने दूर होणार नाही. बालाकोटमध्ये दहशतवाद्यांची पुन्हा जमवाजमव सुरू असल्याच्या बातमीचे त्यामुळेच आश्‍चर्य वाटत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com