व्यक्त-अव्यक्त

व्यक्त-अव्यक्त

व्यक्त होणे ही प्रत्येकाची गरज असते, म्हणून तर झाड मातीतून, फुले सुगंधातून, बळिराजा पेरणीतून, पाथरवट मूर्तीतून, गाय हंबरण्यातून, माय गोंजारण्यातून, कष्टकरी घामातून, सावकार दामातून, विद्यार्थी पाटीतून, तर शिक्षक पोटातून व्यक्त होत असतो. एखाद्या गायकाची रसिकांना समृद्ध करणारी सुरेल मैफल असो, वा त्याने सहज गाडी चालवताना घेतलेली सुरेल ताण असो, एखाद्या चित्रकाराने दर्दी प्रेक्षकांच्या समक्ष चितारलेले अप्रतिम स्केच असो, वा घरात कॅनव्हासवर सहज मारलेली रेषा असो, एखाद्या फलंदाजाने हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने साकारलेले दिमाखदार शतक असेल किंवा सराव करताना मारलेला एखादा लाजबाब फटका असेल... दोन्हींचा ‘आनंद निर्देशांक’ त्या कलाकाराच्या दृष्टीने सारखाच असतो!  
ताजमहाल, अजिंठा-वेरूळची शिल्पे हजारो वर्षांपूर्वी ज्या अज्ञात कारागिरांनी कोरली असतील त्यांची नावे जगाला ठाऊक नाहीत, पण त्यांच्या अभिव्यक्तीची जगाने नोंद घेतली. प्रत्येक अभिव्यक्तीला प्रसिद्धीची आणि समाजमान्यतेची बेगडी चौकट हवीच काय? जीवनातील दुःख, वेदना विसरण्यासाठी, कष्ट करताना मनाला विरंगुळा म्हणून बहिणाबाईंनी केलेल्या रचना साहित्य अकादमी मिळवण्यासाठी होत्या काय? लोकसाहित्याचा ठेवा असलेले संतांचे अभंग, ओव्या कॉपी राइटसाठी होत्या काय? टिळकांचे जहाल अग्रलेख मानधनासाठी होते काय? त्या त्या प्रसंगाची ती अनिवार्य अभिव्यक्ती होती. खरी अभिव्यक्ती नेहमीच निरपेक्ष असते; कारण ती त्या व्यक्तीची त्या क्षणाची निकड असते. त्या अभिव्यक्तीला नंतर समाज आपल्या गरजेनुसार, आवश्‍यकतेनुसार, कुवतीनुसार आणि कधी स्वार्थानुसार वेगवेगळ्या मोजपट्ट्या लावत असतो.

प्रत्येकाने अभिव्यक्त व्हावेच, म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी! एका वंचित समाजातील गरिबीचा ‘वारसा’ लाभलेल्या, पण शिकण्याची आस असलेल्या विद्यार्थ्याला साने गुरुजींच्या परंपरेतील शिक्षक लाभला. त्या शिक्षकाने वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यात आपल्या लेकराचा चेहरा पाहिलेला असल्याने त्या गरीब मुलाला त्याने सर्वतोपरी मदत करून शाळेत टिकवले. मुलाला त्या शिक्षकासाठी काहीतरी करावे, असे मनोमन वाटायचे. हो... विद्यार्थ्यांइतके कृतज्ञ कुणी नसते! पण बिचारा परिस्थितीपुढे हतबल असल्याने काही करू शकत नव्हता. अखेर त्याला हवी ती संधी मिळाली. त्याच्या बहिणीचे लग्न ठरले. गरिबाघरचे लग्न, पण खर्च थोडाच टळणार? घरातील शिकलेला तो एकटाच असल्याने पत्रिकेचा मजकूर त्याला लिहायला सांगितले. ज्या सोयऱ्यांनी कायम त्यांच्या गरिबीची टवाळी करत त्यांना हीन लेखले, त्यांची नावे पत्रिकेत लिहिताना त्याला आपल्याला आणि कुटुंबाला मदत करणारे शिक्षक आठवत होते. पत्रिकेत प्रेषक म्हणून त्याने चक्क आपल्या आवडत्या शिक्षकांचे नाव छापले. देवानंतर पहिली पत्रिका त्याने त्या शिक्षकांना दिली आणि डोळ्यांतले पाणी लपवत तो म्हणाला, ‘‘सर, गरिबाच्या लग्नाला या बरं.’’ त्या कोमल आणि सच्च्या मनाच्या विद्यार्थ्याची ती सुंदर अभिव्यक्ती पाहून तो भारावलेला शिक्षक मनाशी म्हणाला, ‘हा माझा खरा पुरस्कार!’ एका शिक्षकाचा याहून मोठा सन्मान कोणता असू शकतो? मित्रहो, पटतंय ना?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com