मन का विश्वास कमजोर हो ना...

मन का विश्वास कमजोर हो ना...

एका गावातील आठवडे बाजार. आसपासच्या खेड्या-पाड्यांतून शेतकरी ताजा भाजीपाला बैलगाडीतून, वाहनांतून आणताहेत. हळूहळू बाजार भरतो. ‘घ्या ताजी भाजी, मिरच्या, कोथमिर...’ अशा आवाजात आपल्या मालाची जाहिरात करण्याची चढाओढ सुरू झालेली. ‘राम राम पाव्हनं’ म्हणत गरमागरम चहासोबत सुख-दुःखाच्या, लग्नकार्याच्या चौकशा सुरू होतात. बाजाराच्या एका कोपऱ्यात सत्तरीला टेकलेली एक म्हातारी पोत्यावर पालक, भाजी, लिंबू, कोथिंबीर घेऊन बसली आहे. नजर कमी झालेली, हाताशी तराजूदेखील नाही. सकाळीच बाजार उरकून टाकू, असा विचार करून लवकर बाजारात पोचलेल्या अर्थशास्त्राच्या एका प्राध्यापकाचं लक्ष म्हातारीकडे जातं. तो विचार करतो, ‘किती थकलीय ही. परिस्थिती परीक्षा पाहतेय जणू बिचारीची. आपण तिच्याकडून भाजी घेऊन तिला मदत करू, म्हणजे तिला लवकर घरी जाता येईल.’ तो तिच्याकडून खरेदी करतो. पैसे देताना विचारतो, ‘‘आजी, किती पैसे झाले’’? आजीचं उत्तर ऐकून तो सर्द होतो. ती म्हणते, ‘‘तुमाला हिसुब येतो का आमाला अडाण्याला? हिसुब करा आन द्या काय द्याचे ते.’’ आत्यंतिक आश्‍चर्यानं तो म्हणतो, ‘‘आज्जे, म्हणजे तुला हिशेब नाही येत? असं तर कुणीही फसवील तुला.’’ त्यावर म्हातारी उत्तरते, ‘‘शिकलेल्या लोकास्नी फसायची भीती. पर सायेब, आपन कुनाला फशीवलं नाय, तर दुनियेत आपल्यालाबी कुनी फशवीत नाय. आज दोन वरसं झाली, म्या येते बाजारात, पर कुनीबी नाय फशीवलं मला. हिसुब काय शेजारचे लोक बी सांगत्यात. पर म्या नाय इचारीत, माजा मानुसकीवर इस्वास हाय.’’

प्राध्यापकामधला अर्थशास्त्री थंडगार पडलेला. कायम नफा-तोटा याच दोन बाजूंचा विचार करताना आपण मुळात पैसा ज्यांच्यासाठी बनवलाय तो माणूस आणि माणुसकी विसरून गेलो. कायम चलनवाढ, बजेट, सेन्सेक्‍स या जंजाळात अडकून जीवनातील आनंदाला पारखे झालो. या आजीनं किती सोप्या शब्दांत जीवनाचं तत्त्वज्ञान सांगितलं. नव्हे ती हे तत्त्वज्ञान जगतेय. हजारो ग्रंथ, प्रबंध आणि ‘पेपर्स’ वाचूनही जगाला अगम्य ठरलेलं समाधानी जीवनाचं हे सार तिनं किती सहज आत्मसात केलंय, तेही रोजच्या अनुभवाच्या जीवन-शिक्षणाच्या शाळेत. कोणत्याही विद्यापीठानं आपल्याला आजवर न शिकवलेलं  जगण्याचं वेदान्त या अशिक्षित म्हातारीनं किती सहज समजावलं! तो मनाशीच म्हणाला, ‘हा विश्वास फक्त शेतकरीच दाखवू शकतात. कारण ते स्वतःवरील विश्वासावर जगतात आणि जग त्यांच्यावरील विश्वासाने जगते! हा विश्वास टिकवायला हवा, वाढवायला हवा!’
अंध व्यक्तीला गर्दीतून जाताना आपल्या हातातील पांढऱ्या काठीपेक्षा लोकांच्या मनातील चांगुलपणावर जास्त विश्वास असणार. घरदार उघड्यावर टाकून सीमेवर शत्रूंचा बंदोबस्त करणाऱ्या जवानाचा हातातील बंदुकीपेक्षा गावच्या गावपणावर जास्त विश्वास असणार. पालकांना शाळांच्या अत्याधुनिक इमारतीपेक्षा शिक्षकांमधील समर्पणावर जास्त विश्वास असणार... हा विश्वास ही तर आपली सामाजिक संपत्ती. ती जपायला हवी! या विश्वासाचे संस्कार देणारी आणि गुणांच्या ‘एव्हरेस्ट’पेक्षा माणुसकीच्या ‘टेस्ट’ला प्राधान्य देणारी शाळा-महाविद्यालये वाढायला हवीत. तेव्हा आपण म्हणू शकू, ‘‘हम चले नेक रस्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल हो ना!’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com