मांजा !

मांजा !

शाळेतील विद्यार्थ्यांची परीक्षा. मुले धावत पळत वर्ग गाठतात. जागेवर बसतात. अनेकांच्या चेहऱ्यावर परीक्षेचा तणाव स्पष्ट दिसतोय. काहींच्या घशाला कोरड पडतेय. काही शेवटच्या क्षणापर्यंत उत्तरे वाचताहेत. काही इतरांना न कळेल असा देवाचा धावा करताहेत. पेपर सुरू होण्याची घंटा होते. पर्यवेक्षक प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका घेऊन वर्गात येतात. संपूर्ण वर्गावर नजर टाकतात. काय होणार? कसे असतील प्रश्न? आपल्याला येतील ना सोडवता? अशा शंकांनी आणि दडपणाने मुलांच्या काळजाचे ठोके वाढलेले ! पर्यवेक्षक काही सूचना देतात आणि प्रश्नपत्रिका वाटतात. हातात प्रश्नपत्रिका पडताच मुलांच्या चेहऱ्यावरील तणाव अधिकच गडद होतो. काहींच्या कपाळावर आठ्यांचे जाळे, तर काहींच्या हृदयाची धडधड बाहेर ऐकू येईल इतकी वाढलेली ! मुले प्रश्न वाचत उत्तरे आठवण्याचा, लिहिण्याचा प्रयत्न करू लागतात.

वर्गाच्या बाहेर अंगणात बरीच मोठी झाडे सावली देत उभी. पर्यवेक्षक वर्गाच्या दारात येऊन बाहेर नजर टाकतात. एखाद- दुसरा उशिरा पोचलेला विद्यार्थी घामाघूम होत अपराधी चेहऱ्याने वर्ग गाठतोय. एरवी विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजलेली चैतन्यमय शाळा जणू परीक्षेच्या धास्तीने अबोल झालेली. काही विद्यार्थी मन लावून पेपर सोडवताहेत. इतक्‍यात बाहेरच्या झाडांवरून एका पक्ष्याचा कर्कश्‍श ओरडण्याचा आवाज येऊ लागतो. त्या आवाजाने विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग पावते. पर्यवेक्षक वर्गाच्या दारात जाऊन काय झालंय ते पाहण्याचा प्रयत्न करतात. वर्गासमोरील  झाडाच्या शेंड्याला एका कावळ्याचा पंख झाडाला गुंतलेल्या मांज्याला अडकलेला. तो सगळी ताकद लावून त्यातून सुटण्याचा प्रयत्न करतोय, पण पुन्हा खाली खेचला जातोय. वेदनेने तो आकांत करतोय.

इकडे वर्गात मुले प्रश्नांशी जणू असाच सामना करताहेत. काहींना काल वाचलेले उत्तर आठवत नाही, काहींना प्रश्नाचे अर्थ कळत नाहीत. घामाघूम झालेली मुले पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे अधिकच दबलेली असतात. त्यांचेही पंख त्या ‘मार्क’वादाच्या निष्ठुर मांज्यात अडकलेले ! त्या बंधनात आणि जाचात मुलांचे निरागस बालपण करकचून बांधलेले. बाहेर झाडावर हळूहळू त्या अडकलेल्या कावळ्याभोवती त्याचे भाईबंद जमा होऊन ‘काव काव’ करत त्याला मदत करू पाहतात. इकडे मुले अशीच असहायपणे सभोवती बघतात. त्यांच्या चेहऱ्यावर अपराधीपणा, अगतिकता स्पष्ट दिसते. अचानक बाहेर झाडाखाली काही मुले येतात. अडकलेल्या कावळ्याच्या मदतीसाठी त्यातील एक जण झाडावर चढतो. लांब काठीने कावळ्याच्या पंखात अडकलेला मांजा तोडण्याचा तो प्रयत्न करू लागतो. इतर कावळे जास्तच ‘काव काव’ करू लागतात. काही त्याला चोच मारण्याचा प्रयत्न करतात. त्या सर्वांना चुकवत तो मुलगा अखेर कावळ्याच्या पंखात अडकलेला मांजा काठीने तोडतो आणि अडकलेला कावळा आकाशात मुक्त भरारी घेतो !

इकडे परीक्षेची वेळ संपते. मुले उत्तरपत्रिका जमा करतात. बहुसंख्य परीक्षार्थी उदास आणि चिंताक्रांत चेहेऱ्याने वर्गाबाहेर पडतात. पालक, शिक्षक, शाळा, नातेवाईक, समाज यांनी लादलेल्या अपेक्षांचे ओझे वाहणाऱ्या आणि त्या अपेक्षांच्या चरख्यातून पिळून निघताना स्वतःच्या स्वप्नांचे चिपाड होत जाणाऱ्या या मुलांची ‘अपेक्षांच्या मांजा’तून कधी सुटका होणार, असा मनाशी विचार करत पर्यवेक्षक कार्यालयाकडे निघतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com