किम ताळ्यावर; ट्रम्प भानावर

अजेय लेले
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे लवकरच उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची भेट घेणार आहेत. काही महिन्यांपूर्वी युद्धाच्या उंबरठ्यावर आलेल्या या दोन्ही देशांच्या प्रमुखांच्या या भेटीकडे अवघ्या जगाचे लक्ष असेल.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे लवकरच उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची भेट घेणार आहेत. काही महिन्यांपूर्वी युद्धाच्या उंबरठ्यावर आलेल्या या दोन्ही देशांच्या प्रमुखांच्या या भेटीकडे अवघ्या जगाचे लक्ष असेल.

गेल्या काही वर्षांपासून उत्तर कोरियाने जागतिक निर्बंधांपुढे न झुकता अणुबाँबच्या सलग चाचण्या घेतल्या. उत्तर कोरियाच्या या उद्दाम कृतीमुळे जग हादरले. अमेरिका, संयुक्त राष्ट्रसंघासह कोणाच्याही धमकीला भीक न घालणाऱ्या उत्तर कोरियाने गेल्या काही दिवसांत अचानक समेटाची भाषा सुरू केली आहे. जगातील आडमुठे राष्ट्र अशी ओळख असलेल्या उत्तर कोरियाची ही भाषा आश्‍चर्यचकित करणारी आहे. याचे कारण उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन हे स्वतःच खरे तर मूळ प्रश्‍नाचे कारण आहेत. आता त्यांनीच शांततामय तोडग्याची मागणी केली आहे. कुणाची, कसलीही पर्वा न करणाऱ्या उन यांच्या तोंडी ही भाषा आलीच कशी? त्यांच्या दृष्टिकोनात खरंच बदल झाला आहे, की ते कुठल्यातरी दबावाखाली तडजोडीची तयारी दाखवीत आहेत? अणुबाँबच्या जोरावर अमेरिकेसारख्या महाशक्तीला आव्हान देणाऱ्या किम जोंग उन यांनी खरंच आपली शस्त्रे खाली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे का? जागतिक समुदायाच्या पराकोटीच्या दबावानंतरही किम जोंग उन आणि त्यांच्या वडिलांनी अणुबाँबच्या चाचण्या घेतल्या. या चाचण्यांनंतर लादलेल्या निर्बंधांमुळे उत्तर कोरियाने आपल्या तलवारी म्यान केल्या असतील, की यामागे वेगळेच कारण आहे? सध्यातरी या सर्व प्रश्‍नांचे एकच ठोस उत्तर देता येत नाही. त्यासाठी, कोरियन द्वीपकल्पातील सध्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी काही मुद्द्यांच्या खोलात जावे लागेल.

 उत्तर कोरियावरील निर्बंधांच्या प्रभावाचा मुद्दा अर्थातच पहिल्या क्रमांकावर येतो. अमेरिकेने नुकतेच फेब्रुवारीमध्ये उत्तर कोरियावर नव्याने काही व्यापक आर्थिक निर्बंध लादले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्बंधांचा ‘दुसऱ्या टप्प्यातील निर्बंध’ असा उल्लेख केला आहे. उत्तर कोरियाकडून तेल आणि कोळसा मिळविण्यासाठी समुद्रात बेकायदारीत्या तस्करी केली जाते. अमेरिकेच्या कोशागाराने या तस्करी कारवाया हाणून पाडण्यासाठी एक व्यक्ती, २७ कंपन्या आणि २८ जहाजांची भलीमोठी कुमक मंजूर केली. उत्तर कोरियाने चीन आणि रशियाचा पाठिंबा मिळविण्यासाठी अनेक तडजोडी केल्या. त्यामुळे, संयुक्त राष्ट्रसंघाचा या देशावरील निर्बंधांचा विळखा काही वर्षांमध्ये सैल झाला आहे. उत्तर कोरियाच्या व्यापारामध्ये तब्बल ९० टक्के वाटा असणाऱ्या चीनची आपल्या या ‘लाडक्‍या’ देशावर निर्बंध लादण्याची फारशी इच्छा नव्हती. मात्र, या वेळी किम जोंग उनच्या ‘अनिर्बंध’ वर्तनामुळे चीनही दुखावला असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच, चीननेही निर्बंधाचे पाऊल उचलले असावे. उत्तर कोरियाला अमेरिका व चीनच्या दुहेरी दबावापुढे तग धरणे अवघड आहे. त्यामुळेच, त्यांनी शांततेचा सूर आळवल्याचे दिसते.  
दुसरा मुद्दा म्हणजे, अण्वस्त्रांचा वापर करण्याच्या धमक्‍यांना अपेक्षित फळ येत नसल्याचे उनला कळून चुकले असावे. उत्तर कोरियाने अण्वस्त्रसज्जतेच्या कितीही बढाया मारल्या, तरी लांब पल्ल्याचा मारा करणाऱ्या अणुहल्ल्याची या देशाची सध्या तरी ताकद नाही, ही सर्वज्ञात वस्तुस्थिती आहे. सध्या या देशाकडे अणुबाँब; तसेच तो टाकण्यासाठी क्षेपणास्त्रेही आहेत. मात्र, लांब पल्ल्याचा मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्रामध्ये ठेवण्याच्या आकाराचा अणुबाँब आजही नाही. त्यामुळेच, त्यांच्या अमेरिकेवर अणुहल्ला करण्याच्या वल्गनांना फारसा अर्थ नाही. येनकेनप्रकारे, आपण ही क्षमता मिळविलीच, तर अमेरिका प्रतिहल्ल्यात आपली राखरांगोळी करेल, याचीही पूर्ण जाणीव उत्तर कोरियाला आहे. थोडक्‍यात, उत्तर कोरियाच्या अणुहल्ल्याच्या धमक्‍यांना जग फार काळ गांभीर्याने घेणार नाही.

एक लक्षणीय योगायोग असा, की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये काही बाबतीत कमालीचे साधर्म्य आहे. आपण इतक्‍या अविचाराने वागावे की उर्वरित जगाने आपल्याला वेडेच ठरविले पाहिजे, अशीच जणू उन यांची कार्यपद्धती दिसते. एकीकडे उन असे अविचाराने वर्तन करत असताना दुसरीकडे ट्रम्प यांची प्रतिमाही त्यांच्याशी मिळतीजुळतीच आहे. किंबहुना उन यांच्यापेक्षाही अधिक तऱ्हेवाईक असे त्यांचे वागणे आहे. ट्रम्प यांनी उत्तर कोरियाबाबत वेळोवेळी केलेल्या विधानांमधून संघर्षाची सुरवात करण्याची ‘क्षमता’च दर्शविली आहे. उत्तर कोरियानेच एखादी आगळीक करून पहिली ठिणगी टाकण्याची ते वाट पाहत आहेत. एरवी अविवेकाने वागणाऱ्या उन यांनाही या संभाव्य युद्धात उत्तर कोरियाचा सर्वनाश होईल; अमेरिकेवर मात्र ही वेळ येणार नसल्याची पूर्ण जाणीव आहे. चौथा मुद्दा म्हणजे, उत्तर कोरियावर संपूर्ण जग आगपाखड करत आहे. अशा परिस्थितीत दक्षिण कोरिया या सख्ख्या शेजाऱ्यालाच उत्तर कोरियाशी समेटाची इच्छा आहे. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून उत्तर कोरियाबरोबरच्या संघर्षाला शांततामय पूर्णविराम देण्याचे आश्‍वासन देत सत्तेवर आले. दक्षिण कोरियात त्यांनी यादृष्टीने विधायक पावले उचलली आहेत. उत्तर कोरियाशी सामंजस्याचा पूल बांधण्यासाठी त्यांनी दिवसरात्र एक केला आहे. दक्षिण कोरियात नुकत्याच झालेल्या हिवाळी ऑलिंपिकमध्ये त्यांनी ‘स्पोर्टस डिप्लोमसी’मधून उत्तर कोरियाला साद घातली. या स्पर्धांमध्ये दोन्ही देशांच्या खेळाडूंच्या एकत्रित संघाचे खेळणे हे सकारात्मक पाऊल म्हणावे लागेल.

 हे चार मुद्दे लक्षात घेता किम जोंग उनला तडजोडीचा विचार का करावा लागला असेल, हे स्पष्ट होते. केवळ दोन महिन्यांमध्येच या संदर्भात बरीच प्रगती झाली आहे. दक्षिण कोरियाने चर्चेच्या पहिल्या फेरीतच उत्तर कोरियाकडून अण्वस्त्रांचा त्याग करण्याचे ‘अविश्‍वसनीय’ आश्‍वासन मिळविले. आगामी काही आठवड्यांमध्येच उन यांच्याबरोबर होणाऱ्या प्रस्तावित बैठकीसाठीही ट्रम्प यांनी अनुकूल संकेत दिले आहेत. दोन्ही देशांच्या या ‘पॅच अप’मध्ये चीन मात्र काहीसा बाजूला फेकला गेला आहे. तथापि उन यांच्या भेटीमुळे या सर्व संघर्षात महत्त्वाची भूमिका बजावणारा चीन पुन्हा केंद्रस्थानी आला आहे. चीनबरोबरच या सारीपाटात जपानची भूमिकाही महत्त्वाची आहे. ट्रम्प आणि किम यांच्या भेटीपूर्वी जपान अमेरिकेशी चर्चा करेल. सारांश, उत्तर कोरियासाठी शांततामय, विधायक तोडग्यासाठी आवश्‍यक ते नेपथ्य पूर्ण झाले आहे. यापूर्वीही अमेरिकेने उत्तर कोरियावरचे निर्बंध उठविले होते. उत्तर कोरियाने अणुकार्यक्रम थांबविण्याचे आश्‍वासन दिल्यावर अमेरिकेने हे पाऊल उचलले होते. मात्र, उत्तर कोरियाने आपल्या आश्‍वासनाला सातत्याने हरताळ फासला, तरीही या दोन्ही देशांचे ‘शहाणपण’ प्रलंबित समस्येवर शांततामय तोडगा काढेल, ही आशा उंचावली आहे, हे मात्र नक्की.        
(अनुवाद : मयूर जितकर)

Web Title: editorial usa donald trup and north korea kim jong