रंग माझा वेगळा! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

अद्यापही रंगावरून श्रेष्ठ-कनिष्ठत्व ठरविण्याची धारणा कायम आहे. हे पूर्वग्रह हटविण्याच्या प्रयत्नांत बॉलिवूड कलाकारांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते; पण त्यासाठी हवा प्रगल्भ विचार. 

माहिती स्फोटाच्या या काळात आणि प्रसारमाध्यमांच्या अफाट विस्तारात खरे म्हणजे आपण सगळेच अधिकाधिक सुजाण-समृद्ध व्हायला हवे; पण तसे होताना का दिसत नाही, हा खरे म्हणजे सध्याच्या जगातील एक महत्त्वाचा प्रश्‍न आहे. वैचारिक मशागतीचे प्रयत्न होतच नाहीत, असे नाही; पण ते एका विशिष्ट परिघातच सीमित राहतात. समाजात नाद-निनाद उमटावेत, एवढा त्याचा आवाज मोठा नसतो. दुसऱ्या बाजूला वलयांकित झोतात राहणाऱ्या, तरुणांवर प्रभाव टाकणाऱ्या आणि त्यांचे 'आयकॉन' बनलेल्यांच्या जगात वेगळेच काही चालू असते. त्यांचे विषयच वेगळे, वरवरचे. संवादाचे प्राधान्यक्रमही त्यांच्या सोयीचे. त्यामुळेच समाजात काही सकारात्मक बदल घडविण्याच्या प्रयत्नांपासून अगदी एखाद-दुसरा अपवाद वगळता त्यांचे चर्चाविश्‍व दूरच राहते. त्यामुळेच अभय देओलसारखा अभिनेता जेव्हा एखाद्या मूलभूत विषयावर फेसबुकसारख्या माध्यमाद्वारे चर्चेला तोंड फोडतो तेव्हा त्याची विशेष दखल घ्यावी लागते. काळा रंग म्हणजे वाईट, दुय्यम, कनिष्ठ आणि गोरा म्हणजे श्रेष्ठ, चांगला, आकर्षक ही आणि अशा प्रकारची समीकरणे अनेकांच्या जाणीव-नेणिवेत इतकी मुरलेली असतात, की त्यातील फोलपणा दाखवून देण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतात. परंतु तसे प्रयत्न तर सोडाच, या चुकीच्या धारणा आणखी गडद करण्याचे कामच मुख्य धारेतील बहुतांश चित्रपट, टीव्ही मालिका, जाहिराती यांच्याद्वारे सतत होताना दिसते.

रंग उजळ करणाऱ्या वेगवेगळ्या क्रीम्सच्या जाहिराती जेव्हा मोठमोठे अभिनेते आणि अभिनेत्री करतात, तेव्हा समाजमनावर आपण कोणते विपरीत परिणाम करतो आहोत, किती जणांच्या मनावर कायमचे ओरखडे उमटवत आहोत, याची त्यांना जाणीव तरी नसते किंवा असूनही ते डोळेझाक करतात. सावळेपणमुळे चारचौघात होणारी मानहानी टाळण्यासाठी विशिष्ट क्रीम वापरा, आणि समाजात पुन्हा स्थान मिळवा, असा संदेश देणाऱ्या जाहिरातीतील संवेदनांधळेपण चीड आणणारे आहे; पण या जाहिरातींना आपला चेहरा देणाऱ्या नट-नट्यांना त्याचे सोयरसुतक नसते. त्यांची कानउघाडणी इतर कोणी केली असती, तर त्यांनी दखलही घेतली नसती बहुधा. परंतु अभय देओलनेच फेसबुकवर 'पोस्ट' टाकून हे काम केले, हे चांगले झाले.

शाहरूख खान, विद्या बालन, दीपिका पदुकोण अशा बड्या कलाकारांच्या जाहिरातींची उदाहरणे दाखवून देतच त्याने आपला मुद्दा मांडला आहे. काळेपणा वाईट हा बुरसटलेला विचार तुम्ही जाहिरातींच्या माध्यमातून लोकांच्या माथी मारताहात, असे त्याने बजावले. यातून बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या जगात 'रंग माझा वेगळा' हे तर त्याने दाखवून दिलेच; पण चंदेरी दुनियेच्या झगमगाटात मग्न असलेल्यांपैकी काहींना या विषयावर रिऍक्‍ट होण्यास भाग पाडले. अशा प्रकारची चर्चा या वर्तुळात होणे आणि कलाकारांच्या सामाजिक उत्तरदायित्वाचा आग्रह अधोरेखित करणे हे महत्त्वाचे आहे. 

अगदी भल्याभल्यांच्या मनांत रंगभेदाविषयीचे पूर्वग्रह खोलवर रुतलेले असतात. भाजपचे नेते तरुण विजय यांनी भारतात रंगभेद मानला जात नाही, हा मुद्दा मांडताना 'दक्षिणेकडचे लोक काळे असूनही आम्ही त्यांना नाही का बरोबर घेतले' असा सवाल केला होता. या सवालातच भेदाचा रंग मिसळलेला आहे, हे त्यांच्या लक्षात कसे आले नाही? हुंडा न घेतल्याची जाहिरात करणे, कथित खालच्या जातीतील लोकांना चांगली वागणूक दिल्याची बढाई मारणे, पत्नीलाही आपण समान अधिकार कसे देतो, याचा गवगवा करणे या गोष्टींमध्ये जो अंतर्विरोध आहे, तोच तरुण विजय यांच्या विधानातही आहे.

साम्राज्यवाद्यांनी मतलबासाठी गोरे-काळे भेदाला खतपाणी घालून जितांचा न्यूनगंड वाढविण्याचे काम केले. पण तो काळ मागे पडला. आता आपण स्वतंत्र आहोत. विज्ञानाने रंग, वंश, जाती आदींभोवती जमा झालेल्या गैरसमजुतींचे जाळे आणि श्रेष्ठ-कनिष्ठत्वाच्या कल्पनांना केव्हाच सुरुंग लावला आहे, तरीही आपण त्याच जुनाट कल्पना का उराशी कवटाळून धरतो आहोत? समाजमनावर परिणाम घडविणाऱ्या विविध माध्यमांतील लोकांनी याविरुद्ध एल्गार पुकारला तर चित्र बदलू शकते. पण त्या चकचकाटी आणि झगमगाटी दुनियेत संपत्तीचे लोट वाहात असले तरी आधुनिक विचारांचा बऱ्यापैकी दुष्काळ आहे. अभयच देओलने मांडलेली भूमिका त्यामुळेच एखाद्या सुखद झुळुकेसारखी वाटते. तो प्रवाह अधिक रुंद व्हायला हवा आणि 'देखणे ते चेहरे, जे प्रांजळाचे आरसे' हा विचार प्रभावी ठरायला हवा.

Web Title: Editorial on use of fairness products in India; Abhay Deol slams bollywood stars