मृत्यूचा कानमंत्र (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

कोणतेही कायदे-कानून, तसेच सामाजिक जीवनात पाळावयाचे नियम धाब्यावर बसविण्याबाबतची बेपर्वाई दुर्घटनांना निमंत्रण देणारी ठरते. कोणतीही नशा ही नाशाला कारणीभूत ठरते.

कोणतेही कायदे-कानून, तसेच सामाजिक जीवनात पाळावयाचे नियम धाब्यावर बसविण्याबाबतची बेपर्वाई दुर्घटनांना निमंत्रण देणारी ठरते. कोणतीही नशा ही नाशाला कारणीभूत ठरते.

उत्तर प्रदेशात गोरखपूरपासून 50 किलोमीटरच्या अंतरावर एका बसचालकाच्या अक्षम्य बेपर्वाईने 13 शालेय मुलांचे गुरुवारी हकनाक बळी घेतले, त्याच दिवशी पुणे परिसरात उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या तीन मुलांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू झाला. या मृत्यूंची नोंद पोलिस दफ्तरी "अपघाती बळी' म्हणून झाली असली, तरी वस्तुस्थिती मात्र त्यापेक्षा वेगळी दिसत आहे. उत्तर प्रदेशात हा बस अपघात झाल्यावर लगोलग त्याचा वृत्तांत "रेल्वेने शालेय विद्यार्थ्यांच्या बसला उडविले' अशा शब्दांत दिला गेला. प्रत्यक्षात हा बसचालक कानाला इअरफोन लावून गाणी ऐकत होता आणि त्याने डावी-उजवीकडेही न पाहता बस रेल्वे रुळांवर घातली. वाहन चालविताना इअरफोन लावू नये, असे इशारे अनेक वेळा देऊनही आपण ते कसे धाब्यावर बसवतो, याचे हे अगदी ठळकपणे नोंद घेण्याजोगे उदाहरण आहे. गाणी ऐकण्यात गुंग झालेल्या या बसचालकाने रेल्वे क्रॉसिंगवरील फाटक ओलांडून गाडी रुळांवर घातली, तेव्हा रेल्वेचा गेटमनच नव्हे तर बसमधील विद्यार्थीही ओरडून त्यास रेल्वे गाडी येत असल्याचे सांगत होते. मात्र, कानांत इअरफोन घातलेले असल्याने त्यास गेटमन आणि विद्यार्थी यांचा हा ओरडा तर सोडाच, रेल्वे गाडीचा आवाज तसेच मोटरमनने कर्कश्‍शपणे वाजविलेले भोंगेही ऐकू गेले नाहीत आणि परिणामी गाण्याच्या धुंदीत मग्न असलेल्या त्या चालकासह डिव्हाइन पब्लिक स्कूलमधील वयाची दहा वर्षेही पूर्ण न केलेल्या 13 विद्यार्थ्यांना जागीच मृत्यूला सामोरे जावे लागले. मुळशी धरणात बुडून मृत्युमुखी पडलेले तीन विद्यार्थी हे चेन्नईचे होते आणि उन्हाळी शिबिरासाठी-समर कॅम्पसाठी ते येथे आले होते. एकाच दिवशी झालेल्या या दोन अपघातांमुळे शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मुख्य म्हणजे कोणतेही कायदे-कानून, तसेच सामाजिक जीवनात पाळावयाचे नियम धाब्यावर बसविण्याबाबतची बेपर्वाई असे दोन विषय अजेंड्यावर आले आहेत. आज दैनंदिन जीवनात सेलफोन ही अत्यावश्‍यक बाब बनली आहे. "सेलफोन'ने आपल्या जीवनात प्रवेश केला, तेव्हा सुमारे दोन दशकांपूर्वी त्याचा वापर हा केवळ "फोन' म्हणूनच होत होता. पुढे त्यात रेडिओ, रेकॉर्डर तसेच म्युझिक प्लेअर अशा काही यंत्रणांचा म्हणजेच "ऍप्स'चा समावेश झाला आणि आता तर तो सदोदित इअरफोनच्या माध्यमातून कानाला चिकटलेला आपला एक नवा अवयवच बनला आहे. नवे तंत्रज्ञान हे बहुतांशी जीवनात उपयोगी ठरत असते; मात्र, त्याच्या अतिरेकी वापराची नशा चढली की काय होऊ शकते, याचे हृदयद्रावक दर्शन या अपघातांमुळे घडले आहे.

पुण्याजवळच्या मुळशी धरणात झालेल्या अपघातामुळे ऐरणीवर आलेला प्रश्‍न हा घराघरांत चर्चिला जाणारा आहे. दीर्घ मुदतीच्या उन्हाळी सुट्या लागताच; मुलांपेक्षाही त्यांचे पालक सुटीत ही मुले काय करणार, या प्रश्‍नाने भेदरून जातात आणि मग त्यांना उन्हाळी शिबिरांना वा नाचाच्या, गाण्याच्या, खेळांच्या प्रशिक्षणास धाडले जाते. त्यातही निवासी उन्हाळी शिबिरांचा पर्याय हा पालकांना फारच सोयीचा असतो! एकदा का ही मुले निवासी शिबिरात दाखल झाली की पालकही त्या काळात आपल्याला हवे ते करायला मोकळे होतात. मात्र, शिबिरात दाखल करण्यापूर्वी तेथे त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाणार आहे की नाही, याची चौकशी करण्याचे भानही त्यांना उरत नाही. अर्थात, मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही शिबिर संयोजकांचीच प्रामुख्याने आहे. मुळशी धरणात उतरलेल्या त्या तीन दुर्दैवी मुलांना पोहायला येत होते का आणि शिबिर संयोजकांनी धरणावर सुरक्षारक्षक आहेत का नाही, याची काळजी घेतली होती का, या प्रश्‍नांची आता उत्तरे मिळाली तरी त्यामुळे ती मुले थोडीच परत येणार आहेत? यामुळेच हे हकनाक बळी गेले आहेत. आपण या साऱ्यातून काही बोध घेतला नाही, तर पुन्हा पुन्हा दुर्घटनांना सामोरे जावे लागेल.

Web Title: editorial uttar pradesh bus railway accident