मूर्तिभंजनाचे राजकारण! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

लोकशाही मार्गाने मिळविलेल्या विजयाच्या जल्लोषाचे उन्मादात रूपांतर होणे दुर्दैवी आहे. सुडाचे आणि मूर्तिभंजनाचे राजकारण देशाचे नुकसानच करेल.

लोकशाही मार्गाने मिळविलेल्या विजयाच्या जल्लोषाचे उन्मादात रूपांतर होणे दुर्दैवी आहे. सुडाचे आणि मूर्तिभंजनाचे राजकारण देशाचे नुकसानच करेल.

आपल्या देशात पुतळ्यांची विटंबना आणि मोडतोड जशी नवी नाही, तसे जगभरातही त्याबाबत नावीन्य नाही! मात्र, मूर्तिपूजेची परंपरा असलेल्या आपल्या देशात अशा मूर्तिभंजनानंतर जसे वादळ उठते आणि त्यानंतर दंग्याधोप्यांचे राजकारण सुरू होते, तसे जगभरात क्‍वचितच होते. सोव्हिएत रशियाचे 1980च्या दशकाच्या अखेरीस विघटन झाल्यावर रशियन क्रांतीचे प्रणेते आणि विचारवंत व्लादिमीर लेनिन यांचे पुतळे खुद्द रशियातच उद्‌ध्वस्त करण्यात आले होते आणि लेनिन यांच्या अनेक स्मृतिस्थळांचीही विटंबना करण्यात आली होती. मात्र, त्रिपुरा येथील दोन-अडीच दशकांच्या मार्क्‍सवादी राजवटीचा दारुण पराभव केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी लेनिनचा पुतळा फोडण्याची जी उन्मादी कृती केली, त्यामागे सुडाचे राजकारण हे स्पष्ट होते. त्रिपुरात भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर त्या राज्यातील लेनिन यांचे दोन पुतळे उद्‌ध्वस्त करण्यात आल्यानंतर इतरत्रही असे प्रकार घडले. तमिळनाडूत वेल्लोरी येथे द्रविड राजकारणाचे प्रणेते रामस्वामी पेरियार यांच्या पुतळ्याची मोडतोड करण्यात आली. कोलकाता येथे जनसंघाचे संस्थापक डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्यास काळे फासण्यात आले. याशिवाय मेरठमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची समाजकंटकांनी विटंबना केली. मूर्तिभंजनाचा हा जो काही "खेळ' आपल्या देशात अचानक सुरू झाला आहे, तो निषेधार्ह तर आहेच; शिवाय ही लाट देशभरात पसरल्यास त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न उभा राहू शकतो. वास्तविक कधी नव्हे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौनात न जाता "कायदा हातात घेण्याचे असले प्रकार खपवून घेणार नाही', असे बजावले आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारी कृत्ये होणार नाहीत, हे पाहावे, अशा सूचना सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या हे चांगलेच झाले. असे सगळे असताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी मात्र "परदेशातल्या व्यक्तींचे पुतळे इथे हवेत कशाला', असा सवाल करीत झुंडशाहीचे अप्रत्यक्ष समर्थन केले, ही बाब गंभीर आहे. "लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या एका सरकारला पूर्वीच्या सरकारने जे काही केले, त्यात बदल करण्याचा अधिकार आहे!' हे तेथील राज्यपालांचे वक्तव्यही धक्कादायक आहे. या वक्तव्यामुळे संतापाची लाट उसळणे स्वाभाविक आहे. पंतप्रधान तसेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी यासंदर्भात तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर आता त्रिपुरातील लेनिन मूर्तिभंजनाशी भाजप कार्यकर्त्यांचा संबंध नसून, हा जनतेचा मार्क्‍सवादी राजवटीविरोधातील संतापाचा उद्रेक आहे, असे भाजप नेते सांगू लागले आहेत!

मात्र, प्रत्यक्षात यासंदर्भात काय घडले ते नेमके उलटे आहे. लेनिन यांचा पुतळा उखडण्यात आल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एच. राजा यांनी "आता पाळी रामस्वामी पेरियार यांच्या पुतळ्याची आहे!' अशा आशयाचा मजकूर फेसबुकवर टाकला आणि त्यानंतर काही तासांतच पेरियार यांच्या पुतळ्यावर दगडफेक झाली. त्याप्रकरणी अटक झालेल्या दोघांपैकी एक कम्युनिस्ट पक्षाचा स्थानिक पदाधिकारी असला तरी, दुसरा हा भाजपचा स्थानिक चिटणीस आहे. आता मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या कडक इशाऱ्यानंतर राजा यांनी फेसबुकवरील संबंधित मजकूर "डिलीट' केला आहे. मात्र, तेवढ्याने भागणार नाही. राजा यांच्यावरही प्रक्षोभक वक्‍तव्यांबद्दल भाजपला कारवाई करावी लागेल; अन्यथा पंतप्रधान आणि गृहमंत्री यांचे इशारे हे नेहमीप्रमाणेच फुकाचे असल्याचे दिसून येईल. मुळात प्रतिमा, प्रतीके तसेच पुतळे वा मूर्ती - मग ते कोणाचेही असोत, यांची विटंबना जितकी निषेधार्ह आहे, तितकेच त्यानंतर घडणारे प्रकारही. हे सारे आपल्याकडे जास्त प्रमाणात घडते, याचे कारण हा मूर्तिपूजकांचा देश आहे आणि वास्तवापेक्षा आपण प्रतीकांवरच अधिक प्रेम वा खरे तर भक्‍ती करतो. त्याचा उपयोग करून घेणे, हा राजकारण्यांचा कावा असतो. त्यामुळेच वास्तवातील खऱ्याखुऱ्या प्रश्‍नांवरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवले जाते. शिवाय, आपापल्या मतपेढ्या सुरक्षित राखण्याचेही काम भावविवश जनतेला वेठीस धरून सहज साध्य होते आणि सर्वपक्षीय राजकारण्यांना तेच हवे असते. त्रिपुरातील घटनेमुळे एक मात्र झाले. पश्‍चिम बंगालमध्ये एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या ममता बॅनर्जी आणि डावे कम्युनिस्ट यांना एकाच भूमिकेवर येणे भाग पडले! परंतु ममतादीदींनी लेनिनचा पुतळा उद्‌ध्वस्त करण्याच्या घटनेचा निषेध करतानाही, मार्क्‍सवाद्यांनी सिंगूर तसेच अन्यत्र केलेल्या हिंसाचाराचीही आठवण करून दिली. मूर्तिभंजन आणि अस्मितावादी राजकारणाचा अतिरेक अनेक राज्यांमध्ये दिसून येत असून, दुर्दैवाने महाराष्ट्रासारखे प्रगत राज्यही त्याला अपवाद नाही, हा अनिष्ट प्रवाह आहे. त्याला वेळीच आळा घालायला हवा; अन्यथा दंगे-धोपे माजू शकतात. तसे झाले तर त्यात कोणाचेच हित नाही, हे सर्वपक्षीय राजकारण्यांनी लक्षात घेणे जरुरीचे आहे.

Web Title: editorial vladimir lenin idol crime politics