भाष्य : गो-पूजा ते गोविज्ञान!

गो-भक्ती किंवा गो-पूजा हा पंचवीस-तीस वर्षांपूर्वीचा विषय आता ‘गोविज्ञान’ या स्वरूपात पुढे येत आहे.
गो-पूजा ते गोविज्ञान!
गो-पूजा ते गोविज्ञान! sakal

गो-भक्ती किंवा गो-पूजा हा पंचवीस-तीस वर्षांपूर्वीचा विषय आता ‘गोविज्ञान’ या स्वरूपात पुढे येत आहे. एखादे शास्त्र काळानुसार जुने असते आणि त्याचे अनेक उपयोग समोर येत असतात. प्रत्यक्ष प्रयोग करताना आणखी काही निराळी निरीक्षणे पुढे येतात. त्यातून विज्ञानाचे पाऊल पुढे पडते. गाईचे उपयोग हा विषय याचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.

गाय या विषयावर चाळीस-पंचेचाळीस वर्षापूर्वी काम केलेल्या मोहन देशपांडे यांचे ‘ऋषिकृषी’ हे पुस्तक माझ्या पाहण्यात आले. त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश राज्यांतील अनेक शेतकऱ्यांकडून ते प्रयोग करून घेतल्याचे वाचल्यावर तो विषय खोलात पाहिला पाहिजे, असे मनाने घेतले. त्या विषयाच्या संबंधितांशीही बोललो, काही ठिकाणी प्रत्यक्ष प्रयोगही पाहिले. काही पुरावे पाहिले. अलीकडे सुभाष पाळेकर यांनी केलेले प्रयोग स्पृहणीय आहेत. त्यांच्या प्रयोगाला मी तर ‘अनवाणी विद्यापीठ’ म्हणतो. ही प्रस्तावना देण्याचे कारण, गोवंशासंबंधी ‘गोविज्ञान’ म्हणून विषय विकसित होत आहे. गोआधारित शेती, गोवैद्यक, पर्यावरणशुद्धता, रंगनिर्मिती, बांधकामातील महत्त्वाचे साहित्य यांचा त्यात समावेश होतो. घरातील जमीन सारवल्याने उपयोग होतात. मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी गाईच्या दुधाचा उपयोग होतो, असे मुद्दे हाताशी होते. त्याचबरोबर ‘नाडेप’ उद्योग समूह उभा केलेले नारायणकाका पांढरीपांडे यांना अर्धांगवायू झाला असताना त्यांनी आपला मुक्काम गाईच्या गोठ्यात हलवून आपल्यावरच उपचार करून घेतले आणि त्यातून ते बरे झाले. अशी अनेक उदाहरणे दिसू लागली.

एखादे शास्त्र काळानुसार जुने असते आणि त्याचे अनेक उपयोग समोर येत असतात, अशावेळी अनेक बाबी प्रत्यक्ष प्रयोग करताना काही निराळीच निरीक्षणे पुढे येत असतात. त्यामुळे तो विषय मी काही दिवस अभ्यासाचा केला. त्यातील सर्वांत आघाडीचा विषय होता गोआधारित शेतीचा. ‘ऋषिकृषी’ पुस्तकातील प्रयोगाप्रमाणे फक्त दहा किलो शेणात अर्धा किलो मध, पाव किलो तूप घातल्यावर होणारे मिश्रण एक एकर शेतीला त्या पिकापुरते खत म्हणून पुरते. या प्रयोगाप्रमाणे सुभाष पाळेकर यांचा ‘जीवामृत’चा प्रयोग पाहिला. नागपूर येथील ‘गोविग्यान अनुसंधान संस्था’ या संस्थेचे कामही पाहिले. त्यांनी देशातील अनेक राज्यांत सुरू असलेल्या अमृतपाणी यांचा अभ्यास केला आहे. त्यांनी गोमूत्रावर अनेक पेटंट्‌स मिळवली आहेत. त्यात साहजिकच ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी लक्ष घातले आहे. गुजरातमध्ये बन्सी गीर गोशाळा, राजस्थानातील पतमेढा गोशाळा, झारखंड राज्यातील बिरसा कृषिविद्यापीठ, मध्य प्रदेश, पश्र्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक येथील प्रयोग पाहिले की लक्षात येते की, हा विषय राष्ट्रीय कार्यक्रमही होऊ शकतो. याला पूरक असे व्यापक वाङमयही वाचनात आले. त्यात वैदिक वाङमयापासून ॲग्रिकल्चरल टेस्टामेंटचे लेखक सर अल्बर्ट हॉवर्ड यांचे पुस्तक, डॉ. वंदना शिवा यांचे काम यांतून स्पष्ट झाले, की या साऱ्याचे उपयोग आहेत; पण त्यावर विद्यापीठे, आयआयटी, राष्ट्रीय प्रयोगशाळा, अनेक संस्थांनी ‘प्रमाणीकरणा’साठी संयुक्त प्रयत्नांची गरज आहे. शेतकऱ्याला एक एकराची बागाईत किंवा साधी शेती करण्यासाठी रासायनिक खतासाठी पंचवीस ते तीस हजार किंवा साध्या शेतीसाठी तीन ते पाच हजार रुपये खर्च येतो, त्याऐवजी गोआधारितचा खर्च एक टक्काही नाही आणि मिळणारे पीक हे पूर्णपणे जैविक असते. हा विषय विविध व्यासपीठांवरून मांडला. परिणामतः सुमारे सात वर्षांपूर्वी त्या वेळचे केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी संपर्क आला आणि त्यांनी सांगितले की, या विषयासाठी ‘उन्नत भारत अभियान’ ही संस्था स्थापण्यात येत आहे. त्यात डॉ. माशेलकर यांच्यासारखे शास्त्रज्ञ आहेत.

कल्पना वैदिक शेतीची

वैदिक चळवळ आता वेगाने वाढत आहे. अनेक व्यक्तींनी केलेली कामे विद्यापीठ पातळीची आहेत. त्यात डॉ. वंदना शिवा, बन्सी गीर गोशाळेचे गोपाळजी सुतारिया, गोविग्यान अनुसंधान संस्थेचे मुनील मानसिंगका यांचा उल्लेख करावा लागेल. डॉ वंदना शिवा यांनी वैदिक शेती, नवधान्य चळवळ, जागतिक पातळीवर जैविक शेतीची चळवळ, प्रामुख्याने रासायनिक खताविरोधात जगभर जागरूकता केली आहे. रासायनिक खतांना पर्याय आहे वैदिक शेती. रासायनिक खतातून जगभर फक्त दारूगोळ्याची खते पुरवली जातात, एवढा त्याचा परिणाम मर्यादित नसून, या अन्नातून माणसाची प्रकृती कायम छोटे-मोठे रोग असलेली होते. त्यातून माणसाची क्षमता कमी होते, पण प्रत्येक घरात अन्नखर्चापेक्षा औषधांचा खर्च अधिक होऊन बसतो. अहमदाबादच्या बन्सी गीर गोशाळेचे वैशिष्ट्य असे की, त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या साडेचारशे गीर गाई आणि बैल यांच्या गोमूत्राचे स्वतंत्र परीक्षण केले आहे. त्यांना एका गाईच्या गोमूत्रातून गोआधारित शेतीसाठी प्रभावी गुणधर्म मिळाले. त्या गोमूत्राच्या आधारे केलेले ‘गोकृपामृत’ द्रावण ते विनामूल्य देतात. त्या विषयावर ‘यू-टयूब’वर व्यापक माहिती व मुलाखती आहेत.

जी स्थिती गोआधारित शेतीबाबत आहे, तीच स्थिती गोवैद्यकाबाबतही आहे. याचीही केंद्रे भारतात अनेक ठिकाणी असून, एक केंद्र पुण्यातही आहे. बाजीराव रोडवर ‘पुणे गोविज्ञान संशोधन केंद्राचे’ कार्यालय आहे. येथे सर्व व्याधींसाठी ओपीडी आहे. गोवैद्यकातील ‘पंचगव्य’ या औषधामुळे कॅन्सरच्या रुग्णाच्या वेदना लवकर कमी होतात व केमोची शक्यता कमी होते. किडनीविकार, हृदयविकार, मनोविकार अशा क्लिष्ट विकारांवर गोवैद्यक आधारित औषधांनी अधिकृत डॉक्टरांकडून उपचार होत असतात. देशात किमान दीडशे ठिकाणी आज निरनिराळ्या ठिकाणी अशा ओपीडी आहेत. त्या खेरीज गोविज्ञान क्षेत्रात रा. स्व. संघाचा गोसेवा विभाग देशभरात मोठे काम करीत आहे. गोविज्ञानाच्या उपयोगितेची ही फक्त परिचयापुरती माहिती आहे. प्रत्येक शेतात हा विषय पोहोचून तेथील उत्पादन खर्च नाममात्र होईल, तेव्हा तो विषय अनेक अर्थाने देशाच्या उपयोगितेचा होईल. उपलब्ध प्रयत्नातून तोही दिवस दूर नाही. असे म्हणता येईल.

जगभरात गाईचे महत्त्व वाढते...

सामान्य माणसाच्या हृदयात स्थान असलेली गाय ही ‘गोमाता’ स्वरूपात आहे. ज्या घरी गाय आहे, तेथे शांतता असते. देशात ग्रामीण भागात अजूनही घरातील स्वयंपाकघर आणि देवघर गाईच्या शेणाने सारवले जाते. वैद्यकात स्पष्ट सांगितले की, कोणत्याही व्याधीवर अन्य उपचार परिणामकारक होईनासे झाल्यावर रुग्णाचा मुक्काम गोवंशाच्या गोठ्यात हलवावा. देशी गाईचे दूध बुद्धिविकासासाठी चांगले असल्याचे अनेक पिढ्यांचे अनुभव आहेत. भारतीय यज्ञसंस्था आणि अग्निहोत्र उपक्रम हे प्रामुख्याने गोमूत्र, शेण, दूध, दही, तूप यावर आधारित आहेत. हा विषय वैज्ञानिक पातळीवर कसा मोजायचा, यावर मतमतांतरे असू शकतात. ‘भारतीय गोवंशाचा विश्र्वसंचार’ हा विषय व्यापक आहे. एकट्या ब्राझीलमध्ये भारतीय गोवंशाची संख्या साडेएकवीस कोटी आहे. अमेरिका खंडात भारतीय गोवंश ‘झेबु’ नावाने परिचित आहे. आफ्रिकेत निम्म्यापेक्षा अधिक देशांत ‘गाय’ हे चलन आहे. या खेरीज भारतीय गोवंश अधिक असलेला देश म्हणजे चीन. गेल्या दहा वर्षांत चीनने शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी ‘येलो काऊं’ची संख्या वाढविली. चीन आणि पाकिस्तानबाबत सध्या एक ‘बातमी’ आश्र्चर्यकारक आहे. चीनच्या पंचांग वर्षात विद्यमान वर्ष ‘बैल वर्ष’ आहे, तर गाईची उपयोगिताच त्या देशातील शेतकऱ्याला तारेल, असे पाकिस्तानने गृहीत धरून विद्यमान वर्ष ‘गाय वर्ष’ जाहीर केले आहे.

(लेखक संगणकतज्ज्ञ व ज्येष्ठ संशोधक आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com