इकडे दिल, तिकडे मुश्‍किल!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 ऑक्टोबर 2016

‘ए दिल है मुश्‍किल` हा चित्रपट प्रसारित करण्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने झाला, त्यातून अनेक नवे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. यातील राजकारणही लपून राहणारे नाही.

‘ए दिल है मुश्‍किल` हा चित्रपट प्रसारित करण्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने झाला, त्यातून अनेक नवे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. यातील राजकारणही लपून राहणारे नाही.

‘ए दिल है मुश्‍किल’ या पाकिस्तानी कलावंतांचा समावेश असलेल्या चित्रपटाचे प्रदर्शन ठरल्याप्रमाणे म्हणजेच ‘धनत्रयोदशी’च्या मुहूर्तावर, २८ ऑक्‍टोबर रोजी निर्वेधपणे होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला! तो तसा होणार, ही बहुतेकांची अटकळ होती; कारण राज ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ची १० वर्षांपूर्वी स्थापना केल्यापासून अशा धमक्‍या अनेकवार दिल्या होत्या. मात्र, अशा धमक्‍यांनंतर त्यातून यशस्वी माघार घेण्याचा आपला नेहमीचा मार्ग त्यांनी यावेळीही खुला ठेवला होता. सारे काही एखाद्या ‘गल्लाभरू’ चित्रपटाच्या आखीव-रेखीव पटकथेप्रमाणेच झाले; मात्र या वेळी ‘गेस्ट ॲपिअरन्स’ करावा लागला तो दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना! त्यांनी आपल्या निवासस्थानी चित्रपट निर्माते आणि राज ठाकरे यांची एक बैठक बोलावली आणि हा हा म्हणता मार्ग मोकळा झाला. अर्थात, फडणवीस यांनीही हा ‘गेस्ट ॲपिअरन्स’ अगदी खुशीत केला, कारण त्यातून त्यांना राज्याच्या सत्तेतील आपला ‘मित्र कम शत्रू’ असलेल्या शिवसेनेला सणसणीत चपराक लगावण्याची संधी आयतीच प्राप्त झाली होती. शिवाय, या बैठकीत निष्पन्न झालेल्या तोडग्यामुळे आता पाकिस्तानी कलावंतांना घेऊन सिनेमे काढणाऱ्या प्रत्येक निर्मात्याने सैनिक कल्याण निधीस पाच कोटी रुपये देणे अपेक्षित आहे! त्यामुळे फडणवीस यांनी ही जी काही मध्यस्थी सिने-निर्माते आणि राज ठाकरे यांच्यात केली, त्याची परिणती म्हणून मुख्यमंत्री तसेच राज या दोघांनाही आलेले राष्ट्रप्रेमाचे भरतेही सर्वांना दिसून आले. मात्र, ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी राजकारणासाठी लष्कराचा अशा प्रकारे वापर करण्यास जोरदार आक्षेप घेतला असल्याने आता लष्कर आपल्या निधीसाठी येणाऱ्या या रकमेचा स्वीकार करते का नाही, तेही बघावे लागणार आहे.

फडणवीस यांनी मात्र या असल्या बाबींच्या पलीकडे जाऊन ही मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच भारतीय जनता पक्षाच्या तथाकथित मित्रपक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे गोव्याच्या एरवी सुशेगाद असलेल्या भूमीत जाऊन भाजपवर तोफा डागण्यात मग्न होते! ‘भाजप हा सत्तांध पक्ष आहे!’ असा टोला उद्धव लगावत असतानाच इकडे मुंबईत मुख्यमंत्री राज यांना मनवण्यात गुंतले होते. त्यामागे अर्थातच राजकारण आहे आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या दोन ‘जगप्रसिद्ध’ मित्रांमधील मतभेद विकोपाला गेलेले असतानाच, आपल्या मित्राच्या शत्रूशी दोस्ताना करण्यात मुख्यमंत्री मशगूल होते. महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची ‘युती’ अवघड असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांत दोघांनीही आपापली शस्त्रे विजयादशमीच्या मुहूर्तावर बाहेर काढल्यामुळे उभे राहिले आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री यांची ही ‘मध्यस्थी’ म्हणजे राज यांच्या ‘मनसे’ला दिलसे बळ देण्याचाच उघड उघड प्रयत्न होता आणि त्यामुळे साहजिकच आता मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप तसेच मनसे एकत्र येणार, अशा वावड्यांना सोशल मीडियावरून ऊत आला. फडणवीस तेवढे थेट पाऊल उचलतील की नाही, हे आज सांगता येणे कठीण असले, तरी ‘मनसे’ला या मध्यस्थीमुळे प्राप्त झालेले बळ हे शिवसेनेच्या पोटात गोळा आणणारेच आहे. ‘मनसे’ची मते वाढणे, याचा अर्थ शिवसेनेच्या मतांत घट होणे, हाच असल्याचे गेल्या काही निवडणुकांतून वारंवार स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच फडणवीस यांचा या मध्यस्थीमागील नेमका हेतूही स्पष्ट झाला आहे. अर्थात, राजकारण आणि युद्ध यात सारेच क्षम्य असते, या सुप्रसिद्ध उक्‍तीचा आधारही फडणवीस यांना घेता येईलच!

‘ए दिल है मुश्‍किल’ या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग कोणत्या का रीतीने होईना सुकर झाला आणि त्याचबरोबर ‘मल्टिप्लेक्‍स’वाल्यांचा महागड्या काचाही वाचल्या, याबद्दल सिनेनिर्माते, कलावंत, तसेच मल्टिप्लेक्‍सवालेही खऱ्या अर्थाने फडणवीस यांचे ऋणी राहतील आणि फडणवीस यांनाही ही गुंतवणूक पुढे मोलाची ठरू शकेल! त्याशिवाय आणखी एक मुद्दा यानिमित्ताने पुढे आला आहे. अशा प्रकारे दंडेलशाहीच्या जोरावर पैसे जमा करणे, मग भले ते राष्ट्रवादाच्या उदात्त हेतूंसाठी का असेनात, योग्य आहे काय, याचा विचार सरकारने करायला हवा. आता हे पैसे सैनिक कल्याण निधीत जमा होणार आहेत; पण मग पूर्वी अशाच प्रकारे दिलेल्या धमक्‍यांच्या वेळी दबाव आणून पैसे कशावरून जमा केले नसतील? त्यामुळेच काँग्रेस तसेच समाजवादी पार्टीने या प्रकारास तीव्र आक्षेप घेतला आहे. लालूप्रसाद यादव यांनी तर या प्रकाराचे वर्णन ‘आर्मी के नामपर कोई वोट माँग रहा है, तो कोई नोट!’ या एका वाक्‍यात राज ठाकरे यांच्याबरोबर भाजपलाही जबरदस्त टोला लगावला आहे. सरकारने याचा गांभीर्याने विचार करायला हवा, अन्यथा असे प्रकार वाढत राहतील, हे लक्षात घ्यायला हवे. मात्र, आपल्या ‘तथाकथित’ मित्रपक्षाला जबरदस्त धक्‍का देण्याचे काम फडणवीस यांनी अगदी हलक्‍या हाताने केल्यामुळे आता यापुढे ‘मुश्‍किल’ असेल ती सिनेनिर्माते आणि फवाद खान आदी कंपनीला नव्हे, तर शिवसेनेलाच!
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ekade dil tikade mushkil